ही वेबसीरीज बघितल्यावर तुम्ही देखील म्हणाल "आणि काय हवं?"

    10-Aug-2021   
|

अनेकदा काही काही वेब सीरीज अशा असतात, ज्याचे कितीही सीझन आले तरी त्या बोअर होत नाहीत. फ्रेंड्स हा शो त्यातील एक. आणि तशीच एक वेब सीरीज मराठीत आली ती म्हणजे "आणि काय हवं." नवरा बायकोच्या नात्यावरील अतिशय खेळकर मात्र तरीही अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करणारी ही वेब सीरीज. आणि तिचा तीसरा सीझन देखील अतिशय सुंदर असा आहे.


Ani kay hava_1  


20-20 मिनिटांचे 6 भाग असलेला हा सीझन थ्री, तीन्ही सीझन मधील सगळ्यात सुंदर सीझन आहे, असं मी म्हणेन. कारण या सीझन मध्ये नवरा बायकोच्या नात्यांमधील काही अतिशय छोट्या वाटणाऱ्या मात्र खूप महत्वाच्या गोष्टींवर खूप हल्क्या फुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे.

साकेत आणि जुई, यांच्या लग्नाला आता 5 वर्षे झाली आहेत. मात्र त्यांची मैत्री आणि प्रेम असे आहे, ज्याला पाहून असे वाटते, कि आताच त्यांचे लग्न झाले आहे. खऱ्या आयुष्यात नवरा बायको असलेले प्रिया बापट आणि उमेश कामत यांची केमेस्ट्री खूपच मस्त आहे.

पहिला भाग घेऊन येतो साड्यांची शॉपिंग. खूप गोड असा हा एपिसोड आहे. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, किंवा जे नवरा बायको दोघेच राहतात. ते या संपूर्ण सीरीज सोबत खूप रिलेट करू शकतील. दुसऱ्या एपिसोडमध्ये साकेतची भाचे कंपनी येते, आणि त्यात बघून कळलं आज्यच्या पिढीचे बालपण कसे रवले आहे, आणि गॅजेट्स ने कसे त्यावर अधिराज्य गाजवले आहे.

मला सगळ्यात जास्त आवडला तीसरा एपिसोड आणि या लेखातून मी त्यावर अधिक बोलणार आहे. आजही आपल्या घरांमधून पुरुषांसमोर मासिक पाळी (पीरेड्स) बद्दल बोलले जात नाही. अनेकदा बायका आपल्या नवऱ्यांशी देखील या बद्दल बोलू शकत नाही. अशा सर्व सामाजिक परिस्थितीत जुईचे पीरेड्स आल्यावर साकेत जुईची ज्या प्रेमाने काळजी घेतो, ते खूपच इंस्पायरिंग आहे. प्रत्येक नवऱ्याने साकेत कडून शिकले पाहिजे. त्या 4 दिवसांमध्ये बायकांना काय आणि किती त्रास होतो, आणि हे अजिबात कौतुक करून घेण्यासाठी नसतं, तिला खरंच खूप काळजीची आवश्यकता असते, हे या सीरीज मधून अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आलंय. या काळात साकेत तिच्यासाठी वरण भात लावतो. सगळ्यात महत्वाचं तिच्या पोटाला तेल लावून देतो. तिचे मूड स्विंग्स न चिडचिड करता प्रेमाने झेलतो, आणि तिची एका लहान बाळा प्रमाणे काळजी घेतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि खास करून नवरा बायको दोघेच राहत असतील, तर हे खरंच अनुकरणीय आहे. मला हा एपिसोड खूप सुंदर, अतिशय महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आणि अलगद फुंकर घालावी तसा हल्का फुल्का वाटला.


त्या नंतरच्या एपिसोड्स मध्ये सतत घरी ऑफिस टॉक्स, बदलत्या लाईफ स्टाइल मध्ये बदलत्या सवयी आणि त्या बदलण्यासाठी नवरा बायकों यांनी केलेल प्रयत्न, छंद आयुष्यात कसा आणि किती महत्वाचा आहे, हे किती सोप्या शब्दात सांगितलं आणि मांडलं आहे, याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अतिशय गोड आणि सुंदर असे हे भाग आहेत.

आजच्या जगात एका कपलने कसं जगावं, याचं उत्तम उदाहरण देणारी, आपण त्यांच्याशी कनेक्ट करु शकू अशी ही वेब सीरीज आहे. याचा एकही भाग मिस करू नका ही तर माझी कळकळीची विनंतीच आहे तुम्हाला.

आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर येणाऱ्या ए ग्रेडच्या न्यूडिटी, सेक्स आणि शिव्यांनी भरलेल्या कंटेटं मध्ये सगळा चिखल दूर करून स्वच्छ कॅनव्हस उभा करावा अशी ही वेब सीरीज आहे. नक्की बघा, आणि आनंद नक्की लुटा.

तुम्हाला ही वेब सीरीज कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

- निहारिका पोळ सर्वटे