पुस्तका...तुझी माझी दोस्ती

    23-Apr-2021   
|
 
 
किती नयनरम्य असतो ना तो प्रवास! जणू कोणी हाथ धरून प्रेमाने आणि अलगदपणे एका नवीन सफरीवर नेत असतं. जितकी पाने पलटत जावीत तितकाच अजून तो मोहून टाकनारा असतो. मनाच्या संपूर्ण गाभार्याला व्यापून केवळ आनंद निर्माण करण्याचं काम तो करत असतो. कारण तो जादुगार...एक लेखक असतो. जगाच्या पाठीवर असेच काहीसे आगळेवेगळे चमत्कार हे लेखक करत असतात. वास्तवाशी अलगद नाळ जोडून कल्पनेच्या विश्वात मुक्त वावरण्याचे स्वातंत्र्य हा लेखक देतो. माध्यम अगदी सगळ्यांच्या ओळखीचे असते. हो, पुस्तकच ते! काहींसाठी केवळ रद्दी तर काहींसाठी जगायला लागणारे एक साधे आणि उत्तम शस्त्र. याचं शस्त्राची नव्याने आठवण करून देणारा जगात साजरी केला जाणारा आजचा जागतिक पुस्तक दिवस.

books_1  H x W: 
 
जगात असे खूप वाचनवेडे आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात पुस्तक आणि कडक चहाने होते. शेवटही काही तसाच. घरातील सगळ्यात आवडता कोपरा म्हणजे जिथे पुस्तकांशी भेट होते. ही भेट एखाद्या प्रियकरासासारखी रोजच व्हावी असं त्या वेड्यांना वाटत असत. हळूहळू बाकीची इतर कामे त्या ठिकाणी केंद्रित होऊन जातात आणि त्यांचं त्या कोपऱ्यात अपोआप ठाणं मांडले जातं. बाकीचं सगळं आयुष्य असच त्या पुस्तकांभोवती फिरू लागतं. जरी एखाद्या मॉल मध्ये फिरायला गेलं तरी त्यांचं लक्ष मात्र पुस्तक विभागाकडे आधी आकर्षित होतं. स्वतःकडे असलेले जास्तीचे पैसे ते पुस्तक खरेदीवर घालवतात. अर्थात त्याचं सुख पण वेगळचं असतं. खूपच पुस्तकमय होतंय ना सगळं...काय करणार ही पण पुस्तकाकडूनचं झालेली सवय.

books_1  H x W:
 
खरं तर पुस्तक आवडल की त्याचं सर्व श्रेय लेखकाला जातं. लेखकाने वाचकाला शेवटच्या शब्दापर्यंत खेळवून ठेवलं की बेत यशस्वी झाला असे म्हणतात. पुस्तकातील पात्रांमध्येवाचकाला उतरवून टाकणे हा लेखकाचा धर्म असतो. जे यावर खरे उतरतात त्यांच्या प्रेमात वाचक नेहमी पडतो. असेच लेखक आणि पुस्तके त्या वेड्यांना हवीहवीशी वाटतात. ते दोघेही आयुष्याचा कधी भाग होऊन जातात हे त्यांना कळतसुद्धा नाही. शेवटी काय तर...जगातील सगळ्याच लेखकांनी मर्यादित बाराखडीचा उपयोग करून असचं हे क्षेत्र गाजवत राहावं, अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्या सारख्या वेड्यांनी त्यापाठी असचं वेडं होवून जगावं असा कायमचा आग्रह!