भारतीय सिनेमासृष्टीतला अत्यंत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर

    02-Apr-2021
|

rajinikanth_1  
दक्षिणात्य सिनेमासृष्टीत गाजलेले आणि अत्यंत लोकप्रिय सिनेमा कलाकार रजनीकांत यांची २०१९ या वर्षीच्या दादासाहेब फाळके या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेमासृष्टीतला सगळ्यात प्रतिष्ठित असलेला पुरस्कार आहे. कोरोना महामारीमुळे या पुरस्काराची घोषणा उशिरा करण्यात आली. सुपरस्टार रजनीकांत यांना दिला जाणारा हा ५१ वा पुरस्कार असणार आहे.
 
 
 
 
 
शिवाजीराव गायकवाड़ उर्फ रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळूरुमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. अत्यंत कठीण परिश्रम आणि मेहनतीने त्यांनी सिनेमासृष्टीत आपले नाव कमावले. त्यांची खास स्टाईल आणि आपलेपणा हा त्यांचा दागिना आहे. रजनीकांत यांनी विविध भाषिक सिनेमांमध्ये काम केले आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे म्हणूच त्याची पावती त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून मिळत आहे. रजनीकांत यांनी एकाहून एक हिट सिनेमे दिले आहेत. रजनीकांत यांच्या सुपरहिट हिंदी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर दरबार, २.०, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, कबाली, खून का कर्ज, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा हे काही सिनेमे आहेत. दक्षिण भारतातील लोक त्यांना देवासारखे पूजतात.
 
 
प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.' दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते आहेत. या पुरस्काराची घोषणा झाल्यापासून सुपरस्टार रजनीकांत याचं वेगवेगळ्या हस्तींकडून कौतुक केले जात आहे.