मुंबईच्या डब्बेवाल्यांचे काय ? त्यांचा विचार कोण करणार ?

    15-Apr-2021
|

संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाउन लावण्यात आले आहे. पुढील १५ दिवसांचा काळ हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असा काळ असणार आहे. मात्र या लॉकडाउनमुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत हे देखील खरे. ज्यांचे पोट हातावर आहे, ज्यांना रोज काम केल्यानंतरच रोजच्या गरजा भागवण्याचे पैसे मिळतात अशा लोकांनी काय करायचं? यामध्ये मोठी संख्या आहे, मुंबईतील डबेवाल्यांची. मुंबईतील डबेवाले अक्षरश: लाखों लोकांची भूक भागवतात, मात्र आज या लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर स्वत:ची भूक कशी भागवायची हा विचार करण्याची पाळी आलेली आहे. त्याचे कारण या ल़ॉकडाउनमध्ये डबेवाल्यांचा विचार करण्यात आलेला नाही, त्यांच्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आले नाही, अशाने त्यांचे पुढे काय होणार ?


Mumbai dabbawala_1 &


महाराष्ट्र सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्सनुसार आणि माहितीनुसार सरकार गोर गरीबांची मदत करणार आहे. यामध्ये रिक्षा चालक, छोटे व्यावसायिक, निवाऱ्यासाठी रस्त्यावर राहणारे लोक अशांचा समावेश आहे, त्यांच्यासाठी आर्थिक मदत आहे, शिवभोजन थाळी आहे, मात्र डब्बेवाल्यांचे काय ? त्यांनी कुणाकडे बघावे ? असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे.


मुंबईतील डब्बेवाले केवळ मुंबईतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबद्दल हार्वर्ड प्रोफेसर्स ने देखील अभ्यास केला आहे, आणि रॉयल फॅमिली त्यांना येऊन भेटून गेली आहे. या डब्बेवाल्यांपैकी दोघांनी तर २००५ मध्ये राजघराण्यातील लग्नसमारंभात देखील हजेरी लावली आहे. इतके प्रसिद्ध असलेले हे मुंबईचे डब्बेवाले आज अचानक पोरके कसे झाले ? त्यांचा वाली कोण ? त्यांच्या भुकेचे कोण बघणार ? असे अनेक प्रश्न आज निर्माण होत आहेत.

एकूण ५ हजार डब्बेवाल्यांपैकी कोविडमुळे केवळ ४००-५०० डब्बेवालेच कार्यरत होते, त्यातून या लॉकडाउनमुळे केवळ १००-२०० डब्बेवाले काम करत आहेत. बाकीच्यांचे काय ? असा प्रश्न या डब्बेवाल्यांना सतावतोय. डब्बेवाल्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदत मागितलेली आहे. यासंदर्भात पुढे काय होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.