४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची घोषणा

    25-Mar-2021   
|
 भारताचे ४७ वे सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात 23 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं सरन्यायधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकारनेच शरद बोबडे यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यासाठी सुचवलं होते. कायदा मंत्रालायाला प्रतिसाद देत बोबडे यांनी न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते.

n.v.ramana_1  H
आता ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा शपथ घेतील. न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला होता. रमण्णा हे आंध्र प्रदेशचे रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत.
जून 2000 मध्ये ते आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते . न्यायमूर्ती रमणा यांना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवृत्तीनंतर एक वर्ष चार महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे. 26 ऑगस्ट 2022 ला ते सेवानिवृत्त होतील. नुथुलापटी वेंकट रमणा यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात 2014 पासून ते कार्यरत आहेत.