Short and Crisp : चोरी चोरी प्यार

28 Feb 2021 16:00:00

नावात काय आहे असे एकदा शेक्सपियरने म्हटले होते, मात्र या लघुपटाच्या नावातच त्याची संपूर्ण कथा आहे. केवळ ३ अक्षरांनीच या लघुपटाची संपूर्ण कथा सांगितली आहे. कशी? ते झालं असं की ही कथा आहे दोन अट्टल चोरांची. एक मुलगा आणि एक मुलगी. व्यवसायाने ते काही चोरी मारी करणारे नाही, मात्र मज्जा म्हणून चोऱ्या करणाऱ्या या जोडप्याची ही एक मजेशीर कथा आहे.


Chori Chori Pyar_1 &


( या जोडप्याकडून कुठलीही प्रेरणा घेऊ नका. लघुपटात कुणी पकडल्या जात नाही, खऱ्या आयुष्यात असे काही केले तर जेलमध्ये नक्की जावे लागणार त्यामुळे याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनीच बघावे.)

हा सल्ला यासाठी दिला कारण हा लघुपट बघता बघता असे नक्कीच वाटू शकते. लघुपटाच्या सुरुवातीला एक तरुण आपल्या रोजच्या कामांमध्ये असलेला दाखवण्यात येतो, मात्र थोड्याच वेळात तो एका दुकानात जातो, तिथे त्याला एक तरुणी भेटते. तिच्या हाव भावांवरुन ती त्याला चोरी करणारी वाटते आणि तो तिचा फोटो काढतो. पुढे ऑफिसमध्ये गेल्यावर एक नवीन मुलगी "अंकिता" आजपासूनच कामावर रुजू झाल्याचं कळतं आणि बघतो तर काय ही तीच असते, सकाळची... दुकानात चोरी करणारी.


नंतर तो तिला तिचा सकाळचा फोटो दाखवून त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि तिला संध्याकाळी बाहेर भेटण्यास सांगतो, तिथे कळतं की हा मुलगा देखील धुतल्या तांदळासारखा नसून तो ही एक अट्टल चोर आहे. आणि ही जोडी 'बंटी बबली' प्रमाणे एक चोऱ्या करायला लागते. एकमेकांना चॅलेंज देत, मज्जा करत त्यांच्या चोऱ्या सुरु असतात. मात्र एक दिवस अचानक मुलगा एका दागिन्यांच्या दुकानात चोरी करायचं ठरवतो. मग काय होतं? तो पकडल्या जातो? जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा 'चोरी चोरी प्यार'.

विशेष म्हणजे या लघुपटाचा शेवट देखील असाच गंमतीशीर आहे. तो तिला लग्नासाठी विचारतो मात्र त्याच्या खिशात अंगठीच नसते.. कुठे जाते ही अंगठी? पुढे काय होतं. हे जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. गोलिल्ला शॉर्ट्स तर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या या लघुपचाला यूट्यूबलर 3 Million अधिक व्ह्यूज आहेत. यामध्ये सत्यजीत दुबे आणि रुशीता सिंह यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे. मनोरंजक असा हा लघुपट आहे.

- निहारिका पोळ सर्वटे


Powered By Sangraha 9.0