Short and Crisp: चिडिया

08 Aug 2020 11:00:00

कधी कधी ना काही गोष्टी समजण्यासाठी अनुभवण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. हावभावाने आणि केवळ दृश्यांनीच आपण त्याची अुनुभूती घेवू शकतो. हा लघुपट देखील त्यातीलच एक आहे. या लघुपटात कोणी प्रसिद्ध कलाकार नाही, उच्चभ्रू भाषा नाही. मात्र आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटवणारा हा लघुपट आहे. यामधील बाल कलाकाराच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य, त्याचे हाव भाव खूप खूप बोलके आहेत. आणि म्हणून हा लघुपट थेट मनाला भिडतो. 


Chidiya_1  H x


बिहार - उत्तरप्रदेश भागातील एका छोट्या गावाची ही कहाणी. एक छोटा मुलगा एक चिमणी पकडतो. तिला कुरवाळतो. पण त्याच्या लक्षात येतं कि चिमणीला तुम्ही असं पकडून बांधून ठेवू शकत नाही. मात्र त्याने तिला सोडलं तर परत तिला ओळखणार कसं ? म्हणून तो तिला रंग देतो. आणि उंच आकाशात सोडून देतो. या चिमुकल्याची एक छोटी मैत्रीण देखील असते, ती त्याला विचारते का रंग दिलास रे चिमणी ला ? तो म्हणतो, मी तिला ओळखू शकेन म्हणून. तर ती विचारते आणि त्या चिमणीच्या आईने तिला नाही ओळखलं तर ?


झालं... हा चिमुकला चिंतेत पडतो. करणार काय?.. मग तो असं काहीतरी करतो, जे अत्यंत गोड, निरागस आणि आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं आहे. तो काय करतो ? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा..

हमारा मूव्ही तर्फे प्रदर्शित आणि ध्रुव द्विवेदी लिखित आणि दिग्दर्शित हा लघुपट खूप कमी संवाद असून सुद्धा अत्यंत बोलका आहे.. शेवटच्या दृश्यातील चिमुकल्याचं हसू, आपल्या दिवस आनंदी करणारं आहे. त्यामुळे हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघावा..

  • निहारिका पोळ सर्वटे

Powered By Sangraha 9.0