सुशांत सिंहच्या मृत्युमुळे राज्य शासनाचे पितळ उघडे

    20-Aug-2020   
|

सुशातं सिंह राजपूत मृत्यु / हत्येप्रकरणी आता सीबीआय चौकशी होणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जनतेला पुन्हा एकदा आपल्या न्याय व्यवस्थेबद्दल विश्वास बसला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेतून पुन्हा एकदा त्यांचे पितळ उघडे पडले आहे. सीबीआयची टीम या संपूर्ण घटनेचा तपास करणार हे कळल्यानंतर लगेचच मुंबई बीएमसी ने फर्मान काढले कि, सीबीआय टीमने ७ दिवसांच्या आत आपला तपास पूर्ण करावा अन्यथा त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. आता या मागचे लॉजिक अजून कुणालाच कळले नाही, सात दिवसांनंतर क्वारंटाइन करण्यात काय अर्थ आहे असा पहिला प्रश्न उपस्थित होतो, तसेच तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना क्वारंटाइन का करण्यात यावे असाही प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. त्यामुळे यासंपूर्ण घटनेत राज्य सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद अशी दिसून येते.


sushnat Singh _1 &nbआता आपण सुरुवातीपासून या संपूर्ण घटनाक्रमाकडे बघूयात :

८ जून २०२० रोजी दिशा सालियान, या सुशांत सिंह राजपूत यांच्या एक्स मॅनेजरचा एका मोठ्या इमारतीवरुन कोसळून मृत्यु होतो. त्यावेळेला ती असलेल्या इमारतीत एक पार्टी होत असते, आणि त्यानंतरच तिचा मृत्यु होतो. मात्र याला मुंबई पोलिसांद्वारे अपघाती मृत्यु किंवा आत्महत्येची शक्यता असे सांगण्यात येते, आणि यावर पुढे काहीच होत नाही. प्रश्न उपस्थित होतो, का? इतकी मोठी पार्टी सुरु असताना झालेल्या या ‘अपघाता’नंतर पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांची नावे समोर येत नाहीत, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची विचारपूसही केली जात नाही, का? त्या पार्टीत असे कोण उपस्थित होते, ज्याला राज्यसरकार पाठीशी घालतेय आणि म्हणूनच पोलिसांना याबद्दल तपास न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत?

या घटनेच्या लगेच एक आठवड्यानंतर म्हणजेच १४ जून २०२० रोजी दुपारी साधार १-१:३० च्या सुमाऱ्यास बातमी येते कि सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी आत्महत्या, आणि संपूर्ण देश हादरून जातो. मग लगेच तो डिप्रेशन मध्ये होता, आणि नैराश्यातून त्याने आत्महत्या केली अशी एक थिअरी समोर येते. मात्र त्याच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाहीत, आणि त्याच्या व्हायरल झालेल्या मृत शरीराच्या फोटोज वरुन ते नव नवीन गोष्टी समोर आणतात, यामुळे दोन मोठे मीडिया हाउसेस या घटनेच्या तपासात उतरतात आणि एक भीषण आणि विदारक सत्य जगापुढे येतं, मग सुशांतचे वडील बिहार येथे सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करतात, आणि पुढे सगळी सूत्र बिहारच्या हातात जातात. मात्र आता इथे बघण्यासारख्या काही प्रमुख गोष्टी :

१. मुंबई पोलिस कुठल्याही तपासाशिवाय १० मिनिटाच्या आत याला आत्महत्या म्हणून कसं जाहीर करते?

२. मृत शरीर पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत कोणीही बघितले नाही, पोलिसांनीही नाही, मग याला आत्महत्या कसे म्हणावे?

३. मुंबई पोलिसांद्वारे ज्या पद्धतीने या गोष्टीचा तपास करायला पाहिजे होता, तसा होत नाही, नैराश्याच्या थिअरी वर मुंबई पोलिसंही भर देतात, आणि जेव्हा बिहारचे पोलिस मुंबईत तपास करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना जाणून बूझून क्वारंटाइन करणं, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणं, आणि त्यांना सहयोग न करणं असं सगळं होतं. का?

४. दिशा सालियानच्या मृत्युविषयी असलेली फाइल मुंबई पोलिसांकडून ‘चुकून’ डिलीट होते. इतकी घोडचूक कशी काय? आणि इतकी मोठी चूक करून देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही?

५. राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख ‘सीबीआय तपासाची गरज नाही’ असे डिक्लेअर करतात, संजय राऊत ‘सुशातं सिंह नैराश्यात होता’ असं ते त्याला पर्सनली ओळखत नसूनही ठामपणे सांगतात, इतका फोल आत्मविश्वास येतो कुठून ?


sushnat Singh _1 &nb

एकूण काय तर ८ जून नंतर १४ जून ते २० ऑगस्ट २०२० या काळात राज्य सरकारची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद आहे. मुंबई पोलिस केवळ एक बाहुलं आहे, ज्याला राज्य सरकार नाचवतंय असंच दृश्य दिसून येतंय. आणि गंमत म्हणजे इतरवेळी हातात पोस्टर्स घेऊन उभे राहणारे सेलिब्रिटी मंडळी आता आंधळी आणि बहिरी झाली आहे, आणि मूग गिळून गप्प आहे.

या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकार मधील कुणीतरी एक महत्वाची व्यक्ति अडकली असल्याचे वृत्त समोर येत असताना, राज्य सरकारची वागणूक, मुंबई पोलिसांचा भोंगळ कारभार आणि एकूणच परिस्थिती ही देखील याकडेच इशारा करते. प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो ‘राज्य सरकार कोणाला पाठिशी घालतंय?’

- राज्यात पालघर येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांची ठेचून ठेचून हत्या केली जाते, यामागे धर्म आणि जातीय आधार आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे, मात्र ‘माननीय मुख्यमंत्री’ याला धार्मिक रंग देऊ नका असं म्हणत कारवाई केली जाईल असे आश्वासन देतात, मात्र त्याचे पुढे काहीच होत नाही. ‘हिंदु हृदय सम्राटांच्या चिरंजीवांचा राज्यात हिंदू संतांची ठेचून हत्या होते, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही दिसत नाही याहून भीषण असेल ते काय?


- राज्यात कोरोना ने थैमान घातले आहे, क्वारंटाइन सेंटर्सची अतिशय भीषण परिस्थिती आहे. मुंबई पुणे येथील जनता मरणाच्या दारात आहे, मात्र राज्यसरकार याबाबत गंभीरतेने काय करते? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.


- राज्याच्या राजधानीत, बॉलिवुड असलेल्या या मुंबईत एक अतिशय उत्तम अभिनेता आणि तरूण नट संशयास्पदपणे मृत्युमुखी पडतो, मात्र राज्याचा कारभार अतिशय संशयास्पद आहे, याला तुम्ही काय म्हणाल?

-एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जनतेला न्याय देणारे राज्य, रयतेसाठी असलेले स्वराज्य आणि महिलांचे आणि आबालवृद्धांचे रक्षण करणारे स्वराज्य अशी या महाराष्ट्राची ख्याती होती, या इतिहासावर अभिमान करायला शिकवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आज राज्याच्या सर्वोच्च पदावर आहेत, आणि त्यांनी महाराष्ट्राची अक्षरश: दैना करून ठेवली आहे, असे मत आज सामान्य जनतेचे आहे.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात गृहखातं त्यांच्याकडे होतं, अतिशय पादर्शक असा कारभार होता, त्यावेळी अतिशय बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर करणारे, त्यांच्यावर कारण नसताना चिखलफेक करणारे लोक आज इतका संशयास्पद कारभार होऊनही मूग गिळून गप्प आहेत, यातंच सगळं आलं.

आता जनतेलाही लक्षात येतंय, हा संपूर्ण खेळ सत्तेचा, पावरचा, पैशांचा आहे. माजलेल्या उन्मत्त हत्तीप्रमाणे सत्ता चालेलही, मात्र गर्वाचे घर नेहमीच खाली असते, आणि एक ना एक दिवस सत्याचा विजय हा होतोच. सुशांत सिंहच्या आत्म्याला तेव्हाच शांति मिळेल जेव्हा त्याच्या मृत्युसाठी जबाबदार सर्व आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्य सरकारच्या या संशयास्पद कारभारावरून पडदा उठेल. तोवर आपण एकच आशा धरू शकतो कि, ‘सत्य मेव जयते !!!”

- निहारिका पोळ सर्वटे