Short and Crisp: स्पॉटलेस

30 Jun 2020 10:00:00

आजची शॉ़र्टफिल्म जरा वेगळी आहे. त्याचं कारण म्हणजे याचा विषय आणि यामध्ये काम करणारे अभिनेते. यामध्ये पहिल्यांदाच सोनू निगम सारख्या दिग्गज गायकाने लघुपटात अभिनय केला आहे, आणि ही कथा आहे, तीघांची एक मुलगी, आणि दोन मुलांची. कथा केवळ ९ मिनिटांची आहे पण खूप काही सांगून जाते. महत्वाच्या विषयावर, महत्वाच्या वेळी आलेला लघुपट म्हणजे “स्पॉटलेस”.


Spotless_1  H x


अनेकदा आपण जेव्हा लघुपट बघतो, त्यावेळी आपण त्याच्या कथेत गुंतत जातो, मग तो लघुपट अगदी १० मिनिटांचाच का असेनात. मात्र जर त्याची कथा आपल्याला बांधून ठेवणारी असेल, तर मात्र हे १० मिनिटेही पटकन जातात. ही कथाही तशीच आहे. कथा सुरु होते ती कथेतील हीरो म्हणजे सोनू निगम एका व्यक्तिला बांधून ठेवतोय, आणि त्याला क्रूर शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोय इथून. तर दुसरी कडे कथेतील नायिका आपल्या घरी तयार होत असते, डेट वर जाण्यासाठी. ती तिच्या मैत्रीणीला सांगत असते, कि तिचे अचानक लग्न ठरले आहे, आणि पुढच्या आठवड्यात ती लग्न करणार आहे. खुशीत ती तयार होत असते, आणि शेवटी चेहऱ्यावर मेकअप करत असताना अचानक तिच्या चेहऱ्यावर फोड यायला लागतात. आणि पुढच्याच क्षणी ती खाडकन जागी होते. स्क्रीन वर दिसतो तो एकाबाजूने तिचा भाजलेला चेहरा. दुसरीकडे कथेतील नायक बांधून ठेवलेल्या व्यक्तिला क्रूर शिक्षा देतो. कथेतील शेवट अतिशय सुंदर आहे, तो काय आहे यासाठी आपल्याला हा लघुपट बघणे आवश्यक आहे.



या लघुपटात मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे प्रकाश संयोजन, म्हणजेच प्रकाशाच्या माध्यमातून नायक आणि नायिकेचे वेगवेगळे मूड्स दाखवण्याचा एक सुंदर प्रयत्न करण्यात आलेला आहे या लघुपटात. लघुपटात तसे संवाद खूप कमी आहेत, मात्र कमीत कमी शब्दात अधिक बोलून गेलेला हा लघुपट आहे. ९ मिनिटांचीच गोष्ट असल्यामुळे पटकन संपते मात्र तुम्हाला बांधून ठेवते हे ही तितकेच खरे.



सुरुवातीला गोष्ट समजायला थोडं कन्फ्यूजन होतं, मात्र जशी जशी कथा उलगडत जाते आपल्याला खरं काय ते कळत जातं. सुरुवातील संवाद अधिक दिले असते तर हे कंफ्यूजन टाळता आलं असतं, असंही वाटून जातं. याआधी सोनू निगमने जितक्याही वेळा अभिनयाचा प्रयत्न केला आहे, तो फसला आहे असे दिसून येते, मात्र यावेळेला त्याने देखील अभिनय चांगला केला आहे. त्यासोबतच नायिकेच्या भूमिकेत श्वेता रोहिरा आहे, आणि हा लघुपट लिहीला आणि दिग्दर्शित केला आहे, सौरभ एम पांडे यांनी. एकूणच “एसिड अटॅक सर्व्हायव्हर” हा विषय छपाक सारख्या लघुपटांमुळे प्रचलित असला तरीही, ही कथा थोडी वेगळी आहे, त्यामुळे एकदा तरी नक्की बघावा असा हा लघुपट आहे.

- निहारिका पोळ सर्वटे 


Powered By Sangraha 9.0