Short and Crisp : मेथी के लड्डू

    22-Jun-2020   
|

आपण अनेकदा चित्रपटांमध्ये हे बघतच आलो आहोत, की नायिका गरोदर झाली की तिला तिच्या घरचे "सौंठ के लड्डू, मेथी के लड्डू" वगैरे खाऊ घालतात. ही कहाणी याच विषयाचा आजू बाजूला फिरते. मात्र एका वेगळ्या पद्धतीने. या लघुपटात एक स्वयंपाक घर आहेत, आणि तिथे गप्पा मारणाऱ्या आई आणि कन्या. या लघुपटातून समाजाला एक खूप महत्वाचा आणि आवश्यक संदेश देण्यात आला आहे.


methi_1  H x W: 


या कथेत आई आणि मुलगी गप्पा मारत असतात, त्यांच्या एकूण संवादांवरुन लक्षात येतं की त्यामुलीला गरोदर होण्यात अडचणी येत आहेत. तितक्यात तिची लहान बहीण येते, ही लहान बहीण म्हणजेच कथेतील "छोटी" त्यावेळी गरोदर असते. म्हणजेच तिच्या मोठ्या बहीणीला आपण आई होवू शकत नाही, याची आणखीनच जाणीव होते.

त्यानंतर गप्पा गप्पांमध्येच ही आई आपल्या मोठ्या मुलीला काहीतरी सांगते. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक छान हसु खुलतं. ती काय सांगते? हे जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट.


या लघुपटाची खरी गंमत म्हणजे, या आई आणि मुलींमधला संवाद. किती आवश्यक असतो नाही असा संवाद. आयुष्यात महत्वाचे, मोठे निर्णय घेताना इतर कोणाहूनही अधिक आपल्या आईशी संवाद साधणं महत्वाचं असतं. तीच आपल्याला समजून घेते. हा लघुपट बघताना हे प्रकर्शाने जाणवतं. तिच्यासाठी तिच्या दोन्ही मुली सारख्याच. मात्र ती ज्या पद्धतीने दोघींना सांभाळून घेते ते खूप महत्वाचं वाटतं. हा लघुपट खूप 'इमोशनल' आहे का? तर नाही.. अगदी साध्या सोप्या संवादातून खूप सुंदर भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.


लघुपटात प्रसिद्ध कलाकार झरीना वहाब हिने आईच्या भूमिकेत उत्तम काम केलं आहे. तर मुलींच्या भूमिकेत आकांक्षा सिंग आणि अंजली बारोट या दोघींनीपण खूप छान काम केलं आहे. मयंक यादव यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाला यूट्यूबवर आता पर्यंत ३१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.

- निहारिका पोळ सर्वटे