Learn to live with Corona.. कोरोना हा भविष्याचा साथी

    31-May-2020   
|

 'मानवाचे गुण' या विषयावर लिहावे तेव्हढे कमी आहे. एखाद्या संकटाचा सामना आणि त्या संकटावर मात करणे हे मानवाकडून शिकावे तेव्हढे कमी आहे. आजपर्यंत जगावर कित्येक संकटे येऊन गेली मात्र या सगळ्या आपत्तींचा मानव जातीने समर्थपणे सामना केला. संपूर्ण जगाला एकाच क्षणात थांबवणारा हा कोरोना विषाणू मानवी जीवन साखळी विस्कळीत करण्यास बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत आहे. मात्र कोरोना विषाणू हा आपल्या दैनंदिन जीवनाचा लवकरच भाग होणार आहे हे सत्य मानणे आज अधिक महत्वाचे झाले आहे. भारतात आणि जगात या विषाणूचा वाढता पसारा पाहता आपल्याला कोरोना विषाणूशी चार हात करणे फारच महत्वाचे होणार आहे. भारत सरकारने आता ४ थे लॉकडाऊन सुरु केले असून मेट्रो शहरांमध्ये हे लॉकडाऊन अधिक कडक ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हा यामागील सरकारचा उद्देश असला तरी देखील हा विषाणू दिवसेंदिवस वाढत जाईल हे मात्र नक्की आहे.


corona_1  H x W

असलेल्या परिस्थितीचा सामना करणे आणि त्यातून योग्य मार्ग काढून पुढे मार्गक्रमण करणे हा मानवी स्वभाव असल्याने आता कोरोना विषाणूंसोबत देखील मानवाला जगावे लागेल हे सत्य मानवाने लवकरात लवकर मानणे गरजेचे आहे. मात्र या विषाणूची लागण होणार नाही याची खबरदारी घेत जगणे हे आत्ताच्या काळाची गरज असणार आहे. कोरोना विषाणू येण्याच्या आधी आणि आता मानवी जीवनात अनेक महत्वाचे बदल होणार आहेत. मानवी जीवन कोरोना विषाणूमुळे अतिशय बदलणार आहे आणि हा बदल स्वीकारणे आज महत्वाचे ठरणार आहे. माणूस याआधी अतिशय बेधडक आणि स्वछंदी जीवन जगत होता मात्र आता त्याला आपल्या गरजा आणि मनावर ताबा ठेवणे गरजेचे होणार आहे. कोरोना विषाणू येण्याच्या आधीचे जग आणि कोरोना सोबत जगत असतांनाचे जग हे फार वेगळे असणार आहे. मानवाला आपला जास्तीत जास्त वेळ घरी घालवावा लागणार असून त्याला स्वतःतील समजूतदारपणा आणि सामाजिक जाणीव जागृत करणे गरजेचे आहे. वरील बदल हे अतिशय प्राथमिक बदल असले तरी देखील हि सुरुवात आतापासून मानव जातीला करावी लागणार आहे.

माणूस याआधी स्वतःच्या मनोरंजनासाठी अनेक गोष्टी करत होता मात्र आता मानवाचे प्राथमिक ध्येय्य ''जान हैं तो जहान हैं'' हे असणार आहे. यालाच आपण खालील प्रमाणे सविस्तर समजावून घेऊ:


तांत्रिक विकासाला चालना : कोरोना विषाणू आधीच्या जगाचा विचार केला तर प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञान वापरात नव्हता मात्र आता घरातून बाहेर पडणे कठीण झाल्याने आपली कामे तंत्रज्ञानाचा वापर करून कशी करता येईल हा विचार मानव करेल आणि त्यामुळे तो तांत्रिक दृष्टीने अधिक प्रगल्भ होईल. जवळपास तांत्रिक सगळी कामे हि घरी बसून केली जातील आणि ऑफिस हि संकल्पना मागे सोडली जाईल.


corona_1  H x W


ई-शाळा संकल्पना : आजची पिढी तांत्रिक दृष्टीने सक्षम असल्याने आता विद्यार्थ्यांना एखाद्या अँप्लिकेशनच्या माध्यमातून शिक्षकांव्दारे धडे दिले जातील. सध्या झूम अँप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उरलेला अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. त्यामुळे आता भविष्यात विद्यार्थी घरीच राहून आपला अभ्यास आणि परीक्षा पूर्ण करणार आहेत.


corona_1  H x W

मौज-मजेच्या गोष्टी बंद : हॉटेलींग, पार्टी, क्लब हा मानवी जीवनाचा मौज मस्ती करण्याचा उपक्रम मात्र आता या सगळ्या मौज-मस्ती कमी करण्याकडे मानवाचा रोख असेल. जास्तीत जास्त अन्न घरी शिजवून खाणे आणि शक्य असेल तेवढेच घराच्या बाहेर निघावे हा मंत्र आता मानव जपणार आहे. त्यामुळे हॉटेल, क्लब, मौज-मस्तीचे ठिकाण ओस पडणार आहेत.


corona_1  H x W

रोबोटयुग : आजपर्यंत मानवाने केलेल्या संशोधनात महत्वाचे संशोधन हे रोबोट मानले जाते. भविष्यकाळाची गरज म्हणून मानवाने रोबोटला जन्म दिला. त्यामुळे कोरोना लढाईत आता रोबोट देखील सामील होणार आहेत. ज्या ठिकाणी रोबोटमुळे काम होणार असेल तिथे आता भविष्यकाळात रोबोट जाऊन ते काम पूर्ण करेल. रोबोटला याचसाठी मानवाने तयार केले असून आता त्याचा वापर करण्याची गरज पडणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला पिज्जा द्यायला रोबोट आला तर त्यात आश्यर्य मानण्यासारखे काहीही कारण राहणार नाही.


corona_1  H x W


टेलिमेडिसिन : कोरोना विषाणूमुळे घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे आणि थोड्याश्या कारणासाठी दवाखान्यात जाणे जीवावर बेतू शकत असल्याने आता लोक टेलिमेडिसिनचा वापर करून आपल्या समस्या सोडवणार आहेत. साधारण शारीरिक दुखण्यासाठी अथवा कोणत्याही आजारासाठी लोक ऑनलाईन डॉक्टरचा सल्ला घेऊन आपली समस्या सोडवणार आहेत. विविध अँप्लिकेशनच्या माध्यमातून अथवा वेबसाईटच्या माध्यमातून टेलिमेडिसिन घेतली जाणार आहे.


corona_1  H x W


वरील प्रकारचे काही बदल आपल्या आयुष्यात घडणार आहेत. आपल्याला काही नवीन बदलांसह जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. भविष्यात वरील बदल हे कालानुरूप घडणार आहेत. त्यामुळे आत्तापासून आपण या सगळ्या बदलांना स्वीकारणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू हा मानवी जगासाठी घातक असला तरी देखील मानवाला या विषाणूशी लढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता कोरोना सोबतचे भविष्य हे काही प्रमाणात वरील प्रकारे नक्कीच वेगळे असू शकते हे मानणे गरजेचे आहे.

नेहा भोळे (जावळे)