किसिंग: प्रेमाचा आवेग की तंत्र?

    31-May-2020
|

नुकताच ‘समांतर’ या वेब सिरीजचा पहिला सीझन पाहून पूर्ण केला. ती सिरीज प्रदर्शित झाल्याझाल्या पाहिलेल्यांनी त्यातील दोन किसिंग सीन्सची खिल्ली उडवली होती. मराठी अभिनेत्यांना साधं नीट कीसही करता येत नाही इथपासून ते पॉर्न ॲक्टर्सकडून ट्रेनिंग दिलं पाहिजे इथपर्यंतच्या वाट्टेल त्या टिप्पण्या उघडपणे आणि जाहीरपणे केल्या गेल्या. यात कोणत्याही सांस्कृतिक मुद्द्याला ओढण्याची गरज नाही. मात्र या विषयावर चर्चा करणं जितकं आवश्यक आहे तितकंच या विषयाबद्दलच्या आदर्शवादी कल्पनांना लगाम घालणंही गरजेचं आहे आणि त्यासाठी हा लेख...


kissing_1  H x

मुद्देसूद सांगायचं तर किस करणं म्हणजे काय इथून सुरुवात करावी लागेल. हा प्रश्न कदाचित बालीश असू शकेल, अनावश्यक असू शकेल किंवा अनाठायीही असू शकेल. मात्र हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की किस करणं हे कोणतंही एका पद्धतीचं टेक्निक किंवा तंत्र नसून ती भावनावेगातून घडलेली शारीरिक क्रिया असते. मेंदूतल्या काही हॉर्मोन्समुळे हा भावनावेग उत्पन्न होतो आणि तोच पुढील क्रियांना चालना देतो. या क्रियेतला प्रत्येक निर्णय हा मेंदूमधील हॉर्मोन्सकडून घेतला जातो. त्यामुळे त्यात कोणत्याही तंत्राची अपेक्षा करणं हे भावनांच्या कोरडेपणाचं लक्षण आहे. यात शरीरशास्त्राच्या मानसशास्त्राच्या अभ्यासाचा अभाव आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य आणि अचूक किसिंग म्हणजे नेमकं काय? यासाठी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण किसिंग कुठे पाहिलं? सुरुवातीला तर रोमान्सची संकल्पना हातात हात धरण्यापर्यंतच मर्यादित होती आणि चित्रपटासारख्या माध्यमात तर दोन सूर्यफूलं दाखवली जायची. जेव्हा किसिंग सीन्सनी चित्रपटात प्रवेश केला तेव्हा प्रत्यक्ष किसिंग कोणी पाहिलं होतं? आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांनी तर नाहीच! मग आपल्याला किसिंग कुठून माहीत झालं तर चित्रपटातून.. चित्रपटातून म्हणजे ते दाखवणाऱ्याच्या नजरेने आपण त्याकडे पाहिलं आणि त्यालाच ‘योग्य’ किसिंग असं समजायला लागलो. पॉर्नमध्ये किसिंग पाहिलं, तेही आर्टिफिशियल होतं, त्यामुळे त्याला आदर्श मानूनही आपण चूकच केली असं म्हणायला हवं. कोणत्याही एका माणसाच्या भावनावेगाची दुसऱ्या माणसाच्या भावनावेगाशी तुलना करणं हे मानवतेच्या आणि तार्किक अशा दोन्ही दृष्टींनीही अयोग्यच!

मग योग्य किसिंग कोणतं? तर अर्थात कोणतंच नाही! कारण तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ती प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत आहे. कोणत्याच एका पद्धतीने केलेलं किसिंग हे दुसऱ्या व्यक्तीसाठी योग्य असू शकत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर या संकल्पना थांबवणं आणि ही तुलना बंद करणं आवश्यक आहे.


-वेदवती चिपळूणकर