स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ही अजरामर गीते आजच्या दिवशी ऐकाच..

    28-May-2020   
|

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले की डोळ्यासमोर येतं ते एक तेजपुंज व्यक्तिमत्व, पूर्ण स्वातंत्र्याची दिशा भारताला देणारे, समुद्रात कितीक लांब पोहून जाणारे, देशसेवेसाठी काळ्यापाण्याची शिक्षा होऊन सुद्धा ताठ मानेने देशाच्या सेवेत आपलं संपूर्ण जीवन झोकून देणारे सावरकर. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तलवार, सावरकर म्हणजे तळमळ, सावरकर म्हणजे तितिक्षा, सावरकर म्हणजे तिखट. तर अशा या वीर सावरकरांनी त्यांच्या लेखणीतून भारताला एक अनमोल भेट दिली आहे. सावरकरांचं साहित्य म्हणजे ज्ञानसागर. अशा त्यांच्या ये लेखणीतून अवतरलेली काही गीते, म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी, तेवढच नाही तर देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आयुष्य भराची एक शिकवण आहे. आज आपण अशाच या काही गीतांची उजळणी करणार आहोत.


veer sawarkar_1 &nbs१. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला : “अभिमानानं हे गीत आपण अनेकदा ऐकलं, म्हटलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं. या गीतामागे आहेत भरपूर वेदना. सावरकारांनी थेट सिंहाच्या गुहेत जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निश्चय करत लंदन येथे बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्याची सुरुवात केली, आणि त्यानंतर लंदन येथील सत्तेला मुळापासून हलवून टाकण्यासाठी त्यांनी हालचाल सुरु केली. पुढे हळू हळू सर्व गोष्टी घडत गेल्या. सावकरांचे कार्य जगासमोर येत होते, लंदनला त्यांची भिती होती, त्यांच्या कामाची भिती होती. याचवेळी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. मदनलाल यांच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उध्वस्त होण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत तिथे सावरकरांचं घर मोडकळीला आलं होतं, दोघेही भाऊ पकडले गेले होते. आणि अटक झाल्यास त्यांना भारतात पाठवता येईलच असेही नव्हते, आणि असे सर्व असताना ज्या मातृभूमीसाठी आपण हे सर्व करतोय त्या मातृभूमिपासून आपण लांब आहोत हा विचार अस्वस्थ करणारा होता, आणि त्या अस्वस्थतेतून निर्माण झाले हे गीत.. 

सागरा प्राण तळमळला… तळमळला.. सागरा !!!!

 


२. जयोस्तुते जयोस्तुते : भारत देशाच्या स्वातंत्र्याचं गौरव गान म्हणजे हे गीत. यागीताचे शब्दन शब्द स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या जीवनाच्या उद्येश्य सांगतात. “तुजसाठिं मरण तें जनन तुजविण जनन ते मरण” या शब्दांमधून देशासाठी सावरकरांनी वाहून टाकलेल्या त्यांच्या आयुष्याची प्रचिती येते. सावरकरांनी देशाला पूर्ण स्वातंत्र्याचं स्वप्न दिलं, हा मंत्र दिला. आणि याच मंत्र्याचे यशोगान म्हणजे ‘जयोस्तुते’ हे गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या गीताला चाल लावली आणि लता मंगेशकर यांनी हे गीत गायलं आहे. त्यांच्या आवाजातील हे गीत आजही अंगावर शहारे आणतं. या गीतामध्ये वीर सावरकरांनी त्यांचा जीव ओतला आहे. आणि या गीताच्या प्रत्येका शब्दातून आपल्याला ते जाणवतं. 

स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची…


३. जय देव जय देव जय जय शिवराया : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत | आणि या दैवताची आरती लिहील्या गेली ती सावरकरांच्या हातून. “आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला, आला आला सावध हो शिवभूपाला” या शब्दांमधून त्यांनी महाराष्ट्राच्या तारणहार छत्रपती शिवरायांची भक्ति केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानून त्यांची आरती आजही महाराष्ट्रात होते, आणि ही आरती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धगधगत्या लेखणीतून येणं म्हणजे एक महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य भेट.

साधुपरित्राणाया, दुष्कृति नाशाया, भगवन भगवतगीता सार्थ करायाया…


 ४. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा : छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराष्ट्राला एक भेट तर दिलीच होती. त्यानंतर त्यांच्या लेखणीतून जन्मले हे अरजामर गीत. “हे हिंदू नृसिहा प्रभो शिवाजी राजा.” शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे म्हणतात, “ अहोरात्र लाथा बुक्क्यांचे असंख्य प्रहार सहन करित उभा असलेला संह्याद्रीचा स्तंभ कडकडला, दाही दिशा थरथरल्या, कालकृपुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि जनशक्तिचा आणि शिवशक्तिचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करित करित प्रकट झाला. अनंत हातांचे आणि तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते… शिवराय !!!” या गीताचे याहून सुंदर वर्णन असेल ते काय..
ही गीते आपल्या सगळ्यांसाठीच एक अमूल्य ठएवा आहे. देशाचा गौरव आहे, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीचा गाभा आहे. या गीतांच्या माध्यमातून या महामानवाला आज पुन्हा एकदा आदरांजली अर्पण. 

- निहारिका पोळ सर्वटे