Short and Crisp: कांदे पोहे

    11-May-2020   
|

कांदे पोहे, म्हणजेच मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा जणू अलिखित नियमच आहे. आणि प्रत्येक कांदे पोह्याच्या कार्यक्रमामागे काही ना काही मजेदार अशी स्टोरी असतेच. या कांदे पोह्याच्या मागे देखील आहे. तर ही एक अशीच मजेदार शॉर्टफिल्म आहे. ही कथा आहे संजय आणि मनीषा या दोघांची. ज्यांच्या परिवारांनी त्यांना लग्न जमवण्याच्या कार्यक्रमासाठी भेटवले आहे. सुरुवात मजे- मजेतच होते. अतिशय सुंदर साधी सोज्वळ अशी मुलगी समोर येते. घरच्यांचं बोलणं होतं, आणि ते दोघांना एकट्यात बोलण्यासाठी गच्चीवर पाठवतात. इथेच येते खरी गंमत.


Kande Pohe_1  H


काहीही न बोलणाऱ्या, गप्प गप्प राहणाऱ्या, आणि मध्येच मोबाइलमध्ये घुसून जाणाऱ्या मनीषाची कळी खुलते. ती बोलायला लागते. त्यात संजय तिला म्हणतो, “हे बघ मी ना खुल्या विचारांचा आहे, एकदम फॉरवर्ड, कॉलेज नंतर तू काम तर करशील ना? माझ्या सर्व मित्रांतच्या बायका जॉब करतात. समाजात इंप्रेशन वाढतं ना.” त्यावर तिचं उत्तरही खूप मजेदार असतं. ती म्हणते “मी करिअर सोडणार नाही. मात्र माझ्या आई वडीलांना माझं करिअर आवडत नाही ना.. असं म्हणून ती त्याला मोबाइल दाखवते. आणि संजयच्या तोंडातून निघतं.. "आईचा घो..." का बरं? 

काय असतं तिचं करिअर ? आणि का तिच्यासाठी ते खूप महत्वाचं असतं. तिला ५ मिलियन लोक का फॉलो करतात? हे  सगळं हा लघुपट बघितल्यावर लक्षात येतं. त्यापुढे नुसती मज्जाच मज्जा आहे. ती संजय समोर एक अट ठेवते लग्नासाठी ती अट काय असते? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा.आजकल टिकटॉक वर, यूट्यूबवर मोठे मोठे स्टार्स झाले आहेच. मात्र त्यांच्या या स्टार्डमकडे किंवा त्यांच्या या व्हिडियोजकडे करिअर म्हणून बघितले जात नाही. काही लोकांच्या कंटेट विषयी न बोललेलंच बरं, मात्र काही असे देखील लोक आहेत ज्यांचा कंटेंट खरंच खूप चांगला असतो, आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलला एक सीरिअस करिअर म्हणून बघितलं जाऊ शकतं, त्याविषयीच काहीसा असलेला हा लघुपट.


अहसास चन्ना आणि तुषार पांडे यांनी या लघुपटात मुख्य भूमिका साकारली आहे. आणि या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे शुभम योगी यांनी. मजा येईल बघताना असा हा लघुपट आहे. टेरिबली टाईनी टेल्स या चॅनलतर्फे हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या लघुपटाला यूट्यूबवर 24 lakh हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  वेगळ्या धाटणीचा वेगळा लघुपट.

- निहारिका पोळ सर्वटे