माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती व विजिगिषु वृत्तीचे दर्शन करवणारा "टोगो"

05 Apr 2020 17:59:47

डिजनी स्टुडिओ कायम असे चित्रपट निर्माण करते जे सकारात्मक असतात. याच त्यांच्या पठडीतील सत्यकथेवर आधारित "टोगो" आपल्याला माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती व विजिगिषु वृत्तीचे दर्शन करवतो. हि कथा प्रासंगिक तर आहेच पण वर्तमानाशी एक साम्य आहे तो म्हणजे "साथीचा आजार".


togo_1  H x W:


सध्या करोनाच्या संकटाने सर्व जगाला ग्रासले आहे. माणसे किड्या मुंग्यासारखी मरत आहेत व पूर्ण भारत लॉकडाऊन मध्ये आहे. अशा काळात बंदिस्त अवस्थेत माणसाच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी "टोगो" नक्की पाहावा

अमेरिकेच्या अलास्का राज्यात "नोम" नावाचे शहर आहे. १९२५ साली या शहराला घटसर्पाच्या (Diphtheria) साथीने ग्रासले व अनेक मुलांचे बळी गेले. साधनांची कमतरता विपरीत ऋतू, सततची बर्फवृष्टी अशा अवस्थेत तिथे लस कशी पोहोचणार? लस उपलब्ध असून फक्त निसर्गाची साथ नसल्याने पोहचू शकत नाही? अशा अवस्थेत तेथील लोकांना आपल्या मुलांचे मृत्यु पाहण्याशिवाय काहीच उरत नाही. इतकेच नाही तर हिवाळा संपेपर्यंत वाट पाहिल्यास नोम व आसपास ची १०,००० लोक याचा बळी जातील याची शक्यता असते.

बर्फाळ प्रदेशात हिवाळ्यात बारीक सारीक वाहतूक करण्यासाठी Dog sled चा वापर केला जातो. स्थानिक प्रशासन याचा वापर करून हि लस आणता येईल का याचा विचार करते. सततची बर्फवृष्टी, हिमवादळे व ६७४ मैल (१०८५ किमी) चा प्रवास म्हणजे साक्षात मृत्यूस आमंत्रण. लिओनार्ड सेपेला (Leonhard Seppala) कडे हि जबाबदारी सोपवण्यात येते. सेपेला हा अलास्का मध्ये चालणाऱ्या "स्लेज डॉग रेस" चा पूर्व विजेता असतो.


सेपेला व त्याचा कुत्रा "टोगो" या मोहिमेवर निघतात. यानंतर जो काही प्रवास आहे तो माणसाच्या काळजाचा ठोका चुकवणाराआहे. "हिमवादळे, हिमनदी, बर्फाचे पर्वत आणि माणसाची दुर्दम्य इच्छा शक्ती व मालकावर जीव टाकणारा त्याचा कुत्रा टोगो" हे सर्व अनुभवायचे असेल तर चित्रपट नक्की पहा सध्या तो Hotstar वर उपलब्ध आहे.

माणूस व इतर प्राणी यातील जर सर्वात मोठा फरक कोठला असेल तर तो म्हणजे आपण भूतकाळापासून शिकतो. "करोनाच्या साथीच्या" या काळात आपण बरेच काही या चित्रपटातून शिकू शकतो. सकारात्मकता, इच्छाशक्ती, लढण्याची वृत्ती, माणसाचा माणसावरील विश्वास, माणसाचा प्राण्यांवरील विश्वास, प्रेम अश्या बऱ्याच गुणांची पखरण हा चित्रपट करतो. नक्की पहा आणि आपले मत आम्हाला कळवायला विसरू नका.

- अमोल पवार 

Powered By Sangraha 9.0