RIP इरफान खान.. प्रेक्षकांच्या लाडक्या पानसिंग तोमर ला देवाज्ञा

29 Apr 2020 12:51:41

कालच बातमी आली कि इरफान खान यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले आहे. त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. आणि तेव्हा पासूनच त्यांच्या विषयी अनेक बातम्या येत होत्या. अखेर ही बातमी खरी ठरली, आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून इरफान खान देवाघरी गेले. प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा रोग झाल्याचे निदान झाले होते. गेल्या २ वर्षांपासून त्यांच्यावर लंदन इथे उपचार सुरु होते. २०१९ मध्ये ते भारतात परत आले, त्यानंतर त्यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट देखील आला, काल त्यांची तब्येत पुन्हा खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांच्या या रोगासोबत असलेल्या लढाईचा अंत झाला, आणि त्यांची प्राणज्योत मालवली.


Irrfan_1  H x W


इरफान खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे सगळ्यात जास्त लक्षात राहणारे चित्रपण म्हणजे कारवाँ, हिंदी मीडियम, अंग्रेजी मीडियम, लाइफ ऑफ अ पाय, पीकू, जुरासिक वर्ल्ड, पानसिंग तोमर आहेत. आज लोकांना आठवतोय तो पीकूचा ड्रायव्हर, पानसिंग तोमर आणि हैदरचा रूहदार. “इरफानने नेहमीच आपल्या परिवाराची खूप काळजी घेतली, तो आपल्या परिवारासाठी जगला, आणि आज तो आम्हाला सोडून निघून गेला आहे, मात्र मागे ठएवून जातोय आपला वारसा. त्याच्या अभिनयाचा, त्याच्या सच्चेपणाचा.” या शब्दात त्यांच्या परिवारानेही बातमी जाहीर केली.



मार्च २०१८ मध्ये त्यांना असलेल्या रोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी स्वत:च ही बातमी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली होती. त्यांनी लिहीले होते, “कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात, ज्यातून आपलं आयुष्य पूर्ण बदलून जातं, जे आपल्याला हलवून टाकणारं असतं. मला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर या रोगाचे निदान झाले आहे. गेले १५ दिवस माझ्या आयुष्यातील सस्पेंस स्टोरी आहे. मला एका अतिशय दुर्मिळ रोगाचे निदान झाले आहे. मी कधीच हार मानली नाही, आणि यापुढेही मानणार नाही. मी स्वत: या बाबत तुम्हाला सांगत राहीन, तोवर माझ्यासाठी प्रार्थना करा.”



तेव्हा त्यांच्या फॅन्सना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती कि दोन वर्षांनंतर त्यांचा लाडका अभिनेता त्यांना सोडून गेलेला असेल. नुकतेच इरफान खान यांच्या आईचे निधन झाले होते. लॉकडाउनमुळे ते आपल्या आईच्या जनाज्यात सहभागी होऊ शकले नाहीत. त्याच्या काही दिवस आधीच त्यांच्या बहिणीचे देखील निधन झाले होते. खान परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. इरफानच्या रुपात भारतीय सिनेसृष्टीने माळेतला एक अतिशय सुरेख असा मोती गमावला आहे.








सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इरफान प्रति आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. सिनेसृष्टीसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे.


Irrfan_1  H x W


इरफान खान अजरामर आहेत, ते त्यांच्या कलाकृतिंच्या स्वरूपात त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य जागवत राहतील. ते गेले मात्र आपल्याला एक खूप छान शिकवण आणि खूप साऱ्या आठवणी देऊन गेले. त्यांच्याच शब्दात म्हणायचं झालं तर.. “चांद पे बाद में जाना जमाने वालों, पहले धरती पर रहना तो सीख लो..”


Powered By Sangraha 9.0