फेसबुकची जीओ मधील गुंतवणूक, भारतासाठी सुवर्णसंधी ?

    23-Apr-2020   
|

भारताच्या अर्थ व्यवस्थेबद्दल अनेक तर्क वितर्क गेली काही महीने होत होती. त्यातून कोविड-१९ झाल्यापासून तर भारताची अर्थव्यवस्था खालवली आहे, आणि खालवणार आहे, असे सांगण्यात येत होते. या महामारीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नक्कीच होईल. मात्र या महामारीनंतर भारतातील मध्यम व लहान उद्योगांसाठी सुवर्णसंधी असेल का ? छोट्या छोट्या गोष्टींमधून, उद्योगांमधूनच मोठे उद्योग उभे राहतात. फेसबुकने आज जीओ सोबत जाहीर केलेल्या गुंतवणूकीनंतर असे म्हटले जात आहे कि येणारा काळ भारतासाठी आणि भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांसाठी सुवर्णकाळ ठरेल. 


Facebook JIo_1  


कालच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून भारतातील जीओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. यामध्ये त्यांनी काही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, ते म्हणाले आहेत. “या काळात भारतात अनेक लहान उद्योग डिजिटयालझेशन कडे वळताएत. लहान उद्योग हे कुठल्याही अर्थव्यवस्थेचा पाया असतात, त्यामुळे आताच्या घटकेला हे अत्यंत महत्वाचं आहे.” त्यांचं शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. 

जीओचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. ईकॉमर्स बद्दल म्हटले तर या गुंतवणूकीनंतर जीओ एमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या महत्वाच्या ई कॉमर्स वेबसाईट्स सोबत प्रतिस्पर्धा करेल, डिजीटल पेमेंट्स बद्दल बोलायले गेले तर पेटीएम, गूगल पे, फोन पे सारख्या प्रसिद्ध आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या पेमेंट एप्स सोबत जीओची प्रतिस्पर्धा असेल. जीओ मार्ट आणि जीओच्या इतर प्लॅटफॉर्म्सना व्हॉट्सएपसोबत जोडले तर छोट्या किराणा दुकानदारांना आणि छोट्या दुकानांना मोठ्या ग्राहकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहक आणि छोट्या दुकानदारांना जोडणारी ही कल्पना आहे. आताच्या परिस्थितीसाठी स्वदेशी कडे वळणं महत्वाचं आहे. आणि त्यातून फेसबुकसारखी मोठी कंपनी जर भारताच्या कंपनीत मोठी गुंतवणूक करत असेल तर हे भारताच्या भविष्यासाठी नक्कीच महत्वाचं आहे. ही गुंतवणूक देखील काही लहान नाही तर, 43,574 कोटी रुपयांची असणार आहे. म्हणजेच ९.९९% स्टेक्सची पार्टनरशिप. 
जीओ आता ६० मिलियन लहान उद्योगांकडे वळू शकेल, यामाध्यमातून असंगठित क्षेत्राला पुढे खूप मोठा फायदा होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मार्क झुकरबर्ग पुढे म्हणतात, “लॉकडाउनसारख्या काळात या लहान उद्योजकांना डिजीटल टूल्सची आवश्यकता आहे, ज्याच्या माध्यमातून ते ग्राहकांपर्यंत पोहचू शकतील आणि आपला उद्योग वाढवू शकतील.” व्हॉट्सएप आणि फेसबुक बिझनेसच्या माध्यमातून या उद्योजकांना ऑनलाइन माध्यमांवर आपले सामान विकता येईल. त्यामुळे येत्याकाळात या निर्णयामुळे लहान उद्योजकांना मोठा फायदा होणार असे दिसून येत आहे.

झुकरबर्ग यांच्या पोस्ट मधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, ते लिहीतात, “भारतात फेसबुक आणि व्हॉट्सएप वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, सोबतच इथे खूप प्रतिभा असलेले उद्योजक आहेत. भारत देश हा खूप मोठ्या डिजीटल ट्रांस्फॉर्मेशनच्या काळातून जात आहे, असे असताना जिओच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात लोक आणि उद्योजक हे ऑनलाइन आले आहेत. हा निर्णय आता घेणं महत्वाचं आहे कारण हे लहान उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत, आणि ६० दशलक्षाहून अधिक लोक रोजगारासाठी या उद्योजकांवर अवलंबून आहेत. यामुळे आम्ही जीओ सोबत पार्टनरशिप करून नव्या संधीं उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत." असे म्हणत त्यांनी मुकेश अंबानी आणि रिलायंस कंपनीचे आभार देखील मानले आहेत. 


Facebook JIo_1  


रिलायंसने गेल्या काही काळात आर्टिफिशिअल इंटेलिजंस, ई गव्हर्नंस आणि स्थानिक भाषांसंबंधी उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आणि याचा सर्वाधिक फायदा जर कुणाला होणार असेल तर ते म्हणजे स्मॉल स्केल उद्योग अर्थाल लहान आणि मध्यम उद्योगांना. 

लॉकाडाउनमुळे ईकॉमर्स कंपन्यांना असलेल्या मर्यादा समोर आल्या आहेत. मोठ मोठाले मार्ट्स होम डिलिव्हरी देऊ शकत नाहीयेत, त्यामुळे या लहान उद्योग आणि छोट्या दुकानांचं महत्व पटलं आहे. या उद्योगांना डिजिटलाइज करुन मुख्यप्रवाहात आणून फेसबुक आणि व्हॉट्सएपसोबत जोडल्याने ग्राहकांचा देखील फायदा होईल आणि उद्योजकांचाही. फेसबुक आणि व्हॉट्सएपसोबत टायअप केल्याने ग्राहकांसाठी या उद्योजकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. भारताच्या 'रीटेल सेक्टर'चं भविष्य या मॉडेलमुळे उजळेल अशी संकल्पना रीसर्चनच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. 

आपल्याला आठवतं नोटबंदीनंतर ज्यावेळेला पेटीएमचा वापर वाढला, तेव्हा अनेक लहान लहान दुकानांना, भाजीवाल्यांना, टपरीवाल्यांना एक मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म मिळालं, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला आणि डिजिटली ते स्थिरावले. कदाचित जीओ आणि फेसबुकचं हे मॉडेल अशाच प्रकारचं मात्र मोठं असेल. यामुळे भारतातील रीटेल क्षेत्राला नक्कीच मोठा लाभ होईल असे दिसून येते. 

देशावर मोठं संकट आलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसह एकूणच जगात म्हणजेच ग्लोबली अर्थव्यवस्थेवर या महामारीचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. मात्र असं म्हणतात मोठ मोठ्या संकटांना देखील संधीत परिवर्तित करण्याती शक्ती माणसात आहे, आपण जर या समस्येतून संधी शोधली तर नक्कीच आपल्या देशाच्या आर्थिक गणिताची घडी नीट बसेल. जीओ आणि फेसबुकच्या या भागीदारीमुळे उद्योजकांसाठी नक्कीच एक आशेची किरण नक्कीच निर्माण होईल असं चित्र हळू हळू स्पष्ट होत आहे. 


- निहारिका पोळ सर्वटे