त्यांचं चुकलं.. त्या निरागस साधूंनी विश्वास ठेवला..

    20-Apr-2020   
|

पालघर येथे जमावाने साधूंच्या केलेल्या क्रूर हत्येचे व्हिडियोज व्हायरल झाले, आणि अख्या महाराष्ट्राची झोप उडाली. पालघर येथे दोन साधू एका आप्तेष्टाचा अंत्यसंस्कारासाठी जात असताना, पोलिसांनी त्यांना लॉकडाउनमुळे हायवे वरुन जाण्यास रोखले, त्यामुळे त्यांनी ग्रामीण रस्ता पकडला. मात्र या गावाकडच्या रस्त्यावर त्यांचा अत्यंत क्रूर असा मृत्यु लिहून ठेवला होता. जूना अखाड्यातील हे दोन साधू गुजरातला निघाले असताना पालघर येथे अफवाह पसरली की ते चोर आहेत. आणि केवळ या एका ‘संशयावरुन’ पोलिसांसमोर जमावाने त्यांना ठेचून ठेचून मारले. ही घटना अतिशय भीषण आहे. ७० वर्षांचे दोन निरागस साधू पोलिसांकडे मदत मागतात, त्यांचा हात घट्ट धरून ठेवतात कारण त्यांना भिती असते कि हा जमाव संशयावरुन त्यांना हानि पोहोचवेल. आणि पोलिस स्वत:च्या जीवाचे रक्षण करण्यासाठी या दोन बिचाऱ्या साधूंना राक्षस जमावाच्या स्वाधीन करतात? का म्हणून?


palghar_1  H x


या घटनेचे व्हिडियोज भयंकर आहेत, आपल्याला अस्वस्थ करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडावी? सरकार बदलले आणि महाराष्ट्राचे चित्रही बदललेले दिसते. अशा गोष्टींवर राजकारण करू नये, मात्र ज्यावेळी पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखातं आपल्याकडे ठेवलं होतं, त्यावेळी अनेकांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले, त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची भीषण घटना घडली नाही, कारण गृहखात्यावर पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचं लक्ष्य होतं. आता तीन पायाचं सरकार असल्या कारणाने राज्यातील कायदा सुव्यवस्था ‘भगवान भरोसे’ आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही, त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे पालघर येथील घटना.समोर मोठा जमाव आहे, या जमावाकडे दगडं, लाठ्या आणि हत्यारं आहेत. त्या साधूंकडे साधी काठी पण नव्हती, ७० वर्षांचे म्हातारे साधू केवळ भगव्या वस्त्रांमुळे बळी पडले? आणि राज्याचे पोलिस हा सगळा खेळ बघत बसले? त्यांचे काम संरक्षण देणे होते, व्हिडियो मध्ये दिसून येतं, हे साधू हात जोडून सतत आपल्या जीवाची भीक मागताएत पोलिसांकडे, आणि पोलिसांनी काय केले? जमावाच्या ताब्यात या दोन्ही साधूंना देऊन मोकळे झाले? अतिशय चीड आणणारी ही घटना आहे.


या घटनेतील महत्वाचे मुद्दे :

१. घटना १६ तारखेला घडली, मग सरकारतर्फे या घटनेबद्दल का सांगण्यात आले नाही ?

 

२. पोलिसांसमोर घटना घडत होती, या पोलिसांकडे पिस्तुल, काठ्या नव्हत्या का?
३. पोलिसांकडे त्यांच्या वरीष्ठांचे मोबाइल नंबर नव्हते का? बराच वेळ जमाव, साधूंना बेदम मारहाण करत असताना, पोलिसांनी काहीच का केलं नाही?
४. जमावाला बघून, परिस्थितीची तीव्रता बघून पोलिसांनी या साधूंना जमावासमोर बाहेर काढलेच का? त्यांना आतच का ठेवण्यात आले नाही?
५. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर सामान्य जनतेने विश्वास कसा ठेवायचा? पुढे कधीही कुणीही राज्यातील पोलिसांकडे ‘आपले संरक्षणकर्ते’ अशा नजरेने का बघतील ?


या घटनेवर सरकारतर्फे ट्वीट, माहिती, ही व्हिडियोज व्हायरल झाल्यानंतर देण्यात आली. असे सांगण्यात येत आहे कि एकूण ११० आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र हे बघून हिंदीतील एक म्हण आठवते ‘अब पछताए क्या होत, जब चिडिया चुग गई खेत’. अर्थात पोलिसांनी आता अटक जरी केली, न्याय जरी मिळवून दिला तरी त्या साधूंचा जीव त्याने परत येणार नाहीये. आणि ज्यावेळी पोलिस जीव वाचवू शकत होते, त्यावेळी त्यांनी या साधूंना जमावाला सुपूर्द करत त्यांच्या मृत्यूचा खेळ उघड्या डोळ्यांनी बघितला आहे, त्यामुळे आता सरकारने आणि राज्य पोलिसांनी कितीही आव आणून ‘आम्ही हे केलं, आम्ही ते केलं’ सांगण्याचा प्रयत्न जरी केला, तरी देखील त्यांच्यावर असलेला थोडाफार विश्वासही आता उडालेला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


palghar_1  H x


त्या साधूंचं चुकलंच. पोलिसांवर केलाला निरागस विश्वास चुकीचा होता, आपण सच्चे आहोत म्हणून आपल्याला देवरूपी पोलिस वाचवतील हा भाभडा विश्वास चुकीचा होता. ७० वर्षांचे साधू ठेचून ठेचून मारले जातात, पोलिस दल उघड्याडोळ्यांनी हे सगळं बघतात, राज्याचं सरकार ४ दिवसांनी जागं होतं आणि सामान्य माणसाचा विश्वास समाजावरून, पोलिसांवरुन आणि सरकारवरुन उठून जातो, यासारखी भीषण शोकांतिका नाही.


- निहारिका पोळ सर्वटे