राहुल बोसच्या पोळीतून मिळतेय अनेक ‘मुलांना’ कुकिंगची प्रेरणा

    15-Apr-2020
|

आता लॉकडाउन आहे. पुढील ३ मे पर्यंत असणार आहे. आणि अशा परिस्थितीत घरात शिजवलेलं अन्न खाण्याशिवाय पर्याय नाही. बरं कोणी अन्न शिजवून द्यायला घरी नसेल तर काय कराल? ही व्यथा पीजी मध्ये राहणाऱ्या किंवा एकटे राहणाऱ्या अनेकांची असेल. कितीही काहीही म्हटलं तरी आपल्या इथे सुरुवातीपासूनच ‘स्वयंपाक’ हा स्त्रियांचा विषय मानला जायचा. आजही आपल्या सारख्या अनेक घरांमधून आपण आपल्या वडीलांना स्वयंपाक करताना किंवा ओटा आवरातान बघितल्याच्या घटना जरा कमीच दिसून येतील, अगदी बोटावर मोजण्या इतक्या. आता मात्र परिस्थिती हळू हळू बदलतेय. ती पूर्ण बदलायला अजूनही अवकाशच आहे म्हणा. पण या सगळ्या परिस्थितीत सेलिब्रिटीजच्या इंस्टाग्राममुळे स्वयंपाक करता न येणाऱ्या लोकांना आणि खासकरून ‘मुलांना’ विशेष प्रेरणा मिळतेय. नुकतेच अभिनेता राहुल बोस याने आपल्या इंस्टाग्राम वरुन एक व्हिडियो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने पहिल्यांदाच पोळी बनवली आहे.


Rahul Bose_1  H

तो आपल्या पोस्ट मध्ये लिहीतो. “मी एकटा राहतो. आणि मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे थोरात परिवार म्हणजेच माझ्या आईच्या माहेरच्या परिवाराकडून नेहमीच माझी थट्टा करण्यात आली. आता लॉकडाउन असल्यामुळे मी ठरवले आहे कि आपण स्वयंपाक शिकायचा. त्याचा हा पहिलाच प्रयत्न. मी आज पर्यंत कधी गॅसला हातही लावला नसताना कणिक मळण्यापासून ते पोळी लाटून ती तव्यावर भाजण्यापर्यंत आज सर्व मीच केलं. त्यामुळे माझे स्वयंपाक भविष्य तुमच्या हातात आहे. प्रस्तुत आहे पोळी किंवा फुलका.”ही परिस्थिती केवळ राहुल बोसचीच नाहीये. आपल्या समाजात आजही अनेकदा मुलींना तुझं शिक्षण किती झालं, किंवा तू कुठे नोकरी करतेस हे विचारण्याआधी तुला स्वयंपाक येतो का हे विचारलं जातं, मात्र ते मुलांना विचारलं जात नाही. आणि सुरुवाती पासूनच त्यांनी घरी तसं वातावरण न बघितल्याने, वडीलांना स्वयंपाक घरात काम करताना न बघितल्याने त्यांना ती सवय नसते. मात्र भविष्यात नवरा बायको दोघंच घरात राहत असताना, किंवा परदेशी एकटं रहावं लागत असताना स्वयंपाक शिकून घेण्याशिवाय पर्याय नसतो. इंटरेस्ट नाही असंही करता येत नाही, कारण शेवटी प्रश्न पोटाचा आहे. त्यामुळे राहुल बोसने हा व्हिडियो पोस्ट केला त्याबद्दल अनेकांनी त्यांना धन्यवाद अशी कमेंट केली आहे. कारण यामुळे का होईना मुलं देखील स्वयंपाक घरात जाऊन पहिला प्रयत्न करण्याची हिंमत करतील. भूक सगळ्यांनाच लागते त्यामुळे स्वयंपाक हा प्रत्येकाला आलाच पाहीजे.