महिला सुरक्षेच्या थोबाडीत मारणारा लघुपट : “देवी”

    04-Mar-2020   
|

आपल्या इथे म्हणजे भारतात म्हटलं जातं “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता”. मात्र खरंच आपल्याकडे हे पाळलं जातं? मुली सुरक्षित आहेत? लहानानांपासून मोठ्यांपर्यंत? चिमुकल्यांपासून आज्यांपर्यंत? आणि ज्यांच्या सोबत अत्याचार झाला, ज्यांचा या अत्याचारात मृत्यु झाला, त्यांचा आत्मा शांत कसा होणार? असे एक नाही हजार प्रश्न मनात उपस्थित करणारा, शेवटच्या सीनला अंगावर शहारे देणारा, आणि डोळ्यात पाणी आणणारा लघुपट म्हणजे ‘देवी’.


Devi_1  H x W:


काजोल, मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, नेहा धूपिया, श्रुति हासन, शिवानी रघुवंशी, यशस्विनी दायमा, संध्या म्हात्रे, रमा जोशी अशा सगळ्यांनी मिळून या लघुपटात एकदाही ‘बलात्कार’ हा शब्द न उच्चारता केवळ त्यांच्या प्रभावी संवादांमधून आणि अभिनयातून जे काही काम केलं आहे, त्यासाठी शब्द नाहीत | लघुपटाच्या कथेविषयी सांगितले तर ते बघण्यात जे ‘फील’ येतं, ते येणार नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी दिवसभरातील 13 मिनिटे बाजूला काढून हा लघुपट अवश्य बघावा.लघुपट खूप सुंदर आणि प्रभावी पद्धतीने लिहीला गेला आहे. एक भयंकर सत्य, एक भीषण परिस्थिती या लघुपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येते, आणि आपले डोळे खाडकन उघडतात. लघुपटाची सुरुवात होते, तेव्हा विषय काय आहे हे पटकन लक्षात येत नाही, मात्र हळु हळु हा लघुपट उलगडत जातो आणि एक भीषण सत्य समोर येतं.केवळ २४ तासातच या लघुपटाला ३५ लाख लोकांनी बघितले आहे. आणि हा लघुपट यूट्यूब वर ट्रेंड करतो आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे प्रियंका बॅनर्जी यांनी. लघुपटात प्रत्येक महिलेचं प्रतिकात्मक रूप दाखवलं आहे, मग ती काजोल सारखी एक गृहिणी असेल, किंवा नेहा धूपिया सारखी एक कॉर्पोरेट वर्किंग वुमन, शिवानी रघुवंशी सारखी एक मेडिकल विद्यार्थी, यशस्विनी दायमा सारखी मूक बधीर मुलगी, नीना कुलकर्णी सारखी वयस्कर महिला, मुक्ता बर्वे सारखी एक मुस्लिम महिला किंवा श्रुति हासन सारखी एक मॉडर्न मुलगी किंवा शेवटी……… कुणीही असू देत| बलात्कार हा कपडे बघून, आर्थिक स्टेटस बघून किंवा वय बघून होत नाहीत, ही एक मानसिक विकृति आहे, हा संदेश यामधून देण्यात आला आहे. तो ही Loud and Clear अशा स्वरूपात.


अवश्य बघावा, प्रत्येकाने. महिलांनी तर नक्कीच आणि त्याहूनही जास्त पुरुषांनी !!!

- निहारिका पोळ सर्वटे