पुन्हा एकदा ऐकू येणार प्रत्येक घरातून ‘मंगल भवन अमंगल हारी’...

    27-Mar-2020
|


रविवारची सकाळ, घरोघरी ‘मंगल भवन अमंगल हारी…’ एकू येतंय, टीव्हीवर रामायण लागलेलं आहे, संपूर्ण परिवार भक्तिभावाने रामायण बघतोय जणू काही साक्षात श्रीराम प्रकटले आहेत, आणि एकूणच वातावरण प्रसन्न झालंय. नॉस्टेल्जिक वाटलं ना? गेलात ना तुम्ही पण ८०-९०च्या दशकात? मात्र हे दृश्य पुन्हा एकदा आपल्याला दिसणार आहे. अगदी असंच २०२० मध्ये. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाचे मनोबल वाढविण्यासाठी डीडी नॅशनल वर उद्या म्हणजे २८ मार्च पासून रोज रामानंद सागर यांचे ‘रामायण’ ही मालिका दाखविण्यात येणार आहे.


ramayan_1  H x


ही एक अतिशय आनंद देणारी बाब आहे. आपण सगळेच पुन्हा एकदा आपलं लहानपण अनुभवू शकतो, पुन्हा एकदा जुन्या दूरदर्शनच्या काळात जाऊन तो काळ अनुभवू शकतो. कठीण प्रसंगी मनोधैर्य वाढवण्यासाठी घेण्यात आलेला हा उत्तम निर्णय आहे. जनतेच्या मागणीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत संपूर्ण परिवार एकत्र बसून ही मालिका बघत वेळ घालवू शकतो याहून उत्तम असेल ते काय |डीडी नॅशनल आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. आज नेटफ्लिक्स, एमेजॉन प्राइम, आल्ट बालाजी यावर इतके सगळे कार्यक्रम अपलब्ध असताना देखील रामायणाचे महत्व आजच्या काळातही तितकेच आहे. रामायण हे प्रत्येक दशकात, प्रत्येक शतकात, प्रत्येक पिढीसाठी तितकेच ‘रिलेवंट’ ठरेल हे यातून स्पष्ट झालेलं आहे. १९८७ मध्ये रामायण ही मालिका सर्वप्रथम दूरदर्शन वर प्रदर्शित झाली, आणि त्यानंतर दोन पिढ्यांना रामायण समजलं ते यामुळेच. पुन्हा एकदा त्या जगात जाऊन तोच आनंद घेणे देशातील अनेक लोकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरेल. आजच्या कठिण परिस्थितीत भारतातील नागरिकांनी खचून जाऊ नये, त्यांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित असावे यासाठी घेण्यात आलेला हा अतिशय उत्तम निर्णय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.