बेजबाबदारपणाचा कळस, गायिका कनिका कपूरलाही झाली ‘कोरोना’ची लागण

    20-Mar-2020
|

बॉलिवुड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लंदम येथून शो करून परत आल्यानंतर सुमारे १० दिवसांनी त्यांना कोरोना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. मात्र लंदनहून आल्यानंतर त्यांनी काळजी घेतली नाही आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या. लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत देखील त्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यापासून अनेकांना ही लागण झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


kanika kapoor_1 &nbs


नागरिकांना जबाबदारीने वागण्याची विनंती कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र तरी देखील अजूनही लोक बेजबाबदारपणे वागत आहेत, त्यामुळे या कोरोना विषाणुंचा संसर्ग अनेकांना होण्याची शक्यता आहे. आज भारतात एकूण २१७ लोकांना या विषाणुची लागण झाली आहे आणि एकूण ४ लोकांचा यामुळे मृत्यु झाला आहे. असे असताना कनिका कपूर यांच्याप्रमाणे लोकांनी काळजी न घेत आपला सामाजिक वावर सुरुच ठेवला तर मात्र हा विषाणु मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्यामुळे सामान्य जनतेने याविषयी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.कनिका कपूर यांनी स्वत: इंस्टाग्राम वरुन त्यांना कोरोना विषाणुची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे कि, “नुकतीच मी लंदन येथून आल्यानंतर मला फ्लूची काही लक्षणं दिसत होती, आणि चाचणी केल्यानंतर मला कोरोनाची लागण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मला आणि माझ्या परिवाराला वेगळे ठेवण्यात आले आहे. माझी एअरपोर्टवर तपासणी १० दिवसांआधी झाली होती, मात्र लक्षणं केवळ ४ दिवसांआधी दिसून आली, त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, कि सर्वांनी काळजी घ्यावी, आणि सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे.


एकूणच आताच्या परिस्थितीत जनतेने अतिशय जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. परिस्थिती गंभीर असून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, तेव्हाच आपण एवढ्या मोठ्या संकटापासून वाचू शकू.