आसान नही फौजी कहलाना दोस्त! जाणून घ्या भारतीय सेनेची अशी सुद्धा बाजू..

    17-Feb-2020
|
 
- समीर बाबाराव मोरे 
 
 चार दिवसांच्या त्या दौर्यामध्ये भारतीय सेनेबद्दलचे समज-गैरसमज दूर होण्यात मदत तर झालीच, परंतु जवानांबद्दल भारतभर अफवा पसरवणाऱ्यांची कीवसुद्धा आली. भारतीय सैन्य अगदी कशाचीही तमा न बाळगता, कौटुंबिक सुख बाजूला ठेवून देशसेवेला प्राधान्य देत काम करत आहे. आपण देशाचे सजग नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदर तर ठेवायलाच हवा, सोबतच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी काही करता आले तर नक्कीच प्रयत्न करायला हवे.
 
आर्मी हा शब्द ऐकला की सामान्य डोक्यात किती गोष्टी येतात, नाही? बंदूक, जवान, भारत-पाक संबंध, बॉम्ब, हल्ले, बरच काही! कधी शांत बसून भारतीय सेना म्हणजे काय याचा विचार केलात का? आज-काल देशाच्या सीमेवर जवान शहीद झाला तर लोक समाज माध्यमांवर श्रद्धांजली देतात आणि ते कुकर्म करणाऱ्या देशाला शिव्यांची लाखोली वाहतात. पण खरंच एक गोष्ट सांगा, हे करून साध्य काय होते हो?

560_1  H x W: 0 
 
प्रश्न अगदी साधा, सरळ परंतु उत्तर मात्र नाही. फार पुढे जाऊन एखादा म्हणेल मनाला समाधान लाभते वगैरे.. पण स्वतःचे तोंड खराब करून कसले समाधान मानतो आपण? आतापर्यंत आर्मी बद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत, वाचत, पाहत आलो असताना नुकतेच मी स्वतः आर्मी म्हणजे काय, ती कोणत्या परिस्थितीत काम करते ते अनुभवून आलो. 
 
पुणे ते जम्मू झेलम एक्सप्रेसने माझ्या पहिल्यावहिल्या लांबच्या प्रवासाची सुरुवात झाली. थोडाथोडका नव्हे तर तब्बल 40 तासांचा सलग प्रवास. त्याआधी, थोडं मागे जाऊन या दौऱ्याची पार्श्वभूमी सांगतो. आम्ही पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी. विद्यापीठाने नेमून दिलेल्या नियोजनानुसार पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या राजधानीचा अभ्यास दौरा करायचा असे ठरलेले असते. परंतु यावेळी आमच्या प्रमुखांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच आले.

560_1  H x W: 0
 
आम्हाला सशस्त्र सेनेबद्दल माहिती मिळावी आणि उद्या पत्रकारिता क्षेत्रात झोकून काम करत असतानाही भारतीय सेनेबद्दल आदर असावा, यासाठी त्यांनी थेट जनरल एम. एम. नरवणे यांची गाठ घालून दिली. अभिमानाने सांगतो, देशातील आम्ही पहिलेच विद्यार्थी, ज्यांना भारतीय सेनेने एल ओ सी, अतिसंवेदनशील भागांमध्ये प्रत्यक्ष नेऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी दिली.
 
जम्मूला जाण्याआधी मनात अनेक प्रश्नांनी गोंधळ मांडून ठेवला होता. तिकडे सगळं ठीक असेल का? आपल्यावर हल्ला झाला तर? वगैरे वगैरे! या सगळ्यांमधून एक महत्त्वाची गोष्ट शिकलो; कोणत्याही गोष्टीबद्दलचे मत बनवण्याआधी ती गोष्ट अनुभवायची जरूर. जम्मूला पोहोचता भारतीय सेनेचे सुभेदार साहेब आमच्या स्वागतासाठी तयार होते. तेथून जो थक्क करणारा प्रवास सुरू झाला तो कधी संपूच नये असं वाटायला लागलं. पुढे पहिल्या दिवशीचा मुक्काम के.जी म्हणजेच कृष्णा घाटी मध्ये असणार अस आम्हाला कळलं.

560_1  H x W: 0 
 
आधीच 40 तासांचा प्रवास करून थकलेले आम्ही, त्यात अजून 300 किलोमीटरचा प्रवास करून के.जीला पोहोचायचे हे नुसते समजताच अजून थकायला झाले. घाट चढत सुमारे रात्री नऊ वाजता के.जी ला एकदाचे पोहोचलो, विश्रांती घेतली. भारतीय सेनेने आमचे आदरातिथ्य करण्यात कुठेच कमतरता ठेवली नाही.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कृष्णा घाटी म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले. कडाक्याची थंडी आणि समोरच्या डोंगरावर असणारा पांढरा शुभ्र बर्फ अंगात हुडहुडी भरत होता. तिथल्या स्थानिक ब्रिगेड ने आम्हाला त्यांचं संपूर्ण परिसर दाखवण्यास सुरुवात केली. त्यात पहिलीच आमची भेट मराठा इन्फन्ट्री सोबत ठरली. कितीतरी महिने सुट्टी न मिळालेल्या, घरच्यांशी बोलणं न झालेल्या जवानांना आम्ही मराठी आहोत, महाराष्ट्रातून आलो हे कळताच आपलेपणाची ऊब मिळाली. कामाव्यतिरिक्त मनमोकळ्या गप्पा रंगल्या. बोलण्यातून त्यांना देशासाठी कराव्या लागणाऱ्या त्यागाची प्रकर्षानं जाणीव झाली. फॉरवर्ड एरिया असं संबोधल्या जाणाऱ्या भागांमध्ये सहा-सहा महिने कोणत्याही संपर्काशिवाय, करमणुकीच्या साधनांशिवाय, थंडी, ऊन, पाऊस यांचा सामना करत जो सैनिक देशाचे रक्षण करतो तो खरा देशभक्त, असे मात्र तेव्हा पटले.


560_1  H x W: 0
 
ओ. पी म्हणजेच ऑब्झर्वेशन पोस्ट येथून पाकिस्तानच्या काही पोस्ट पाहण्याचीसुद्धा संधी मिळाली. शिवाय लोकवस्तीमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या काही पोस्ट कार्यरत असल्याचे पाहायला मिळाले. तापमान (-2) ते (-4) सेल्सिअस मध्ये आमची जी परिस्थिती झाली होती, त्या निव्वळ काही तासांच्या भोवऱ्यात आम्ही वारंवार अंदाज बांधत होतो, सहा सहा महिने, वेळेला, वर्ष-वर्ष हे सैनिक संयमाने वैयक्तिक आयुष्य सोडून सामान्यांसाठी कसे झुंजत असतील.
 
आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांचे उत्तर ऐकून तर थक्कच व्हायला झाले. "साब आर्मी नही होगी ना तो हम भी नही होंगे". काश्मीरमधल्याही ठराविक भागांतल्या लोकांचा सैन्याला विरोध आहे परंतु त्यावरून संपूर्ण जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना बदनाम करणे कितपत योग्य असेल, याचा विचार करावा!
 
560_1  H x W: 0
 
एकूण चार दिवसांच्या दौर्यामध्ये भारतीय सेनेबद्दलचे समज-गैरसमज दूर होण्यात मदत तर झालीच, परंतु जवानांबद्दल भारतभर अफवा पसरवणाऱ्यांची कीवसुद्धा आली. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध जगजाहीर आहे पण भारतीय सेना ही मोठ्या ताकदीने पाकिस्तानच्या कट कारस्थानांना हाणून पाडण्यात कुठेही कमी नाही तर कायम वरचढच आहे, हे ही पाहायला मिळाले.
 
भारतीय सैन्य अगदी कशाचीही तमा न बाळगता, कौटुंबिक सुख बाजूला ठेवून देशसेवेला प्राधान्य देत काम करत आहे. आपण देशाचे सजग नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदर तर ठेवायलाच हवा, सोबतच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी काही करता आले तर नक्कीच प्रयत्न करायला हवे. हा देश आणि या देशातल्या माणसांना जेव्हा समानतेची वागणूक देऊ, प्रामाणिक राहू, तेव्हाच चांगले नागरिक बनू, तेव्हाच खरे देशभक्त होऊ!
 
जय हिंद! जय भारत!