मी पाणीपुरी..

    24-Jan-2020   
|

काय मित्रमंडळी कसे आहात. तसं तर मी तुम्हा सगळ्यांना भेटतच राहते. त्यात काही नवीन नाही. मात्र नेहमी तुम्ही माझा आस्वाद घेता आणि निघून जाता. आज म्हटलं जरा गप्पा मारूयात.. मग आपली नेहमीची पार्टी आहेच की.


pani puri_1  H  


तर मी असणं काही सोप्पं नाहीं बरं का. म्हणजे पाणीपुरी बनणं.. अमिताभ बच्चन बनण्या इतकंच कठीण आहे. मी खोटं नाही बोलत बरं का. कणकेची पुरी होऊन.. तळणाच्या तेलातून निघून, टम्म फुगून, तयार झाल्यावर पोट फोडून त्यात रगडा आणि पाणी भरून मग मी तुमच्या मुखात विरघळते आणि पोटाला तृप्त करते. मेडल मिळायला पाहीजे मला नाही का? 

मी अनेक स्पर्धांचा भाग झालेय, लहानमुलांच्या बर्थडे पार्टी, आणि अनेक संध्याकाळच्या सडन प्लान्सचा भाग झाले आहे. मात्र सगळ्यात जास्त मजा येते, जेव्हा मुली मला बघून.. “ऑऑऑऑ….” असं एक्सप्रेशन देतात. त्यांच्या गॉसिप्स ऐकत, स्वत:ची प्रशंसा ऐकण्याची मज्जाच काही और माहिती. त्यातून जेव्हा तिखट लागल्यावर ‘भैय्या थोडी मीठी चटनी डालना’ म्हणतात ना तेव्हा खरंच मला असंच म्हणावसं वाटतं.. “कशी जिरवली..”

माझ्यात रगडा भरला की मी ही भरून पावते, मग माझी सजावट शेव आणि कांद्याने होते, कोथिंबीरही सोबत करते. अगदी तुमच्या मित्र मैत्रीणींच्या ग्रुप सारखाच आमचाही हा एक ग्रुप आहे. त्यानंतर माझ्यात पडतं आंबट गोड आणि तिखट पाणी. आणि मग मी पूर्ण होते, तुमच्या टेस्टबड्सची मागणी पूर्ण करण्यासाठी. 

आपलं लिपस्टिक वाचवत मुली जेव्हा मला खातात ना, तेव्हा त्यांना म्हणावसं वाटतं.. “जाऊदे गं.. बिनधास्त खा.. नाहीतरी माझ्या चटणीची टेस्ट तुझ्या लिपस्टिकपेक्षा नक्कीच भारी आहे.” केवळ एवढच नाही तर अनेकदा मुली मला बांधून देखील नेतात, मात्र माझी मजा कुरकुरीत असतानाच घ्यावी. 


pani puri_1  H


बरं फक्त मुलीच नाही तर मुलांनाही मी खूप आवडते. त्यांच्याही अनेक संध्याकाळच्या प्लॅन मध्ये, डेट्स मध्ये माझाही थोडासा सहभाग असतोच. तर फक्त सगळ्यांना मी आवडते म्हणून नाही, तर माझ्या निमित्ताने अनेकांना आनंद मिळतो, त्यांच्या मित्रांचा सहवास मिळतो, आणि अनेकांची मैत्रीच माझ्यामुळे होते, त्यामुळे मला मी असण्याचा खरंच आनंद आणि अभिमान दोन्ही आहे. 

तर मित्रहो.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची लाडकी अशी मी तुमच्या व्हॉट्एपच्या प्लॅन्सना खऱ्या प्लॅन्समध्ये बदलते. तुमच्या अनेक सीक्रेट्सची मी ही भागिदार असते. तुमच्यापैकी अनेकांनी तिला पहिली पाणीपुरी भवताना ती मजा मी ही घेतली असते. माझ्या आंबट गोड पाण्यात तुमचे आंबट गोड अनुभव लपलेले असतात. माझ्या गरम रगड्यात तुमच्या पोटात लागलेल्या भुकेच्या आगीला शमवण्याची क्षमता असते. तुमच्या फ्रेंड्स ग्रुपचा मी फेव्हरेट सबजेक्ट असते. आणि तुमच्या रोजच्या, अगदी रोजच्याच नाही तरी आठवड्यातून एकदाच्या प्लानमध्ये माझा खूप मोठा रोल असतो. म्हणूनच जशी तुम्हाला मी आवडते, तसेच तुम्ही देखील मला खूप आवडता. आपली ही मैत्री माझ्या आंबटगोड पाण्यासारखी, कोथिंबीरीच्या सजावटीसारखी, कांद्याच्या मजेदार चवीसारखी असू देत… चला तर मग कधी भेटतोय आपण? 

- निहारिका पोळ सर्वटे