वसंतोत्सव.. जीते रहो !! गाते रहो !!

23 Jan 2020 10:10:00

पुणे जसं विद्येचे माहेरघर म्हणून प्रचिलित आहे तसंच ते महाराष्ट्राचे संस्कृतिक माहेरघर सुद्धा आहे. जितके सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात होतात तितके कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही होत नाहीत.


vasantotsav_1   


सवाईगंधर्व नंतर ज्याची पुण्यात खूप चर्चा असते तो म्हणजे वसंतोत्सव. वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी १२ वर्षांपूर्वी सुरू केला.

भारतातील अनेक दिग्गज गायक व वादक या सुरांच्या मैफिलीत येऊन रसिकांचे अखंड मनोरंजन करतात. फक्त शास्त्रीय संगीताशी मर्यादित न राहता सुफी संगीत, लोकसंगीत व अशा अनेक प्रकारांचे इथे स्वागत केले जाते. सुरांच्या प्रत्येक प्रकाराचा इथे आदर केला जातो. रंगमंच्यावर सादर करताना कुठलाही कलाकार छोटा व कुठलाही कलाकार मोठा नसतो.


vasantotsav_2  


पुणेकरांसारखे रसिक जगात कुठेही मिळत नाहीत असे अनेक कलाकारांचे म्हणणे असते. कदाचित याच वाक्याला प्राधान्य देऊन राहुल देशपांडे यांनी वसंतोत्सवाची सुरुवात पुण्यात करायचे ठरवले. हा फक्त गाण्याचा कार्यक्रम नसून हा सुरांचा उत्सव आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. दिवसाचा ताण-तणाव, नोकरी व उद्योगाचा त्रास, हे सगळं बाजूला ठेवून एक दर्दी प्रेक्षक घड्याळात वेळ लावून बरोबर पाच वाजता खुर्ची पकडून गाणं ऐकायला तयार असतो. पुढचे तीन-चार तास त्याला कसलेच भान नसते व तो सुरांच्या महासागरात नक्कीच हरवून जातो.

ज्याला शास्त्रीय संगीताची खूप आवड नाही त्याला सवाईगंधर्व महोत्सव खूप जड जातो. जो सुरांच्या मैफिलीत नवीन आहे त्याच्यासाठी वसंतोत्सव नक्कीच सर्वोत्तम आहे. अनेक राग गाताना मध्ये मध्ये एखाद दुसरं लोकप्रिय गाणं घेऊन इथला प्रत्येक कलाकार आपल्या श्रोत्यांना या मैफिलीत सामील करून घेतो.

राहुल देशपांडे म्हणतात की फुकट हा शब्द आपण खूप चुकीच्या अर्थाने वापरतो. त्यामुळे वसंतोत्सवाची प्रवेशिका फुकट नसून "विनामूल्य" आहे. एकही रुपया न घेता रसिक प्रेक्षकांचे इतके सुंदर मनोरंजन करणारा हा कदाचित एकमेव कार्यक्रम असावा.


vasantotsav_1  


कलेवर व कलाकारांवर प्रेम करणारे माझ्यासारखे अनेक रसिक प्रेक्षक दरवर्षी वसंतोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. ही सुरांची मेजवानी आम्हा रसिकप्रेक्षकांना वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनुभवायला मिळते आणि त्यामुळे वर्षभराची ऊर्जा निर्माण होते.

गेली बारा वर्ष चालत आलेली ही परंपरा पुढे अनेक वर्षे अशीच सुरू राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


जीते रहो गाते रहो !

- अथर्व आगाशे


Powered By Sangraha 9.0