बदललेल्या ओळखीची गोष्ट

    15-Jan-2020
|

काही चित्रपट नुसतेच बायोपिक असतात, काही चित्रपट सामाजिक असतात, काही चित्रपट भावनिक असतात आणि या सगळ्याचा मेळ असलेला एखादा चित्रपट म्हणजे ‘छपाक’! गुलजार यांचे शब्द आणि अरिजितचा आवाज यांनी सजलेला ‘छपाक’चा टायटल ट्रॅक म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा सारांश आहे. ‘छपाक से पहचान ले गया’ ही ओळ ऐकताना अंगावर काटा नाही आला तर आपण माणूस म्हणून संवेदनाशून्य आहोत असं म्हणावं लागेल. माणसाने निर्माण केलेल्या आणि जपलेल्या सगळ्याच संकल्पनांना ‘छपाक’ प्रश्न विचारतो. सौंदर्य, न्याय, माणुसकी, स्त्रीत्व, अशा एक ना अनेक व्याख्यांना आव्हान देणारा हा चित्रपट आहे.


chhapak_1  H x


चित्रपट कसा उलगडायचा हे नेमकं माहीत असलेली दिग्दर्शिका म्हणजे मेघना गुलजार आणि ‘राजी’नंतरचा हा दुसरा मास्टरपीस! पहिल्या मिनिटापासून गोष्टीला सुरुवात होते. ‘मालती’वरच्या अॅसिड हल्ल्याची घटना आणि त्यामागची कारणं या दोन गोष्टी फ्लॅशबॅकमधून प्रेक्षकांसमोर येतात. त्याचबरोबर सगळ्यात मजबूत बाजू असेल तर ती मेकअपची! दीपिकाचा टप्प्याटप्प्याने बदलणारा चेहरा मेकअपची समर्थता दर्शवतो. संपूर्ण चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक फ्रेम, डायलॉग, मेकअप या सगळ्याच बाबी पूर्ण विचारांती वापरलेल्या आहेत. दिग्दर्शनाला पूर्ण गुण देता येतील असं म्हणायला हरकत नाही.


अभिनयाची बाजू प्रत्येकच कलाकाराने ताकदीने पेलली आहे. मुख्य भूमिकेतले दीपिका पदुकोण आणि विक्रांत मॅस्सी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की सौंदर्य या संकल्पनेशी जोडलं गेलेलं नाव त्यांना मालतीच्या भूमिकेसाठी हवं होतं आणि म्हणून त्यांनी दीपिकाला कास्ट केलं. प्रेक्षक म्हणून आपणही याच विचारात पडतो की इतकी सुंदर दिसणारी दीपिका अशी कशी या भूमिकेसाठी तयार झाली. दीपिकाने ‘पद्मावत’मध्ये तिच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आणलं होतं. मात्र ‘छपाक’मधलं तिचं काम त्याहूनही अधिक संवेदनशील आणि मनाला थेट भिडणारं आहे. संपूर्ण चित्रपटात एकही पात्र विनाकारण निर्माण केलेलं नाही. प्रत्येक पात्राला भूमिकेचा स्वतंत्र विचार आहे, कारण आहे आणि कलाकाराला अभिनयाला संधी आहे. अॅसिड फेकणार्‍या ‘परवीन’पासून ते मालतीचा बॉयफ्रेंड असणार्‍या ‘राजेश’पर्यंत प्रत्येक कलाकाराने भूमिकेला न्याय दिला आहे.


चित्रपटाच्या अखेरीस अॅसिड हल्ल्यांच्या घटनेची तीव्रता मनात घर करून राहते. अॅसिड हल्ले हे केवळ निमित्तमात्र राहून या मानसिकतेबद्दल प्रश्न पडत राहतात आणि विचारमग्न होऊन प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतात.

-वेदवती चिपळूणकर