मराठीमोळी नृत्यांगना कोण? दीपिका, प्रियंका कि काजोल?

    14-Jan-2020   
|

संजय लीला भंसाली, आशुतोष गोवारीकर आणि आता ओम राऊत यांच्यामुळे आपल्याला तशी पिरीअड फिल्म्स म्हणजे ऐतिहासिक सिनेमांची सवय झाली आहे. मात्र यांच्या सिनेमा बनविण्याच्या, इतिहास पडद्यावर दाखविण्याच्या आणि एकूणच सादरीकरणाच्या पद्धतीत खूप फरक दिसून येतो. तसं कुठल्याच कलाकृतिची दुसऱ्या कलाकृतिशी तुलना ही योग्य नाही, मात्र तरी देखील एक सामान्य प्रेक्षक म्हणून आपण या दोन्ही तीन्ही कलाकृतींची, त्यातील संगीताची, नृत्याची तुलना ही करतोच. संजय लीला भांसाली यांच्या बाजीराव मस्तानी मध्ये दीपिका आणि प्रियंका यांच्या नृत्याविषयी खूप चर्चा करण्यात आली होती. मात्र आता ‘तान्हाजी’ या चित्रपटात ‘ माय भवानी’ गाण्यातील काजोलचे नृत्य बघितल्यानंतर पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित झाला आहे, “अधिक चांगलं मराठमोळं नृत्य कोणाचं?” दीपिका, प्रियंका कि काजोल?


pinga_1  H x W:

तर असं म्हणतात, माश्याचे कालवण कसे करायचे हे मालवणी आणि कोकणी माणसालाच व्यवस्थित कळतं, कारण ते त्याच्या रक्तात असतं, किंवा ते त्याच्या मातीत असतं, त्याच्या संस्कृतीत असतं, त्यामुळे त्याला ते व्यवस्थित जमतं. आता हे काही सगळ्यांसाठीच लागू होईल असं नाही, कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. मात्र हे काही प्रमाणात खरं देखील आहे. काजेलची आई तनुजा (मराठी) आणि तिचे वडील बंगाली. मात्र काजोलमध्ये मराठमोळेपणाचा एक अंश नक्कीच आहे. आणि हे केवळ तिच्या मराठी बोलण्यातून नाही, तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीवरुन नाही तर तिच्या नृत्य करण्याच्या पद्धतीवरुन देखील दिसून येतं. माय भवानी या गाण्यात तिने केलेलं नृत्य तिच्या देहबोलीला साजेसं दिसतं, तिचा संपूर्ण नव्वारीतील लुक तिला खूप सूट झाला आहे. मुख्य म्हणजे ती सावित्रीच्या मराठमोळ्या लुकमध्ये खूप सुंदर आणि घरंदाज दिसते आहे. तिच्या नृत्याच्या स्टेप्स मधून तिचा मराठमोळेपणा दिसून येतो.


मात्र जेव्हा हेच मराठमोळं नृत्य पिंगाच्या स्वरूपात आपण बाजीराव मस्तानी मध्ये बघतो, प्रियंका आणि दीपिकाला बघतो, त्यांच्या लोवेस्ट नव्वाऱ्या आणि ग्लॅमरस लुक बघतो, त्यावेळेला कुठेतरी ते मराठमोळंपण हरवलेलं दिसतं. काजोलच्या माय भवानी या नृत्यात तिला स्टेप्स खूप कमी आहेत, किंवा तेवढं एकच गाणं ते ही अगदी कमी वेळासाठी नृत्य म्हणून तिने परफॉर्म केलंय, मात्र यामध्ये देखील तिच्या नव्वारीचा पदर, तिची नथ, तिच्या मुद्रा, तिची लचक हे सर्व पूर्णपणे मराठमोळं आहे. हे आपल्याला पिंगामध्ये दिसत नाही, मराठी इतिहास आणि त्यातील महिला स्मार्ट होत्या, सुंदर होत्या मात्र त्यांना ज्या ग्लॅमरस पद्धतीने दाखवण्यात आलं, त्या तशा नक्कीच नसतील.


नृत्य टेक्निकली कसं बरोबर किंवा चूक आहे हे बघण्यापेक्षा ते ज्या पार्श्वभूमीवर बसवण्यात आलं आहे, ज्या संस्कृतीनुसार बसवण्यात आलं आहे, त्यात ते किती फिट बसतं हे बघणं अधिक महत्वाचं आहे. नृत्याची कोरिओग्राफी गाण्याच्या ठेक्याच्यानुसार उत्तम असेल मात्र ती त्या पार्श्वभूमीत किंवा त्या संस्कृतीत बसत नसेल तर मग ते नृत्य आणि त्या नृत्यांगना तितक्याशा प्रभावशाली वाटत नाहीत. पिंगामध्ये असंच झालं आहे, नृत्य टेक्निकली सुंदर असलं तरी प्रियंका आणि दीपिका मराठमोळ्या वाटल्या नाहीत या उलट माय भवानी मध्ये नृत्याची एखादीच स्टेप असली तरी काजोलचा मराठमोळेपणा पूर्ण भाव खाऊन गेलाय. 


काशीबाई आणि मस्तानीच्या पिंगापेक्षा मला सावित्री बाईंचा माय भवानी अधिक आवडला. आपल्याला काय वाटतं?

- निहारिका पोळ सर्वटे