इसरो.. भारताचा गौरव अबाधित राहील, चंद्रावर पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण होणारच..

    07-Sep-2019
काल रात्री संपूर्ण भारताचे लक्ष्य एकाच ठिकाणी लागले होते, भारताची चंद्रयान मोहीम कधी एकदा फत्ते होते असे सगळ्यांना झाले होते. अनेक लोक रात्री केवळ यासाठी जागले की हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी बघून अनुभवता यावा. मात्र केवळ २.१ कि.मी. च्या अंतरावर इसरो सोबत चंद्रयानाच्या लँडरचा संपर्क तुटला आणि ही मोहीम फत्ते होऊ शकली नाही. आज संपूर्ण देशात हीच चर्चा आहे. सकाळ पासून एकच व्हिडियो व्हायरल होत आहे, आणि सगळीकडे इसरोचे वैज्ञानिक आणि देशाचे पंतप्रधान यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर इसरो आणि इसरोच्या वैज्ञानिकांवर आम्हाला अभिमान आहे आणि नेहमी राहील अशा पोस्ट्स व्हायरल होतायेत. असे का? कारण देशाची युवा पिढी देशाच्या प्रत्येका महत्वाच्या घटनेसाठी उभे असलेल्या लोकांच्या (सैनिक, वैज्ञानिक, डॉक्टर्स इत्यादी ) यांच्या पाठीशी आहे. ११ वर्षांची मेहनत अशी एका क्षणात संपताना बघणं कुणाला शक्य होत असेल? काहीही झालं तरी इसरो भारताचा गौरव आहे, आणि म्हणूनच भारताची युवा पिढी इसरो सोबत आहे. 
 
 

ज्या मिशनमध्ये आज आपण अयशस्वी झालो (कदाचित), त्या मोहीमेत रशिया ११ वेळा नापास झाले आहे. इतकी मोठी मोहीम सोपी नसते. ११ वर्ष त्यात लागली आणि त्यातून अजूनही चंद्रयानाचं ऑर्बिटर यशस्वीपणे काम करत आहे, कदाचित कुठला चमत्कार देखील होऊ शकतो. चंद्रयान क्रॅश झाले असू शकते मात्र सॉफ्ट लँडिंगच्या जागी चंद्रयानाचे हार्ड लँडिंग झाल्याने देखील असे होऊ शकते, अशा अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. जे काही झाले असेल मात्र भारताचा वैज्ञानिकांवरचा विश्वास तिळमात्र कमी झालेला नाही. आज आम्ही भारताच्या वैज्ञानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. 


 
आजही भारतातील काही न्यूज चॅनल्स आणि काही पत्रकार आहेत, ज्यांना अशा घटनेवर इसरोच्या वैज्ञानिकांना जाब विचारावासा वाटतो. इसरोच्या वैज्ञानिकांना ‘तुमचे चेअरमन उत्तर देण्यासाठी का नाही आले?” असा जाब विचारण्याची हिंमतच कशी करतात कळत नाही. आपल्याला ज्या बाबतीतील काहीही येत नाही, अशा संबंधी जाब विचारण्याची ‘लायकी’ आपली आहे का? असे यांना का वाटत नाही? आज संपूर्ण देश जिथे या वैज्ञानिकांच्या पाठीशी आहे, त्यांचे मनोबल वाढविण्यात लागलेला आहे, तिथे एका पत्रकाराने असे करावे हे लाजिरवाणे आहे. 

मात्र तिथेच एक व्हिडियो डोळ्यात पाणी आणतो, “देशाचे पंतप्रधान आपल्या मुलाला अपयशी झाल्यावर सावरावं तसं कवेत घेऊन इसरोच्या चेअरमनला सावरतायेत” हे दृश्यच अतिशय भावणारं आहे. यावर देखील ट्रोलिंग झालं, इसरो चे चेअरमन रडताततच कसे? वगैरे वगैरे पोस्ट्स दिसले. ते त्यांचं अतिशय खरं एक्सप्रेशन होतं. ११ वर्षांची मेहनत खराब झाल्यावर कुणाचाही डोळ्यात पाणी नक्कीच येईल. पण अशा वेळी त्यांना निराश न होऊ देता, त्यांचा स्वत: वरचा विश्वास कमी न होऊ देता, त्यांना तुटू न देता पंतप्रधान त्यांच्या पाठीवर हात फिरवत इसरोच्या चेअरमनला शांत करतात, किती बोलकं दृश्य आहे हे. 

आज काहीही झालं तरी देशाला इसरोच्या वैज्ञानिकांवर गौरव आहे, आणि चंद्रावर पोहोचण्याचं देशाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार यात काहीच दुमत नाहीये. 

“ तुम फिर उठो राख से ज्वाला पक्षी की तरह,
और दिखा दो अपना हौंसला शान से प्रणेता की तरह,
है एक ही तो प्रयास जो असफल हुआ,
आगे दिलायेंगे सफलता किसी विजेता की तरह |

गिर कर उठने वाला ही तो बाजीगर हुआ 
है कौन ऐसा जो बिना गिरे अमर हुआ
हार जीत का सिलसिला तो हर वक्त चला, 
है कौन ऐसा जिसे सबकुछ बिना हारे मिला
कोशिश करने का सिलसिला कभी न रुका 
हम फिर एक बार उठेंगे और जीतेंगे किसी खिलाडी की तरह |"

या काही ओळी नक्कीच इसरोच्या वैज्ञानिकांच्या भावना स्पष्ट करणाऱ्या आहेत. “लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती.” या ओळींनी इसरोच्या वैज्ञानिकांना नक्कीच बळ मिळेल. “क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं विश्वास पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही वरदान मांगूंगा नहीं.” या ओळींने इसरोच्या वैज्ञानिकांमध्ये असलेला अखंड आत्मविश्वास नक्कीच दिसतो. 

कोणी कितीही ट्रोल केलं, तरी देखील आज भारताची जनता इसरो सोबत आहे. We are family and we will stand with each other no matter what.