विकी डोनर, दम लगाके हैश्या, बरेली की बर्फी, बढाई हो अशा हटके विषयावरील चित्रपट करण्यासाठी आज बोललीवूडमध्ये एकच नाव प्रसिद्ध आहे, ते म्हणजे आयुषमान खुराना. आयुषमानने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे पण टिकवून ठेवलंय त्याला दोनच कारणं आहेत. एक म्हणजे अवघड वाटणाऱ्या स्क्रिप्ट आयुषमान शोधून काढतो व त्यावर काम करण्याचे धाडस करतो आणि दुसरी म्हणजे असे विषय कदाचित दिग्दर्शक फक्त त्याच्याकडेच घेऊन येत असावेत. या दोन्हींची सांगड घातल्यामुळेच आज खान मंडळींमध्ये आयुषमानचे वेगळे अस्तित्व टिकून आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्याने 'हिट' चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. जसे नरेंद्र मोदींची विजयी घोडदौड थांबत नाहीये तसंच काहीसं आयुषमानचं ही झालाय. एवढंच काय तर नुकतचं त्याला 'अंधाधुन' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झालाय. तसेच त्याच्या 'आर्टिकल १५' या चित्रपटाचीही विशेष चर्चा झाली. पण या सगळ्याला थोडा 'ब्रेक' 'ड्रिम गर्ल' या चित्रपटामुळे लागला आहे असं मला वाटतं. हा चित्रपट इतकाही वाईट नाहीये पण तो आयुषमानच्या घोडदौडीला थोडा का होईना ब्रेक लावणार हे नक्की!
वर म्हटल्याप्रमाणे आयुषमान नेहमीच वेगळ्या विषयाची निवड करतो हे आपल्याला ठाऊक आहेच. 'ड्रिम गर्ल' देखील त्याला अपवाद नाही. हा विषय हाताळण्यात त्याच्या इतका बॉलिवूड मधला दुसरा कोणताही अभिनेता सरावला नसता असं माझं ठाम मत आहे. पण इथे आधीच्या चित्रपटांसारखी संपूर्ण टीमची त्याला साथ न मिळाल्याने चित्रपट थोडासा कंटाळवाणा होतो. मथुरा मधल्या गोकुळमध्ये राहणाऱ्या करम (आयुषमान) ची ही गोष्ट आहे. करमला लहानपणीपासूनच मुलींचा हुबेहूब आवाज काढण्याची कला आत्मसात आहे, ते गॉड गिफ्ट वैगेरे म्हणतात ना तसंच काहीसं. त्याच्या याच कलेचा त्याच्या आजुबाजीची लोकं वापर करून घेत असतात. त्यातच तो बेरोजगार असतो आणि त्याच्या वडिलांचा (अन्नू कपूर) अत्यंविधीचं सामान विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर खुप कर्जही असतं. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी तो मिळेल ते काम करायला तयार असतो. अशातच एका ' हॉट फ्रेंडशिप कॉल सेंटर'मध्ये त्याला जॉब मिळतो, पण तिथे त्याला पूजा या नावाने मुलीच्या आवाजात ग्राहकांशी बोलायचं असतं. आता तसं बघायला गेलं तर या कथेचा जीव फारच छोटा आहे. पण त्यामध्ये नवीन ४-५ कॅरॅक्टर जोडल्यामुळे व त्याच्याशिवाय बॉलिवूड चित्रपट पूर्ण होत नाहीत ती 'लव्ह स्टोरी' घुसडल्यामुळे थोडा का होईना कथेचा जीव मोठा झालाय.
मध्यंतरापर्यंत सगळ्या कॅरॅक्टरचे इंट्रोडक्शन, त्यांच्या आवडी-निवडी, करम आणि माहीची (नुसरत भरुचा) प्रेम कहाणी आणि अनेक ठिकाणी टाळ्या घेणारे कॉमेडी पंचेस यामध्ये निघून जातो. राज शांडिल्य याने या चित्रपटाचे संवाद व पटकथा लिहिली आहे. दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. आता या चित्रपटात अनेक ठिकाणी तुम्हाला भरभरून हसवणारे प्रसंग नक्कीच आहेत, बरेच अफलातून पंचेस देखील आहेत पण हे असण्याचं कारण म्हणजे राज याने आत्तापर्यंत 'कॉमेडी सर्कस' या रिऍलिटी शोचे शंभरहून अधिक एपिसोड लिहिले आहेत. पण एका तासाच्या प्रोग्रॅमची स्क्रिप्ट लिहिणं आणि अडीच तासाचा चित्रपट अधिक मनोरंजक करणं यात बराच फरक असतो. इथेच राजचा ड्रीम गर्ल फसल्याचे जाणवते. मध्यंतरानंतर हळूहळू चित्रपट कंटाळवाणा होतो आणि शेवट तर खूपच हास्यास्पद दाखवला आहे. प्रियदर्शनच्या चित्रपटांसारखा मोहोल तयार करण्याचा प्रयत्न केलाय खरा पण तो जमून नाही आला. शेवटी उगाच काहीतरी सामाजिक संदेश देण्याच्या फंदात न पडता वेगळ्याच ट्रॅकवर चित्रपट संपवला असता तर चाललं असतं. चित्रपटातील काही प्लॉट खूपच फसले आहेत. त्यासाठी ४-५ उदाहरणं देता येतील.
१. एकतर माही ही चौधरी या घरंदाज घराण्यातील मुलगी, करम हा अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या व्यावसायिकाचा मुलगा, यांच्या घरचे एकमेकांना भेटतही नाहीत, साधं माही त्याला तू नक्की काय काम करतो हे विचारत पण नाही आणि थेट एका गाण्यामधून त्यांचा साखरपुडा होतो.
२. जॉब सुरु होताना करम कडून एका करारावर स्वाक्षरी घेतली जाते. मग त्याचा उपयोग पुढे कुठेच करताना का नाही दाखविण्यात आला? शेवटी या कॉल सेंटरचा मालक पोलिसांना कसं काय घेऊन येऊ शकतो, याचा अर्थ हा व्यवसाय अधिकृतरीत्या करायला दिल्ली मध्ये परवानगी आहे असं समजायचं का?
३. करम पुजा मुसलमान आहे म्हणून तिच्याशी लग्न करू नका असं त्याच्या वडिलांना सांगतो आणि तोच तुम्हा मुसलमान मुलीशी लग्न करून परंपरांना कसा छेद दिला पाहिजे हे पटवून देतो. हे असं करण्यामागचा उद्देश लक्षात आला नाही. (बहुदा चित्रपटाची लांबी वाढविण्यासाठी केलं असावं.)
४. 'मी टू' सारखा सिरिअस विषय इतक्या कॅज्युअली घेण्याचे कारण देखील कळाले नाही आणि ते देखील त्याचा 'द्रौपदी वस्त्र हरण' या प्रसंगाशी संबंध जोडून...
५. आणि सगळ्यात हास्यास्पद म्हणजे हा चित्रपट एक सामाजिक संदेश देऊ पाहतो. समाजात माणसं खूप एकटी आहेत त्यांच्याशी बोलायला कोणी नाही त्यामुळे ते अशा पर्यायांचा स्वीकार करतात. अशा पर्यायांपेक्षा तुम्ही आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकू, मामा, मामी, जवळचे मित्र अशा लोकांशी संवाद साधा असं सांगण्याचा भाबडा प्रयत्न हा चित्रपट करतो. पण मला सांगा 'हॉट फ्रेंडशिप कॉल सेंटर'मधील एखाद्या गोड आवाज असणाऱ्या मुलीशी जो संवाद साधला जातो तोच संवाद आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकू, मामा, मामी यांच्याशी साधता येणार आहे का? उगाच आपलं झेपत नसलेले समाजप्रबोधन करत सुटायचं....
आता राहिला विषय अभिनयाचा. यात मात्र आयुषमानला शंभर पैकी शंभर गुण. करम आणि पुजा या दोन्ही व्यक्तिरेखा त्याने सुरेख साकारल्या आहेत. तो पुजा म्हणून फोन वर ग्राहकांशी बोलत असतो ते त्यांना दिसत नाही पण प्रेक्षक म्हणून आपल्याला मात्र दिसत असतं त्यावेळेसच्या त्याचे हावभाव, लकबी अगदी हुबेहूब मुलींसारख्या जमल्या आहेत. किमान त्याच्या अभिनयामुळे तरी हा चित्रपट नकोस होत नाही. विकी डोनर मध्ये आयुषमान आणि अन्नू कपूरची जोडी जबरदस्त जमली होती. इथे मात्र त्याचा तेवढा प्रभाव जाणवत नाही. त्यातल्या त्यात आयुषमान नंतर इतर सगळ्या जंत्रीमधे अन्नू कपूर आणि विजय राजचा अभिनय लक्षात राहतो. बाकी सारे येतात-जातात. गाणी वैगेरे याबद्दल न बोललेलं बरं.
आयुषमान हा वेगळा अभिनेता आहे, त्याची चित्रपटांची निवडही चांगली असते. पण शेवटी माणूस आहे कधीतरी चूक होणारच. ड्रीम गर्ल अगदीच ' न बघणेबल' कॅटेगरीमधला चित्रपट नाहीये. पण तो त्याच्या या आधीच्या चित्रपटांएवढी उंची गाठू शकत नाही हे मंत्र तितकंच खरं!
दर्जा : अडीच स्टार
- प्रथमेश नारविलकर
-----