प्रतिभासंपन्न, गुणसंपन्न गायिका, विलक्षण गायनशैली निर्माण करू पाहते तेव्हा..!

    10-Sep-2019


 

 

अभंग म्हटले की डोळे आपोआपच मिटले जातात, तन, मन सहज शांत होऊ लागते आणि नयनी आपोआप स्मरण होते ते साक्षात विठ्ठलाचे! अगदी सोप्या तालात स्वरांनी गुंफलेले, विठ्ठलाची स्तुती करणारे शब्द मन नकळत प्रसन्न करून जातात.. आणि त्यात उत्तम गायनाची, तालाची न वादनाची साथ असेल तर तो सुवर्णानुभवच!

सारेगमप मराठी लिटिल चॅम्प्समधून २००९ साली वर आलेल्या, संगीताची अखंड साधक असलेल्या आर्या आंबेकर हिने नुकतीच एका कार्यक्रमात गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांना, त्यांचेच पूर्वी गायलेले अभंग गात आदरांजली वाहिली. 'हे श्यामसुंदर, राजसा मानमोहना..', 'बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल' आणि भैरवीतील 'अवघा रंग एक झाला..' या मुळातच अप्रतिम रचना एकत्र करून आर्याने तिच्या कलेला वेगळेच मोहक रूप दिले आहे.

काचेसारख्या पारदर्शी, पाण्यासारख्या नितळ व धारदार आवाजाने या अभंगांना स्वतंत्र स्वरप्रवाह देत, आर्या श्रोत्यांना आनंदानुभूती तर देतेच, मात्र संगीतविश्वात स्वतःचे विशिष्ट नावही कोरु पाहते आहे. मागील वर्षी पंचविशीत असलेल्या याच आर्याचा, एका कार्यक्रमात भावपूर्ण गायलेल्या 'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल' या अभंगाचा व्हिडिओ प्रचंड प्रचलित झाला होता, आणि याच व्हिडिओने कदाचित संगीतप्रेमीयांच्या मनामध्येसुद्धा आर्यासाठी एक विशिष्ट जागा राखली आहे.

आर्या अंबेकरने किशोरीताईंना वाहिलेली आदरांजली जरूर ऐका: 

किशोरीताईंच्या पाऊलांवर पाऊल ठेऊ पाहणारी आर्या कंठाने नाही तर आत्म्याने गाते असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिच्या गायकीतील रागाची उपज, सौंदर्यपूर्ण स्वरलगाव, मींडकाम, गमकप्रकार, तानांची आकारयुक्त मांडणी ऐकताना, श्रोत्याला एका सुंदर भावविश्वाचा अनुभव होतोच, मात्र काहींना साक्षात विठ्ठलाचे दर्शनच घडत असावे!

स्वर, शब्द, भाव आणि लय या सर्वांचे संतुलन राखून आर्या अंबेकर तिच्या या गाण्यातून तिचे स्वरसामर्थ्य ही उत्तम दर्शवते. हे तिचे किशोरीताईंसाठीचे समर्पण, ऐकणाऱ्याला बोटांनी ताल धरू लावते, चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य देऊ जाते आणि वारंवार त्या दिव्य स्वरांचा लाभ घेण्यास भाग पाडते.

किशोरीताईंबद्दल वाचत असताना एक गोष्ट पक्की लक्षात आली, ती म्हणजे अशी की एखाद्याने चिकित्सक वृत्तीने कोणत्याही विषयाचा अभ्यास केला, तर त्यात प्रभुत्व तर आपोआप मिळते, सोबतच आत्मविश्वासही जागृत होतो. पूर्वसूरींच्या गायकीमधील सौंदर्यस्थळांची तत्वे अंतर्भूत करत, आर्याही स्वतःची वेगळी अशी गायनशैली निर्माण करण्याच्या वाटेवर आहे.

सोबतच आजकालच्या तरुणांना परिणामशून्य गाण्यांपेक्षा अभंग, भजन, ठुमरी, दादरा यासारख्या अमूल्य संगीत साठ्याची ओळख करून देऊन आर्या अस्सल कौशल्य करत असल्याचे जाणवते. प्रतिभासंपन्न, गुणसंपन्न असलेल्या या गानसाधिकेने यशस्वी स्वनिर्मित गायनशैलीने संगीतक्षेत्रात संपन्नतेचे योगदान कायम देत राहावे!


- सिद्धी संजय सोमाणी