साहो'चे तीन तास 'बाप्पा'ला द्या !

    31-Aug-2019


 
'बाहुबली : दि बिगिनिंग' आणि 'बाहुबली दि कन्क्लुजन' हे दोन चित्रपट करण्यासाठी प्रभासने त्याच्या आयुष्याची तब्बल तीन वर्ष खर्च केली होती. आजपर्यंत त्यांनी जे काही कमावलं होतं ते सर्व त्यांनी या चित्रपटासाठी शंभर टक्के देऊन टाकलं आणि त्याचाच परिणाम म्हणून या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. अर्थात या यशाचे सारे फक्त प्रभासला देऊन चालणार नाही. त्यासाठी राजामौली सहित सर्वांचे कष्ट महत्वाचे होते. पण आता या घटनेला दोन वर्ष झाले, अखेर प्रतीक्षा संपली व प्रभासच्या ज्या चित्रपटाची सर्व रसिक आतुरतेने वाट बघत होते तो 'साहो' काल प्रदर्शित झाला. पण बहुप्रतीक्षित साहो मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास अयशस्वी ठरत आहे. अगदी सुरुवातीच्या सीन पासून ते शेवटपर्यंत असे अनेक प्रसंग आहेत की ज्याची आवश्यक्ता नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. कमकुवत पथकथा, ढिसाळ मांडणी, संभ्रमात टाकणाऱ्या व्यक्तिरेखा आणि नाहक ताणलेली लांबी या मुळे शेवटी शेवटी 'साहो' अक्षरशः नकोसा होतो. त्यामुळेच म्हणतोय तुम्ही कितीही प्रभासचे डाय हार्ट फॅन असला तरीही 'साहो'साठी तीन तास वाया घालविण्यापेक्षा तोच वेळ 'बाप्पा'च्या आगमनासाठी घालवा, काही नाही तर किमान बाप्पाचे आशीर्वाद तरी मिळतील.
 
 
सुजीथ रेड्डी हा 'साहो'चा तर एस. राजामौली हा 'बाहुबली'ची दिग्दर्शक होता. मुळात बेसिक फरक इथेच आहे की राजामौलीला भव्य कॅनव्हासवर चित्रपट साकारण्याचा यापूर्वीच अनुभव होता, चित्रपटाची कथा अधिक रंजक पद्धतीने मांडण्याची त्याची एक वेगळीच शैली आहे. प्रेक्षकांना नेमकं काय पाहिजे याची नाळ त्यानी चांगल्या प्रकारे ओळखली आहे. पण सुजीथ बाबत नेमकं उलटं आहे, अनुभवाचा अभाव असल्याचे 'साहो'मधून लक्षात येते. 'रन राजा रन' हा सुजीथचा पहिला तेलगू चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने थेट प्रभासला घेऊन 'साहो' काढला. विशेष म्हणजे कथा, पथकथा व संवाद लिहिण्याचं त्यांनी धाडस केलं आणि इथेच हा चित्रपट फसला. चित्रपटात काहीच कमी नाहीये. तगडी स्टारकास्ट आहे, चकाचक दृश्य आहेत, महागड्या गाड्या आहेत, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी आहे, भन्नाट ऍक्शन सीन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात प्रभास आहे हो! पण एवढं सगळं असूनही काहीच फायदा नाही कारण हा चित्रपट रंजकतेचे कोणतेही आयाम कोणत्याच मार्गाने पूर्ण करू शकत नाही.


एका वाक्यात सांगायचं तर हा फक्त चोर-पोलीसचा खेळ आहे. आता जे हुशार आहेत त्यांना कोण चोर, कोण पोलीस हे पहिल्या काही मिनिटांमध्येच कळू शकेल त्यासाठी मध्यंतरापर्यंत वाट पाहण्याची अजिबात आवश्यक्ता नाही. मुळात हे सगळं कशासाठी चालू आहे, हा मनुष्य असा का वागतोय, असाही घडू शकतं का, हे इतक्या कमी वेळात कस शक्य आहे असे एक ना अनेक प्रश्न या तीन तासात पडतात. पण त्याची उत्तर काही केल्या तुम्हाला मिळणार नाहीत कारण साहो हा सामान्य माणूस नसून तो असामान्य मसिहा आहे. असं म्हणा ना तो २०१९ मधला सुपरमॅनच आहे. त्यामुळे कोणतेही प्रश्न उपस्थित न करता हा चित्रपट सहन करणे एवढेच आपण करू शकतो. साहो बघताना गेल्या वर्षी आलेल्या सलमानच्या रेस ३ ची सातत्याने आठवण झाल्याशिवाय राहात नाही. बऱ्याच गोष्टींचं साधर्म्य यामध्ये जाणवतं. बाकी फार काही या चित्रपटाबाबत बोलण्यासारखं नाहीये. कारण यात ठोस असं काही घडतच नाही. प्रभासचा अभिनय तेवढा त्यातल्या त्यात चांगला आहे, त्याच्यानंतर मुरली शर्मा जास्त लक्षात राहतो. बाकी श्रद्धा सहीत सगळेच मोठे कलाकार आपले अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात बिंबविण्यात यशस्वी झालेले नाहीत. आता अखेरीस निर्णय तुमच्या हातात आहे. प्रभासच्या प्रेमापोटी काही रसिक 'साहो'कडे आकर्षित होतीलही पण चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर मात्र त्यांची अस्वस्थता बघण्यासारखी असेल! 

- प्रथमेश नारविलकर