शिवानी सुर्वे झळकणार ‘ट्रिपल सीट’ मध्ये

    28-Aug-2019 

अभिनेता अंकुश चौधरीच्या आगामी ट्रिपल सीटया मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये अंकुश बरोबर दिसणाऱ्या दोन अभिनेत्री नेमक्या कोण आहेत? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. त्यातील एका नावाचा सस्पेन्स अखेर आज संपला, ती अभिनेत्री म्हणजे सध्या गाजत असलेल्या ‘बिग बॉस’ या शो मधील फायनलिस्ट आणि विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली शिवानी सुर्वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या वाढदिवशी ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे खास पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.


 

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट्स, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’च्या या नव्या पोस्टरमध्ये कॅज्युअल लुकमध्ये शिवानी सुर्वे एका खुर्चीवर बसून तर अंकुश चौधरी त्याच खुर्चीला टेकून कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसतात. मात्र, इथे थोडा ट्वीस्ट आहे, शिवानीच्या कानाला एक मोबाईल आहे, तर अंकुश मात्र दोन्ही कानांना मोबाईल लाऊन बोलताना दिसतो. यामुळे तो एका व्यक्तीशी बोलतोय की दोन व्यक्तींशी असा प्रश्न आपल्याला पडतो. शिवाय, तो बसलेला आहे त्या ठिकाणी आणखी काही मोबाईल दिसत आहेत. तसेच या पोस्टरवर विविध भावना व्यक्त करणाऱ्या इमोजी देखील आहेत. यामुळे ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय आहे? याची उत्कंठा वाढली आहे.
 

संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीटया मराठी चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत.अंकुश आणि शिवानी पहिल्यांदाच एकत्र झळकत असलेला ‘ट्रिपल सीट’ मध्ये ती दुसरी अभिनेत्री कोण? तसेच यात आणखी कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता आता वाढली आहे. ह्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी ट्रिपल सीट हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.