आमच्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत..

    23-Aug-2019
महाराष्ट्रात आलेला पूर अतिशय भीषण आहे. कोल्हापुर सांगली, सातारा या भागात आलेल्या या पूराने या सर्व शहरांना अक्षरश: नेस्तनाबूत केलं आहे. आणि अनेकांची घरे आणि जीवन उध्वस्त झाले आहे. प्रशासनाने या आणीबाणीच्या प्रसंगी युद्धपातळीवर काम करत आपली कार्यकुशलता नक्कीच सिद्ध केली, मात्र या संपूर्ण बचाव कार्यात तिथे उपस्थित न राहून देखील तेथील लोकांना मदत करणारे हजारो युवा धावून आले, मराठी कलाकारांनी देखील मोठ्या प्रमाणातस याबचाव कार्यात सहभाग घेत महाराष्ट्रासाठी आम्ही सज्ज आहोत दे पुन्हा एकदा दाखवून दिले, आणि माणूसकी आजही जीवंत आहे, याचा जीवंत प्रत्यय आला.

 
अनेक युवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागरुकता पसरवत आणि वेगवेगळ्या लिंक्स शेअर करत देशभरातील नागरिकांना पूरग्रस्त बांधवांची मदत करण्याचे आवाहन केले. अनेकांनी आपापल्यापरी जे शक्य असेल ते सामान गोळा करून ते पाठविण्याचे काम केले. अनेकांनी व्हिडियोजच्या माध्यमातून जनतेला सरकारच्या मदत निधी खात्यात निधी जमा करण्यासाठी प्रेरित केले. आपापल्या कॉलेज क्लालेसच्या ग्रुप्सवर मॅसेज पसरवून अनेकांनी लाखो रुपये गोळा केल्याची माहिती देखील समोर अली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील तत्परतेने पुढे येत पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा विडा उचलला आहे. प्रसिद्ध कालकार सुबोध भावे ने एका व्हिडियोच्या माध्यमातून लोकांना तेथील नागरिकांना आवश्यक असलेल्या गोष्टी ठराविक केंद्रांवर गोळा करण्याचे आवाहन केले. स्पृहा जोशीने देखील पुढे येत पूरग्रस्त भागातील महिलांसाठी कोरी अंतर्वस्त्र गोळा करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
मराठी सिनेसृष्टी आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील युवा पिढीने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी एक मोठा हात पुढे केला आहे. प्रत्येका खारीच्या वाट्याने एक मोठा सेतु तयार होतो. तसा मदतीचा सेतु तयार होत आहे. प्रशासन आणि सेनेने देवदूतांप्रमाणे नागरिकांना वाचवले तसेच या मदत कार्यामध्ये युवा पिढी आणि मराठी सिने कलाकारांचा देखील मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्र सक्षम आहे कारण महाराष्ट्राकडे असे कलाकार आणि अशी युवा पिढी आहे, हे मात्र अगदी खरे.