नुकतेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून विकी कौशल आणि आयुष्मान खुराना यांची निवड करण्यात आली. यासाठी एक यंग प्रेक्षक म्हणून मला आणि माझ्या सारख्या अनेकांना भरपूर आनंद झाला आहे. ऊरी आणि अंधाधुन नो डाऊट अमेझिंग चित्रपट होते. एका बाजूला ऊरी ने अंगावर शहारे उभे केले, तर अंधाधुनने शेवटपर्यंत खेळवून ठेवले. पण केवळ या दोन चित्रपटांसाठीच नाही तर गेल्या ३-४ वर्षांच्या काळात आलेल्या त्या दोघांच्याही अनेक चित्रपटांसाठी एकत्र असा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचे ते खरच ‘हकदार’ आहेत. त्यामुळे विकी आणि आयुष्मान जिंकलत तुम्ही भावड्यांनो… असंच म्हणावंसं वाटतं.

गेल्या अनेक वर्षात बॉलिवुड आता ‘खान्स’ यांचं राहिलेलं नाही. सलमानचे सिनेमे केवळ त्याच्या एक ठरावनिक फॅन फॉलोइंगमुळे थोडे फार चालतात. आमिरचे फारसे सिनिमे येत नाहीत. आले तरी वेगळे असल्यामुळे ते म्हणावे तसे नाही, तरी चालतात. शाहरुख बद्दल तर विचारायलाच नको. त्याचे गेले ४-५ सिनेमे म्हणजेच दिलवाले नंतर आलेले साधारण सर्व सिनेमे बेक्कार पडले आहेत. त्यामुळे तो चांगलाच आपटला आहे, असं दिसून येतं. मात्र आता बॉलिवुड नवीन पिढीच्या हातात आहे, आणि त्याचं प्रतिनिधित्व हे दोघं अतिशय प्रतिभावान कलाकार करत आहेत, यामुळे हिंदी सिने सृष्टीला नक्कीच अधिक चांगले दिवस आले आहेत, आणि युवा प्रेक्षक याच्याशी आणखी जोडला गेला आहे, हे मात्र खरं.
विकीचा मसान बघितला तर त्यामध्ये देखील त्याचा अभिनय मनात घर करतो. मनमर्झिया एक चित्रपट म्हणून ठीकठाक वाटला तरी विक्कीने त्याचं वेगळेपण त्यातूनही दाखवलं आहे, राझीमध्ये एक वेगळाच विकी बघायला मिळाला. रोमॅंटिक पण स्वत:च्या देशासाठी तितकाच कर्तव्यनिष्ठ आणि ऊरी बद्दल तर काही म्हणायलाच नको. ते म्हणतात ना प्रत्येका कलाकाराच्या आयुष्यात एक असा चित्रपट असतो, ज्यामुळे तो कलाकार प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो, कदाचित विकीच्या खात्यात तो चित्रपट म्हणजे ऊरी.
आयुष्मानचे सिनेमे नेहमीच वेगळ्या पठडीतले आहेत. म्हणजे आता ‘विक्की डोनर’ च बघा ना. कुणी तरी स्पर्म डोनेशनवर चित्रपट काढेल असा विचार तरी केला होता का? त्यानंतर दम लगा के हैशा, किंवा शुभ मंगल सावधान असू देत, किंवा बरेली की बर्फी, आणि आता बधाई हो आणि आर्टिकल १५. त्याने वेगवेगळ्या रोल्स मध्ये स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे.
या दोन्ही कलाकारांची खास बाब म्हणजे, ते आपल्या पिढीशी (जे वयाने आणि मनाने सदैव तरुण आहेत) पटकन कनेक्ट होतात. याचं कारण ते स्वत: युवा आहे म्हणून नाही तर त्यांचा अभिनय, त्यांची सोशल मीडियावर व्यक्त होण्याची पद्धत आणि त्यांची ‘चॉइस ऑफ मूव्हीज’.
तर आता बॉलिवुडला खान्सची गरज उरलेली नाही. कारण आता आपल्याकडे विकी कौशल, आयुष्मान खुराना तसेच त्यांच्याच सारखा अतिशय तोडीचा अभिनेता राजकुमार राव आहे. नवाजुद्दीन सिद्धीकी, काही प्रमाणात वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील. त्यामुळे ये नया भारत है, प्रमाणे आता ये नया बॉलिवुड है असं म्हणायला हरकत नाही.