एक तरी कला असावी सोबत

    04-Dec-2019
 

kala_1  H x W:

शाळा कॉलेजमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात, काही अभ्यासात हुशार असतात, काही एखाद्या खेळात, काही भाषण आणि वक्तृत्व गुणांमध्ये पुढे असतात, तर काही एखाद्या किंवा एका पेक्षा अधिक कलेत पारंगत असतात. आणि अशा विद्यार्थ्यांकडे बघितलं किंवा त्यांचे निरीक्षण केलं तर आढळतं कि इतर विद्यार्थ्यांपेक्षा ते अधिक आनंदी, किंवा मनमिळाऊ असतात (काही अपवाद वगळता). हे मात्र एक जनरल ऑब्जर्वेशन झालं, मात्र खरंच एखादी कला सोबत असली की ती एक माणूस म्हणून आपल्याला घडवते. आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. 

एखादी कला आपल्या सोबत का असावी ?

कला ही काही शिकवून येत नाही. ती आपसूकच यावी लागते. ती दैवी देणगी असावी लागते. पण ती असली की तिला जोपासणं देखील तितकंच महत्वाचं असतं. ती आपल्या सोबत असते तेव्हा ती आपल्याला खूप काही शकवते. अनुशासन, वेळेची किंमत, स्वत:ची आणि आपल्या कलेची काळजी घेणे, विनम्रता, असे अनेक गुण ती आपल्यात आणते. आणि मुख्य म्हणजे ती जितकं माणसांचं महत्व समजावते तितकंच ती आपल्याला इंडिपेंडेंट देखील करते. 

नृत्य, गायन, वादन, चित्रकला, लेखन अशा किती तरी कला आहेत ज्या या न त्या रुपाने आपल्यापैकी अनेकांमध्ये असतील. या कलांनी आपल्याला काय दिलं? 

१. अनुशासन : कुठलीही कला आपल्याला अनुशासन नक्कीच शिकवते. दररोज वेळेवर रियाज करणे, नृत्य किंवा गायन सादर करत असताना त्या त्या कलेच्या नियमांनुसार ते करणे, वेळेवर शिकवणीला जाणे, वेळेवर सर्व आटोपणे, अतिशय मन लावून आपली कला जोपासणे, यामुळे आपल्या आयुष्यात डिसिप्लिन म्हणजेच अनुशासन नक्कीच येतं, शिस्त लागते. कला फक्त आपल्याला नृत्य, गाणं, वादन, अभिनय हेच शिकवत नाही तर त्यासोबत आपल्यामध्ये अनुशासन देखील आणते. 
 

kala_4  H x W:  
 

 
 
२. वेळेची किंमत : कुठलीही कला आपल्यात आणखी एक चांगला गुण विकसित करते, ते म्हणजे वेळेची किंमत करणे. वेळेची किंमत असली की आपली अनेक कामे सोपी होतात. उदाहरणार्थ कथक नृत्यात जर समेवरून समेवर नाही आलो तर सादर केलेली कलाकृती पूर्णपणे चुकते. एखादी गोष्ट वेळेवर न केल्यास त्याचे काय परिणाम होतात, त्याची प्रचिती सुद्धा एखादी कला जोपासताना आपल्याला येते. कुठलीही कला आपल्याला वेळेची किंमत शिकवते. वेळेवर रियाज केला नाही, वेळ देवून रियाज केला नाही, रियाजाचा वेळ वाया घालवला तर त्याची मोठी किंमत कलाकारांना मोजावी लागते. 

३. विनम्रता : खरा कलाकार विनम्र असतो. तो कधीच आपल्या कलेचा माज करत नाही, घमेंड करत नाही. त्याला त्याच्या कलेची किंमत असते, आणि इतरांची देखील. खरी कला आपल्यात विनम्रतेचा गुण देखील जोपासते. ती आपल्याला अधिक विनम्र करते. कारण विनम्रतेशिवाय कलेला, कलाकाराला आणि माणसाला किंमत नाही. 
 

kala_3  H x W:  

४. माणुसकी : असं म्हणतात खरा कलाकार एक माणूस म्हणून खूप चांगला असतो. त्याच्या मनात इतरांबद्दल माया आणि आदर असते. ज्यावेळी त्याच्या कलेवरचं त्याचं प्रेम कमी होतं आणि स्वत:वरचं वाढतं तेव्हा तो खरा कलाकार राहत नाही, मात्र खऱ्या कलाकाराला माणसाची किंमत असते. त्यामुळे कला आपल्याला माणुसकी देखील शिकवते. 

कलाकार असण्यापेक्षाही आपल्यात असलेल्या कलेला एक माणूस म्हणून जपणं खूप महत्वाचं असतं. कला आपली एक अशी मैत्रीण असते, जी आपल्याला कधीच एकटं सोडत नाही, तिच्यामुळे आपण चार चौघांमध्ये उठून दिसतो, तिच्यामुळे अनेकदा आपलं वेगळं असं अस्तित्व निर्माण होतं. त्यामुळे एक कला तरी सोबत असावीच. इतरांपासून वेगळं काहीतरी करण्यासाठी आपल्यातील माणूसपण जपण्यासाठी. 
 
- निहारिका पोळ सर्वटे