केडिया बंधूभाव.. विलक्षण!

    13-Dec-2019
|Kedia_1  H x W:

 

 

कोण्या एका जुन्या, प्रशस्त राजवाड्यात असता, एखाद्या राणीने तिच्या रायाच्या लढाईहून परतण्याचा बातमीने आनंदाने पावलोपावली बागडत सुटावे, फुले उधळावी, तिच्या मैत्रिणींना धरून गिरक्या घ्याव्यात, भान हरपत फुलपाखरासारखं घरभर नाचव आणि मग दमल्यावर, मोठे श्वास घेत, आरसा पाहत लाजत उभे राहावे..
 

मनाची नेहमीची सुस्थिती तिने विसरावी. पाठीमागून तिच्या रायाच्या येण्याची अलगद चाहूल तिला लागावी. त्याने जवळ येत, आपल्या पत्नीचे नितळ, स्वच्छ रूप पाहता यावे म्हणून हलकासा, मागूनच, आरशावरून हात फिरवावा. राणीच्या मनाची धाकधूक नकळत वाढवी.. अन आपल्याकडे एकटक पाहणाऱ्या त्याच्याशी नजर एक करताच, गोड हसत तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवावा!

 

मोहक असे हे सुंदर, शृंगारिक चित्र उभे करणारी श्री मोरमुकुट आणि बंधु श्री मनोज केडिया यांची सतार-सरोद जुगलबंदी म्हणजे एक पर्वणीच! बोटांनी सरोदच्या तारा छेडीत मनोज यांनी माहोल रंगावलेच, पण सोबतच मोरमुकुट यांची झणकारती सतार अद्भुत जादू पासरावणारी होती.

 

अंगावर लाल सदरा, चेहऱ्यावर गोड हसू, बोटांनी तारा छेडीत, भुवयांनी स्वरांना नाचवत मनोज-मोरमुकुट यांनी कालांतराने द्रुतगती सादर करत प्रेक्षकांना कडकडून टाळ्या वाजवण्यासही भाग पाडले. तंतू वाद्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे निमार्ण होणारा कंप अन सुरांचा वाहता प्रवाह! सरोद असो वा सतार वा अन्य कोणतेही तारवाद्य असो, एक मात्र समानता सर्वांगी आढळते, ती म्हणजे शांतता, ज्याला इंग्रजीतून 'serenity', असे म्हणायला हरकत नाही. त्यात केडिया बंधूभाव.. अहाहा, विलक्षण!

 
 

अखेरीस राग मिश्र पिलू आवळीत या जोडगोळीने कधी वेळेस मागे टाकले ते प्रेक्षकांना तर नाहीच पण त्यांना स्वतःनाही कळले नसावे. मराठीतली जुनी पण आजही सर्वांच्या ओठांवर असलेली ओवी, 'अरे संसार संसार..' याच्या जवळपास फिरणाऱ्या सुरावटीचे शास्त्रीय रूपांतर करत केडिया बंधूंनी उपस्थितांना केहराव तालात मात्र हात देण्यास मजबूर केले हे नक्की!

वयाच्या आठव्या वर्षी संभूदयाल केडिया, पिता यांनी मनोज-मोरमुकुट यांंना प्रज्ञानंदीजी, आचार्य राजारामजी, श्री द्रविड, नंदजी यांच्याकडे प्रारंभिक संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. पुढे ते उ. अली अकबर खा यांचे शिष्य बनले. अन्नपूर्णादेवी आणि पं सुनील मुखर्जी यांचेही मार्गदर्शन मोरमुकुट यांना लाभले.

देशभरातल्या अनेक मोठ्या संगीतसभा गाजवलेले मोरमुकुट प्रथम क्रमांकाने संगीत प्रवीण झाले आहेत. देशविदेशात आपला प्रभाव उमटवलेल्या मोरमुकुट यांची तुलना पं राविशंकरजी यांच्याशी केली जाते. बंधु मनोज केडिया सह (सरोद वादक) त्यांची जुगलबंदी म्हणजे रसिकांसाठी एरवीही पर्वणीच असते.

- सिद्धी सोमाणी