आई आणि मुलाच्या किंवा आई आणि मुलीच्या नात्यावर आजवर अनेक चित्रपट किंवा लघुपट आले आहेत. पण आजच्या सिचुएशनला शोभेल, आपण अगदी रिलेट करु शकू अशी शॉर्टफिल्म अनेक दिवसांनी बघायला मिळाली आणि हा लघुपट म्हणजेच ‘आईची जय’.
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिला अनेक दिवसांनी स्क्रीनवर बघून आपोआपच फ्रेश वाटलं. सगळ्यात गंमत म्हणजे या लघुपटात आई मुलाच्या भूमिका देखील खऱ्या आई मुलाच्या जोडीने साकारल्या आहेत. म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि तिचा मुलगा विराजस कुलकर्णी याने. तर ही गोष्ट आहे एका आईची आणि तिच्या मुलाची. मुलगा आता नवीन जॉब साठी निघाला आहे, पहिल्यांदा आपलं घर सोडून. पुण्याहून मुंबईला. तो एक्सायटेड आहे. त्याला स्टार्टअप मध्ये काम करण्याची इच्छा आहे, आणि त्याची तयारी आहे. इनशॉर्ट तो बाहेर राहून नोकरी करण्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड आहे. पण त्याची आई?
खरं तर कुठलीही आई कधीच प्रिपेअर्ड असते का? आपल्या लेकराला बाहेर पाठवायला? ती मनापासून नसली तरी तिला तसं स्वत:ला पटवायला लागतं. तसंच काहीसं इथेही दाखवण्यात आलेलं आहे. मृणाल कुलकर्णी नॉस्टेलल्जिक होते, आपल्या मुलाचे लहानपणीचे फोटोज बघते, त्याचा लाड करते आणि तो इरिटेट होतो. इथे त्यांच्यात वाद सुरु होतो, अगदी तो मुंबईला निघत असताना. ती त्याला म्हणते, “आमची काय करिअर्स झाली नाहीयेत का? इथे पुण्यात” आणि वाद वाढतो. तो निघून जातो… पण मग..
मग काय होतं हे नक्की बघा या लघुपटात. असा प्रसंग तुमच्या आमच्या घरांमध्ये नक्कीच आला असणार. कधी कधी आपल्या आयांनी ते बोलून दाखवलं असणार तर कधी त्यांच्या ‘सायलेंट ट्रीटमेंट’ मधून ते आपल्याला कळलं असेल. पण यामध्ये आईचे मुलाचे इमोशन्स, जनरेशन गॅप मुळे येणारे प्रश्न, वाद, तरीही कितीही काहीही झालं तरी “आईची जय..” म्हणजेच “मॉम इज द बेस्ट’ असं चित्र. हे सगळं आपलंसं वाटतं.
हमारा मूव्हीज या यूट्यूब चॅनल वर या लघुपटाला दीड लाख हून अधिक व्ह्यूज आहेत. याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, गौरव पत्की यांनी तर यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांनी. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.
- निहारिका पोळ सर्वटे