शॉर्ट एण्ड क्रिस्प : “ब्लाइंड”आपण सोशलमीडियावर वावरताना किती सावध असतो ? आता तुम्ही विचार करत असाल की असा डायरेक्ट प्रश्न का विचारला हिने? पण आज ज्या लघुपटाबद्दल मी लिहीणार आहे, सोशल मीडिया वर वावरत असताना आपण फसू शकतो, किंवा आपल्या सोबत विश्वास घात होवू शकतो, मात्र त्यापासून आपण सावध देखील राहू शकतो, हेच सांगणारा हा लघुपट आहे, “ब्लाइंड”.

एक मुलगी ऑफिसातील एक तरुण तिला आवडत असतो. मात्र त्याच्याशी बोलायची तिची हिंमत होत नाही. तिच्या मैत्रीणीसोबत ती सगळं शेअर करते. लिफ्ट मध्ये तिला तिच्याच ऑफिस मधील आणखी एक तरुण भेटतो. मात्र दुसऱ्या तरुणाप्रति असलेल्या आकर्षणापायी ती त्याच्याकडे लक्ष्य सुद्धा देत नाही. मात्र तोच तरुण जेव्हा तिच्या ‘क्रश’ सोबत गप्पा मारतो तेव्हा ती त्याला भेटते आणि बोलण्या बोलण्यातच तिच्या ‘क्रश’चं नाव विचारुन घेते. काही दिवसांनी तिला आवडत असलेल्या तरुणाची इंस्टाग्राम रिक्वेस्ट तिला येते. आणि त्यांच्यात बोलणं सुरु होतं. केवळ बोलणंच नाही तर सेस्क्स्टिंग सुद्धा सुरु होतं. त्यातच तिला कळतं की, आज त्याचा वाढदिवस आहे. ती त्याच्या घरी जाते आणि….. आणि भलतंच काहीतरी होतं. काय होतं? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा.


अनेकदा आपण खूप बेसावध असतो. कोणाशी बोलतोय, काय बोलतोय याची शाहनिशा करत नाही, आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रकरणांमध्ये अडकण्याची शक्यता देखील असते. असंच काहीसं यामध्ये दाखवण्यात आलं आहे. सोबतच सेफ राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे देखील सांगण्यात आलं आहे. एसआयटी या यूट्यूब चॅनल तर्फे फेसबुकवर ‘बी सेफ’ हे पेज सुरु करण्यात आलं आहे, त्यामाध्यमातून हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

या लघुपटाला फेसबुकवर एकूण ६६९ हजार व्ह्यूज आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हा लघुपट शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया वापरताना आपण किती जपून रहायला हवं यासाठी हा लघुपट आपण एकदा नक्कीच बघावा.

- निहारिका पोळ सर्वटे