Short and Crisp : आजीची पोतडी

12 Nov 2019 17:14:59


 


यूट्यूब चालू केलं की एक नवीन वेगळं जग आपल्या पुढे येतं. या जगात भरपूर काही असतं, काही चांगलं, काही वाईट, काही खूपच बोअरिंग तर काही आपल्या मनाला भावणारं. असाच एक लघुपट आहे, जो अतिशय साधा, सरळ, छान, सोप्पा आहे, मात्र मनाला भावणारा आहे, तो म्हणजे “आजीची पोतडी”. प्रत्येकाला आपल्या आजीची आठवण करून देणारा, आजीच्या गोष्टींची आठवण करुन देणारा असा हा लघुपट. 

तर या लघुपटात मुख्य कलाकार म्हणजे आजी आणि अबोली. अबोली एक छोटी ६-७ वर्षाची मुलगी. तिच्या घराजवळच एक आजी रहात असतात. सहा महिने अमेरिकेला आपल्या मुलाकडे राहून आल्यावर त्या येतात, तेव्हा त्यांना एक दिवस अबोली आपल्या आई सोबत भेटते. गप्पा होतात आणि गट्टीही जमते. अबोली आजीकडे रोज गप्पा मारायला जाते. आजी तिला छान छान गोष्टी सांगते आणि त्या गोष्टींच्या आधारावर अबोली नंतर चित्र काढते. अबोलीच्या चित्रांची शाळेत सुद्धा खूप प्रशंसा होते. तिच्या मित्र मैत्रीणींनाही तिच्या या नवीन कलेबद्दल खूप छान वाटतं, आणि ते तिला विचारतात की ती इतके छान चित्र कसे काढायला लागली. ती आजीच्या गोष्टींबद्दल सांगते, आणि मग तिचे मित्र तिला तिच्या आजीच्या पोतडीविषयी विचारतात. हा शब्द तिने पहिल्यांदाच ऐकलेला असतो. पुढे खूप धमाल येते, ती काय आहे यासाठी तुम्हाला हा लघुपट बघावा लागेल. 



आपण खूप लवकर मोठे झालो. अनेकांना आजी आजोबांचा सहवास खूप दिवस मिळालाही असेल मात्र सगळ्यांचच नशीब तितकं चांगलं आहे असं नाही. त्यामुळे हा लघुपट पाहून आपण त्या आजींमध्ये कुठेतरी आपली आजी शोधायचा प्रयत्न करतो हे मात्र नक्की. आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी सुरेख काम केलं आहे. लघुपटाचे संवाद देखील ओघवते आहेत. वननेस फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर या लघुपटाला एक लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. अबोली आणि तिच्या आईच्या भूमिकेत सौख्या दामले आणि निकिता पिपंळे यांनी उत्तम काम केले आहे. तसेच लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश अरुण कुंजीर यांनी केले आहे. आजीच्या आठवणीसाठी एकदा हा लघुपट नक्की बघा. 

- निहारिका पोळ सर्वटे

Powered By Sangraha 9.0