ओझोन : ओळखीचं नाव आहे ना?

    03-Oct-2019ओझोन हे आपलं ओळखीचं नाव आहे. हो नं? शाळेत आपण सीएफसी ओझोन या सगळ्याबद्दल खूप वाचलं आहे, मात्र त्यानं आपल्या आजच्या आयुष्यात काय फरक पडतोय? आता हळू हळू ते आपल्याला कळतंय. सतत बदलणारे वातावरण, प्रत्येका मौसमची तीव्रता अधिक असणं हे धोकादायक आहे आणि यामागे सीएफसी, ओझोन लेयर यांचा मोठा सहभाग आहे. कसे? ते वाचा पुढे..

वातानुकूलित वस्तू, कोल्ड स्टोरेज , बॉडी स्प्रे यामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका पोहोचतो आहे हे वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल मात्र वरील बाबींमुळे पर्यावरणाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या घरातील खोल्या थंड करण्यासाठी आपण एसीचा वापर करत असतो मात्र यामधून निघणारा क्लोरो फ्योरो कार्बन अर्थात ‘CFC’ हा वायू पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करत आहे. या वायुमुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील ओझोनचा थर कमी होत चालला आहे.

ओझोन बद्दल थोडंसं..

सूर्यावरून पृथ्वीवर सतत हानिकारक किरणांचा मारा होत असतो या अतिनील अर्थात हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील ओझोन थर करीत असतो. सूर्यावरून येणारी अतिनील किरणे मानवी जीवाला नष्ट करू शकतात. यामुळे पृथ्वीपासून २० ते ३० किलोमीटर या अंतरावर ओझोनचा थर आपल्या पृथ्वीचे सूर्यावरून येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करीत असतो. शास्रीय भाषेत सांगायचे झाले तर, पृथ्वीवरील २० ते ३० किलोमीटरमधील वातावरणातील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा असे म्हटले जाते.

१९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. १९३० मध्ये भौतिक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन याने ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली. सूर्यावरून येणाऱ्या हानिकारक किरणांचा मारा ओझोनचा थर शोषून घेतो आणि त्यामुळे मानवी जीवनाचे रक्षण होते तसेच सूर्यावरून येणारी हानिकारक किरणे पृथ्वीवरील वातावरणात थेट आली असती तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी नष्ट झाली असती असे चॅपमॅन याने म्हटले.

पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर असल्याने UV-A,B,C किरणे शोषली जातात. ही किरणे सजीवांसाठी अतिशय धोकादायक मानली जातात, यामुळे त्वचेचा कर्करोग आणि त्वचा जळण्याचा धोका असतो मात्र ओझोनच्या थरामुळे ही किरणे पृथ्वीला धडकतात मात्र ती पुन्हा सूर्याकडे परतविली जातात. सूर्यावरून पृथ्वीवर तीन प्रकारची किरणे येत असतात, त्यातील UV-A ही किरणे ओझोन थरातून आरपार जात असतात, UV-B या किरणांना बऱ्याच प्रमाणात ओझोन थर शोषून घेत असतो तर UV-C ही किरणे सजीवांना अतिशय धोकादायक असल्याने या किरणांना ओझोन थर परत पाठवत असतो म्हणजेच ‘Re-Sending’ करीत असतो.

मात्र आत्ताच्या घडीला ओझोनचा थर दिवसेंदिवस नष्ट होत चालला आहे. काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होवू लागला आहे. या संयुगांमध्ये नायट्रीक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरो फ्योरो कार्बन, ब्रोमो फ्योरो कार्बन यांचा समावेश आहे. उत्तर अर्धगोलातील ओझोन थराचे प्रमाण दर दशकाला ४ टक्क्यांनी कमी होत चालले आहे. नायट्रस ऑक्साईड, क्लोरो फ्योरो कार्बन या वायूंमुळे सगळ्यात जास्त ओझोनच्या थरात घट होत असून हे वायू मानवी कृतीतून निर्माण झाले आहेत.या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या उपाययोजना :

१९७८ मध्ये अमेरिका, कॅनडा आणि नॉर्वे या राष्ट्रांनी CFC वायू असलेल्या वस्तूंवर बंदी घातली. परंतु युरोपीय राष्ट्रांनी CFC वायू असलेल्या वस्तूंवर बंदी घालण्यास नकार दिला. यामुळे अंटाट्रीक येथील ओझोनच्या थराला खूप मोठा बोगदा पडल्याचे पुढे आले त्यानंतर CFC वायूवर निर्बंध घालण्यात आले. मात्र अजून देखील बऱ्याच देशांमध्ये CFC वायू असलेल्या वस्तूंचा वापर केला जात आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, चीन, जपान, अफगाणीस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

१९८७ मध्ये झालेल्या मॉन्ट्रेअल करारामुळे CFC चा वापर १९९६ पासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. या करारावर १६० देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. CFC वर आणलेल्या जागतिक बंदीमुळे ओझोन थर क्षय होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र CFC चे आयुष्य ५० ते १०० वर्ष असल्याने ओझोनचा थर पुर्ववत होण्यासाठी अनेक दशके लागण्याची शक्यता आहे.

आपल्या कडून थोडा प्रयत्न करुयात...

१: वातानुकूलित वस्तूंचा म्हणजेच एसी, फ्रीज यांचा वापर गरच असेल तेव्हाच करावा.

२: फ्रीज जास्तकाळ उघडा ठेवू नये. यामुळे CFC जास्त प्रमाणात हवेत जाणार नाही.

३: बॉडी स्प्रेचा वापर टाळावा, या एवजी सुगंधित अत्तरांचा वापर करावा.

४: मोठ्या प्रमाणात झाडे लावावी.

५: प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळणे आणि प्लास्टिकच्या पिशव्या जाळणे बंद करणे.याव्यतिरिक्त तुम्ही जास्तीत जास्त झाडे लावू शकता तसेच इन्व्हर्टरचा वापर देखील कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. जवळच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही सायकलचा वापर करू शकता. सरकारी वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तर बऱ्याच प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल. आपण बाहेर कार्यक्रमांना जातांना अथवा रोजच्या जीवनात नेहमीच डियो-स्प्रेचा वापर करतो या स्प्रे ऐवजी आपण अत्तर अथवा नैसर्गिक सुगंधित अत्तराचा वापर करू शकतो. तुमच्या बजेटमध्ये असल्यास तुम्ही घराच्या छतावर सौर प्रकल्प देखील तुम्ही उभारू शकता. यामुळे नक्कीच बऱ्याच प्रमाणात आपण ओझोन थर वाचवण्यास हातभार लावू शकतो.


- नेहा जावळे