महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?

    31-Mar-2021   
|
 
 
 
पुन्हा लॉकडाऊन होणार आहे का ?...हा प्रश्न आता सर्वांना पडत आहे. जर होणार असेल तर मग मागील वर्षाच्या एकंदरीत अनुभवावरून सामान्य माणूस पुढची तोडकिमोडकी गणिते मांडायला लागला आहे. अगदीच सूक्ष्म डोळ्यांनी न दिसणारा असा हा 'कोरोना व्हायरस' आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात गोंधळ घालून गेला आहे आणि अजूनही घालत आहे. 'कोरोना व्हायरस' हा शब्द २०२० मध्ये सगळ्यात जास्त वापरलेला शब्द आहे त्यात मुळीच काही कौतुकाची बाब नाहीये. २०२० हे वर्ष सुरु झालं आणि जगाला एक नवीन वळण लागल्यासारखे झाले. सुरुवात चीनच्या एका छोट्याश्या वूहान नावाच्या प्रांतापासून झाली.
 

lockdown_1  H x 
 
जागतीकीकरणाचा एक फायदा असा आहे की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली गोष्ट प्रत्यक्षरुपात तुमच्याकडे पोहचण्यास फारसा वेळ लागत नाही. अगदी तसच कोरोना विषाणूच्या बाबतीतही घडले आणि हळूहळू सगळ रूपच पालटायला लागले. जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून आधी जनता कुर्फ्यू लागला मग परिस्थिती अगदीच गंभीर व्हायला लागल्यामुळे लॉकडाऊन लागला. अशा पद्धतीने गाडी रुळावरून चालायची थांबली. जवळपास नोहेंबर नंतर कोरोनाग्रस्थ रुग्णांची संख्या कमी व्हायला लागली आणि सरकार हळूहळू  निर्बंध शिथिल करायला लागले. अर्थातच सामान्य माणसाच्या जीवात जीव आला आणि आता पुन्हा अश्या लॉकडाऊन चा सामना पुढे करायला नाही लागणार या आशेने तो आपली विस्कटलेली घडी निट करायला लागला.
 
 
निर्बंध हळूहळू शिथिल केले याचा अर्थ असा नाही होत की कोरोना विषाणू पूर्णपणे संपला. तो अजूनही आजूबाजूला फिरत आहे आणि कित्येकांना आजारी पडून जीवही घेत आहे. जनसामान्याचा बळी घेणार हे झालं आधुनिक शस्त्र. पण आपण सर्व या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या आणखी एका आणि खूप जुन्या शस्त्राशी परिचित आहोत. तो म्हणजे हातावर पोट पाळणारा गरीब आणि त्याच्याशी नेहमीच वैर पाळणारा पैसा. असा गरीब आज आपले पोट भरेल आणि घरच्यांना दोन वेळचे खायला मिळेल ही अशा घेऊन घरातून बाहेर पडतो. त्याचं ठरलेलं आजचं ध्येय पूर्ण होईपर्यंत रात्र होते आणि तो आपल्या घराकडे वळतो. अशा परिस्थितीत बँकेत पैश्यांची बचत करणे असली काही भानगड तो पाळत नाही 'आजच भागलं ना मग उद्याच उद्या बघू' असा एकंदरीत त्याचा जीवनगाडा चालेलला असतो. अश्या परिस्थितीत त्याला सांगण्यात आले की बाबा उद्यापासून तू घराबाहेर जाऊ शकत नाही. मग यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज आपण सर्वांना आहेच.
 
 
तर मुद्दा असा आहे की आधीच मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागल्याने जनसामान्याचे खूप हाल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबळी पेक्षा आता भूकबळी जास्त होतायेत की काय याची भीती आहे. आधी जेव्हा लॉकडाऊन झाले होते तेव्हा सरकारने ६ महिन्यासाठी अगदीच गरजेच्या वस्तू म्हणजे गहू , तांदूळ, डाळ, gas cylinder अशा वस्तू काही माफक दरात व काही कमी किमतीत दिल्या होत्या. त्याचा उपयोग निश्चितच सामान्य जनतेला झाला होता. आता जेव्हा पासून पुन्हा गोष्टी सुरु होताना दिसत असताना लॉकडाऊन लागेल की काय अशी नवीन भीती निर्माण व्हायला लागली आहे. या लॉकडाऊनची झळ सगळ्यात जास्त शहरी भागात वस्ती करून राहणाऱ्या लोकांना होईल. त्यासोबत ग्रामीण भागातून शहरी भागात स्थ्लांतर केलेला वर्ग यांनाही याची झळ लागल्याशिवाय राहत नाही.
 
 
मागच्या लॉकडाऊनमध्ये जीव मुठीत घेऊन आपआपल्या घरी मोठ्या कष्टाने पोहचलेले मजुरांची दशा आपण पहिलीच आहे. असे मजूर पुन्हा एकदा शहराकडे वळायला लागले आहेत आणि जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर त्याचं की होणार हे देवच जाणो! शहरी भागात झोपडपट्टीत राहात असलेल्या लॉकडाऊन पाहिजे की नको असा प्रश्न विचारला तर त्यांची उत्तरे अशी होती की पूर्णपणे लॉकडाऊन नको. सरकारने कडक निर्बंध लावले तरी चालतील पण लॉकडाऊन नको. तर सरकारने लॉकडाऊन लावायच्या आधी या वर्गाचा विचार करून पावले उचलावीत. नाहीतर कोरोनाबळी पेक्षा आता भूकबळी जास्त होतायेत की काय याचीच भीती जास्त असेल.