बृहनमहाराष्ट्रातील गौराई !!! तुमच्या ही कडे येतात का गौरी ?

    25-Aug-2020   
|

गणपतीउत्सव म्हटले की गौरी आणि गणपती या दोघांचेही स्मरण आलेच. वाजत गाजत गौराईचे आगमन, आनंदाच्या वातावरणात त्यांची पूजा, घरात जेवायला येणाऱ्या आप्तेष्टांचा गोतावळा, संध्याकाळी हळदी कुंकू, ज्यांच्या घरी उभ्या महालक्ष्म्यांचे आगमन होते, त्यांना ही त्यांच्याच घरची कथा वाटणार. मात्र गौरीपूजन हे केवळ महाराष्ट्रातच होत नाही तर महाराष्ट्राबाहेरील मराठी परिवार देखील तितक्याच प्रेमाने गौरींचे स्वागत करतात. खरे तर प्रत्येकाठिकाणची पद्धत थोड्या फार फरकाने सारखीच असते. आज या गौरींचे विसर्जन होणार, मात्र पुढल्यावर्षी पुन्हा त्याच उत्साहाने या महालक्ष्म्यांचे स्वागत करण्यासाठी हे परिवार तयार राहतील.


mahalaxmi_1  H


मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे सराफ परिवारात देखील ज्येष्ठ गौरींचे उत्साहात स्वागत करण्यात येते. पारंपरिक पद्धतीने महालक्ष्म्यांची पूजा आणि भोजनाचा सोहळा पार पडतो, संपूर्ण परिवारासाठी हा खूप उत्साहाचा सण असतो. संध्याकाळी हळदी कुंकवाला या क्षेत्रातील अनेक मराठी परिवार सराफ यांच्याकडे एकत्र जमतात, एकूणच एकमेकांसोबत आनंदाने साजरा करण्याचा हा सण असतो.

mahalaxmi_1  H


जबलपुरच्या महालक्षम्या : १. मोहित जाधव, प्रशांत पोळ, मनीष नाजवाले, हर्षल पुणतांबेकर



mahalaxmi_1  H


या प्रमाणे जबलपूरच्या हर्षल पुणतांबेकर, प्रशांत पोळ, मनीष नाजवाले, मोहित जाधव, माधवी रत्नपारखी तसेच सोनल दर्शने यांच्या परिवारांमध्ये देखील महालक्ष्म्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येते. काही घरांमध्ये पितळ्याचे मुखवटे असतात तर काही घरांमध्ये मातीचे. काही घरांमध्ये एकच बाळ असते, तर काही घरांमध्ये दोन. मात्र सगळीकडे गौरींप्रती प्रेम आणि उत्साह सारखाच असतो.


mahalaxmi_1  H
बिलासपुर येथील गोवर्धन आणि नरसिंहपुर येथील चौधरी परिवाराच्या गौऱ्या


नरसिंहपुर येथे देखील चौधरी परिवारात महालक्ष्म्यांचे मनोभावे पूजन केले जाते. यासाठी संपूर्ण परिवार एकत्र जमतो, तर छत्तीसगढ येथील बिसालपुर येथे गोवर्धन परिवारात देखील महालक्ष्म्यांना अगत्याने आवाहन केले जाते.

दिल्लीच्या पुराणिक आणि नाशिककर परिवारात पारंपरिक फुलोरा, महालक्ष्मीपूजन, हळदी कुंकू यासह महालक्ष्म्यांचे स्वागत केले जाते. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या या सणात दिल्ली येथील मराठी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होतो.



mahalaxmi_1  H


उत्तर भारतातच नाही तर दक्षिण भारतात देखील गौरी गणपतींच्या पूजनाची परंपरा आहे. मोठ्या प्रमाणात येथील मराठी मंडळी गौऱ्या बसवतात. मात्र काही ठिकाणची पद्धत थोड्या फार फरकाने वेगळी असते. यापैकीच एक आहेत, लता खोना. या कर्नाटक येथील निवासी आहेत, त्या मूळच्या तमिळ असल्या तरी देखील त्यांच्या येथे गौरी बसवण्याची परंपरा आहे. बेल्लारी येथे राहणाऱ्या खोना परिवारात गौऱ्यांचे मोठ्या उत्साहात आगमन होते. त्यांची मनोभावे पूजा केली जाते, तसेच आपल्या येथील परंपरेप्रमाणे तेथे देखील हळदी कुंकू केले जाते.

गुजरातच्या वडोदरा येथे लीना कुलकर्णी, मंजिरी बेलापुरकर आणि सुरुची यांच्या घरी देखील गौरी स्थापनेची परंपरा आहे. त्यांच्या येथे पितळ्याचे तसेच मातीचे मुखवटे असतात. तर सजावट देखील परंपरेनुसारच असते. साधारणपणे अगदी साधी मात्र सुंदर आणि पंरपरेला धरुन या सजावटीमुळे गौऱ्यांचे तेज आपोापच वाढते. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी महालक्ष्म्यांच्या मखराची सजावट एखाद्या थीमनुसार देखील असते.


mahalaxmi_1  H


वडोदरा येथील सुरुची, मंजिरी बेलापुरकर आणि लीना कुलकर्णी यांच्या घरातील महालक्षम्या


महालक्ष्म्यांचे उत्साहात स्वागत केवळ भारतातच केले जाते असे नाही, असे अनेक मराठी परिवार आहे, युवा मुले मुली आहेत, जे लग्न करुन परदेशात स्थायिक झाले आहेत, किंवा काही काळासाठी परदेशात आहेत. मात्र तिथे राहून सुद्धा आपल्या घरातील रीती, परंपरा ते विसरलेले नाहीत. असे अनेक परिवार आहेत, जे भारताबाहेर देखील उत्साहात गौरी, गणपतीचा सण साजरा करतात. तसेच तेथे राहणारे अनेक मराठी परिवार या निमित्ताने एकत्र येतात, आणि हळदी कुंकू आणि भोजनाचे कार्यक्रम आयोजित करतात.

अमेरिका येथील अदिती अंजनकर तसेच कॅनेडा येथील विभा पारेख यांच्या घरच्या गौऱ्या



mahalaxmi_1  H


यामध्येत अमेरिकेत राहणाऱ्या अदिती अंजनकर देखील आहेत, त्यांच्या घरी देखील महालक्ष्म्या बसतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी गौऱ्यांची तयारी करणे, पारंपरिक जेवण तसेच पूजेची तयारी करणे तसे कठीण असते, मात्र तेथील मराठी परिवारांच्या सहभागाने ते शक्य होते. अंजनकर यांच्याघरी देखील महालक्ष्म्यांच्या भोजनाला आणि हळदी कुंकवाला अनेक लोक येतात. याच काही सणांमुळे परदेशी राहुन सुद्धा मायदेशाची माया मिळते, हे खरे आहे.

याप्रमाणेच कॅनेडा येथे राहणाऱ्या विभा पारेख यांच्या घरी देखील उभ्या गौऱ्या असतात. पारंपरिक पद्धतीने त्यांची सजावट केली जाते. मराठी पारंपरिक साड्या, दागिने, सजावट, पकवान्न हे सगळं म्हणजे सगळंच असतं. कशातही कमी ठेवली जात नाही. विदेशात राहून सुद्धा आपले मराठीपण जपणे इतके कठीण असताना देखील या काही लोकांमुळे भारताबाहेरही आपल्या परंपरा आजही टिकून आहे.

या सोबतच हैदराबाद, भोपाळ, इंदौर, गुजरातसह संपूर्ण भारतात राहणाऱ्या मराठी समाजातर्फे घरोघरी महालक्ष्म्यांचे स्वागत केले जाते. गौरी गणपती हा केवळ महाराष्ट्राचा सण नसून संपूर्ण भारताचा सण म्हणून साजरा केला जातो. यामुळे महाराष्ट्राबाहेरचे मराठी लोक एकत्र येतात, त्यावेळी ते कुठल्या एका समाजाचे नसतात, ते केवळ मराठी असतात. आणि त्यामुळेच महाराष्ट्राबाहेर मराठीपण जपले जाते.

ही संस्कृती जपल्यामुळेच कदाचित आज संपूर्ण भारतात मराठीपण टिकून आहे. यामुळे नव्या पिढीला आपल्या सणांची ओळख होते, हिंदी भाषिक प्रदेशात राहून सुद्धा आपल्या सणांप्रती जवळीक निर्माण होते. त्यामुळे हे सगळे सण साजरे होणे खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्रात राहून परंपरा जपणे एकवेळ सोपे आहे, मात्र महाराष्ट्राबाहेर राहून त्यातून भारताबाहेर राहून या परंपरा जपणऱ्यांचे खरे कौतुक आहे. गौराईंच्या आशीर्वादाने या सर्व परिवारांना सुख समाधान आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना.

- निहारिका पोळ सर्वटे