गुरु पौर्णिमनिमित्त “माधुरी” झाली भावुक

    06-Jul-2020
|

नुकत्याच प्रसिद्ध नृत्य निर्देशक सरोज खान यांच्या निधनानंतर त्यांची आवडती विद्यार्थिनी म्हणजेच माधुरी दिक्षीत नेने ही काल झालेल्या गुरु पौर्णिमेनिमित्त भावुक झाली. इंस्टाग्रामवर तिने सरोज खान यांना गुरु पौर्णिमेनिमित्त अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली. तिची ही पोस्ट वाचून अनेकांना तिच्या सरोज जींप्रति असलेल्या भावना आणखी प्रकर्षाने जाणवल्या. आज सिनेसृष्टीत माधुरीचे नाव प्रसिद्ध झाले ते तिने सादर केलेल्या काही ‘आयकॉनिक’ नृत्यांमध्ये. आणि ज्यापैकी अधिकांश नृत्यांचे दिग्दर्शन केले ते सरोज खान यांनी. 


saroj_1  H x W:



आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर माधुरी लिहीते,

“मला अजूनही विश्वास बसत नाही कि मास्टर जी आता आपल्यात नाहीत. एका मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्याला अशा प्रकारे गमावणे खूपच वेदनादायक आहे. माझ्या भावनांना शब्दांचे रूप देणे खरंच कठीण आहे. मी त्यांच्या मुलीशी बोलले होते जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, आणि त्यावेळी तिने सांगितले की त्या लवकरच बऱ्या होतील, आणि दोन दिवसांनंतर बातमी आली कि मास्टरजी आपल्यात नाहीत!!!

आमच्यात जे गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले त्यामुळे मला माहीत असायचे कि माझ्या सेट वर त्या एका आई प्रमाणे माझी काळजी घेताएत. आज गुरु पौर्णिमेनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांनी ज्या पद्धतीने एका स्त्री ला अतिशय सुंदर आणि मोहक रूपात स्क्रीन वर दाखवले, तसे अजून कोणीच करू शकत नाही. मी त्यांना नेहमी म्हणायचे, सरोज जी जर तुम्ही साखर असता ना तर मी तुम्हाला चहात टाकून प्यायले असते, तुम्ही इतक्या गोड आहात. आणि त्या खळखळून हसायच्या. मी त्यांचे ते हास्य कधीच विसरू शकणार नाही.



पहिल्यांदा मी त्यांना “मैंने रब से” या कर्मा चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगच्या वेळी भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला खूप प्रश्न विचारले होते, तू नृत्य कुणाकडून शिकलीस वगैरे. मला त्यांच्या त्या प्रश्नांची सतत आठवण येत राहील. सरोज खान या सिनेसृष्टीतील “गेमचेंजर” होत्या. पुरुषसत्ताक फील्ड मध्ये त्यांनी आपले पाय घट्ट रोवले होते. त्या खूप मेहनती आणि खूप खमक्या होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वारा एक ‘रफ’ झलक आहे कारण आयुष्य त्यांच्यासोबत कधीच साधे आणि सोपे नव्हते. त्यांचे असे स्थितप्रज्ञ आणि मेहनती असणे मला सतत आठवेल.

कॅमेऱ्यासमोर नृत्य करणे आणि स्टेज वर नृत्य करणे या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. सरोज जींनी मला कॅमेऱ्याशी प्रेम करणे शिकवले. एक दोन तीन सारख्या गाण्यांमधून ते जगासमोरही आले. अशा गाण्यांमुळेच केवळ आणि केवळ त्यांच्यासाठी फिल्मफेअर ला ‘बेस्ट कोरियोग्राफर’ ही कॅटेगिरी वेगळ्याने सुरु करावी लागली. मी त्यांचे ने नेहमी जिंकणे देखील खूप मिस करेन.

त्यांची प्रत्येक अदा त्यांची प्रत्येक स्टेप ही खूप वेगळी होती. मला माहीत होते की आम्ही एकत्र अनेक गाण्यांसाठी काम करणार आहोत, त्यामुळे मी त्यांना म्हटले होते कि आपण कुठली ही स्टेप पुन्हा वापरायची नाही. त्यांनी सम्मती देत प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळ्या हुक स्टेप्स बनवणे सुरु केले. आणि आमचे प्रत्येक गाणे त्या एका स्टेपमुळे ओळखू जाऊ लागले. आम्हाला त्या स्टेप्स ना काय म्हणतात हे ही माहीत नसायचे आणि आम्ही वेगवेगळ्या स्टेप्स तयार करायचो. कुणाला माहीत होतं कि तम्मा तम्मा च्या स्टेपला ‘डॅब’ म्हणतात. मी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या स्टेप्स बनवणे देखील खूप मिस करेन.

सरोज जी माझ्या परिवाराच्याही खूप जवळच्या होत्या. त्यांचे असे जाणे एक खूप मोठी व्यक्तिगत क्षति आहे. त्यांच्या सारखे आधीही कुणीच नव्हते आणि पुन्हा एकदा ‘सरोज खान’ होणे नाही. सरोज जी मी तुमच्या बद्दल प्रत्येक गोष्ट मिस करेन. खासकरून तुमची ‘परररफेक्ट’ म्हणण्याची लकब.”


माधुरीच्या शब्दांमधून तिच्या भावना ओघळताएत. तिचे तिच्या गुरुंवर असलेले प्रेम आणि श्रद्धा ही या पोस्ट मधून दिसून येते आहे. असे म्हणतात माधुरीला सरोज खानने बनवले आणि सरोज खआनला माधुरीने. त्या दोघींसारखे गुरु शिष्याचे नाते नेहमी बघायला मिळत नाही.