तीन हजार टाके : एक विलक्षण अनुभव

    24-Jul-2020   
|

अनेकदा आपण सहज चाळायला म्हणून काही पुस्तकं घेतो, आणि पहिल्या काही पानातंच ते पुस्तक असं काही मनात घर करतं, कि ते आपण एका बैठकीत वाचून काढतो, आणि त्यानंतर सुद्धा त्या पुस्तकातील कथांचे विचार, लेखकाचे विचार, अनुभवांचे विचार आपल्या मनात सतत घोळत असतात. असंच एक पुस्तक म्हणजे “तीन हजार टाके”. सुधा मूर्ती लिखित हे पुस्तक म्हणजे एक विलक्षण अनुभव. सुधा मूर्तींची लेखन शैली ही नेहमीच सामान्य माणसाच्या मनात घर करणारी असते. ते पुस्तक वाचून, हे आपल्या साठीच लिहिलं आहे, असं वाटून जातं, तीन हजार टाके देखील त्यांच्या अनेक हीरे जवाहरातांपैकी एक आहे, आणि हा खजिना त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी खुला करून दिला आहे, यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमी | या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी | मी सुधा मूर्तींची आतापर्यंतची सगळी पुस्तकं मराठीतूनच वाचली आहेत, त्यामुळे मी लीना सोहनी यांच्या अनुवादाच्या देखील प्रेमात आहेच.



teen hazar take_1 &n


तर.. आता मूळ मुद्यावर येऊयात.. पुस्तकाबद्दल थोडंसं…

याआधी जर तुम्ही सुधा मूर्ती यांची ‘सामान्यातील असामान्य’, ‘थैलीभर गोष्टी’ किंवा ‘गोष्टी माणसांच्या’ ही पुस्तकं वाचली असतील, तर तुम्हाला त्यांच्या या शैलीची कल्पना आधीच आली असेल, त्याच शैलीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना आलेले काही अविस्मरणीय अनुभव, त्यांच्या बालपणातील शिग्गाव गावात त्यांच्या आजी आजोबांसोबत त्यांनी व्यतीत केलेले काही क्षण, भारतात परदेशातून आलेल्या काही भाज्यांविषयी त्यांच्या मैत्रिणीच्या वडीलांनी सांगितलेली माहिती, त्यांच्या वडीलांना जंगलातील एका छोट्याशा गावात आलेला अनुभव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फोसिस फाउंडेशनने देवदासी प्रथेसाठी केलेलं काम याविषयी खूप सुंदर वर्णन केलं आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला या कथांच्या, त्याच्यातील खऱ्या खुऱ्या असलेल्या पात्रांच्या आणि एकूणच सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पाडतं.

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी सुरु केलेली इन्फोसिस ही कंपनी खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे उदाहरण आहे. आणि केवळ कंपनी सुरु करून त्यांनी युवा पिढीला रोजगारच दिला नाही, तर या इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू आणि गरीबांची नि:स्वार्थ मदत देखील केली आहे. ते करत असताना आलेले अनुभव सुधा मूर्तींनी या पुस्तकात मांडले आहेत. सुरुवातीला त्यांनी देवदासी प्रथेला संपवण्यासाठी घेतलेले कष्ट, त्याचा संघर्ष आणि त्यानंतर त्या संघर्षाचे फलित म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या महिलांनी त्यांना दिलेली अमूल्य भेट याविषयी वाचताना नकळत डोळे पाणावतात.


teen hazar take_1 &n


त्यांच्या पुस्तकांमधून नेहमीच त्यांच्या या यशामागे असलेलं गुपित उकलत जातं. ते गुपित म्हणजे त्यांची जडणघडण. ज्याकाळात मुलींच्या शिक्षणावरही अनेक प्रश्न उपस्थित होत असत, त्यांना कॉलेज ला पाठवणं पालकांसाठी खूप धाडसाचं पाउल असायचं, त्याकाळी घरच्यांचा विरोध असून सुद्धा इंजीनिअरिंग करणारी सुधा मूर्ती डोळ्यांपुढे आली की एक मूर्तीमंत प्रेरणा आपल्या पुढे उभी राहते. यामागे सगळ्यात महत्वाचा आहे त्यांच्या वडीलांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला जपण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत. आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी जेव्हा त्या सांगतात, त्यावेळेला आजच्या काळात हा विचार करणंही कठीण जातं, कि त्या संपूर्ण महाविद्यालयात ‘एकटी तरुण मुलगी’ म्हणून त्या आत्मविश्वासाने वावरायच्या, आणि महाविद्यालयात प्रथम क्रमांक देखील पटकवायच्या. त्यांचा हाच संघर्ष, आत्मविश्वास आणि जिद्द आजच्या आमच्या सारख्या मुलींना खूप मोठी शिकवण देऊन जातो.

संपूर्ण पुस्तकात असलेलं अनुभव कथन आपल्याला आपल्या भारताच्या आणखी जवळ आणतं. आपल्या देशावर असलेल्या आटोकाट प्रेमाला हे अनुभव कथन अजून वाढवतं, आणि देशावर असलेला अभिमान पुन्हा एकदा जागृत होतो. त्यांना एअरपोर्टवर ‘कॅटल क्लास’ म्हणून हिणवणाऱ्या बायकांना त्यांनी दिलेलं उत्तर, त्यांची परगदेशात साडी नेसून कुंकू लावून फिरण्याची पद्धत आणि महाविद्यालयीन मुलांना त्यांच्या गावातील महाविद्यालयाबद्दल अभिमानाने केलेलं कथन, आपल्याला आपल्या मुळांशी जोडून कसं रहायला पाहीजे हे सांगतं.

हे पुस्तक म्हणजे वाचनाची एक साधी एक्टिव्हिटी नव्हे, तर एक विलक्षण अनुभव आहे. पुढे आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक प्रेरणा, आणि आयुष्य कसं घडवायला पाहीजे, त्यासाठी कशी आणि किती मेहनत करायला हवी, याचं एक ब्लूप्रिंट आहे.

पुस्तक वाचून त्याला विसरून नं जाता, त्याचा अनुभव आपण आपल्यापाशी ठेवला कि, त्याचा पुढील आयुष्यात उपयोग हा नक्कीच होतो. त्यामुळे हे पुस्तक केवळ एकदा वाचून विसरुन न जाता, याचा अनुभव सगळ्यांना आपल्या सोबत बाळगायला हवा आणि हे पुस्तक आपल्या संग्रहात ठेवायला हवं, असं आहे. नक्की वाचा, आणि या पुस्तकाला आपल्या संग्रहात अवश्य ठेवा.

  • निहारिका पोळ सर्वटे