शॉर्ट एण्ड क्रिस्प : कडली

    03-Jun-2020   
|

हे नाव विचित्र वाटतं ना ऐकायला ? मात्र इंग्रजीच्या "कडल" या शब्दाचा वापर करुन बनवण्यात आलेला शब्द म्हणजे कडली. एका छोट्या बाळासाठी सर्व सुविधायुक्त असलेला झोपाळा, ज्याला कुठेही घेऊन जाता येईल, असा हा “कडली”. कडल करणं म्हणजेच लाडावणं, कुरवाळणं, तर जो झोपाळा बाळाला आई सारखं कुरवाळेल तो म्हणजे कडली. सतत हे सांगण्याचे कारण म्हणजे आजचा लघुपट याच विषयावर आहे.


cuddly_1  H x W


मार्केटिंग क्षेत्रात असलेली एक मुलगी रात्री अपरात्री दुसऱ्या दिवशी असलेल्या प्रेझेंटेशनची तयारी करत असते. तिची आई तिच्या सोबत जागत असते. या लघुपटाची खासियत म्हणजेच आई आणि तिच्या मुलीमधील लाडिक वाद. नेमकं काय करतेयेस हे विचारल्यानंतर ती मुलगी या अत्याधुनिक कडलीची माहिती देते. लहान बाळांसाठी असलेल्या या कडलीची किंमत ५ लाख रुपये असते, हे एकून तिची आई खूप छान वाक्य म्हणते, ते कोणतं? हे बघण्यासाठी एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट.

या लघुपटात जो संदेश देण्यात आला आहे, तो खूपच सुंदर आहे. त्या मुलीचं शेवटचं एक वाक्य आहे, " या कडलीत ४० भाषांमध्ये अंगाई गीतं आहेत, तर कडलीची उशी बाळाच्या डोक्याच्या मापाची आपोआप होते, यामुळे बाळाला काय उत्तम झोप येणार." आणि तिची आई उत्तरते "तू लहान असताना असायला हवं होतं हे कडली." आईचं वाक्य संपण्याच्या आतच तिची कन्या तिच्या मांडीत डोकं ठेऊन झोपी गेली असते. किती बोलकं आहे ना हे सगळं. प्रत्यक्ष काहीही न बोलून भरपूर काही संगणारं.

एकूणच आजच्या जगात लहान मुलांसाठी आराम विकत घेता येऊ शकतो, मात्र आईच्या मायेची ऊब ती करोडो खर्च करून देखील मिळणार नाही. आई आणि मुलीच्या नात्यासाठी हा लघुपट अवश्य बघण्यासारखा आहे. या लघुपटात हिंदी - मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी ही आईच्या भूमिकेत तर मुलीच्या भूमिकेत श्रुती व्यास आहे. या टेरिबली टायनी टेल्स प्रस्तुत या लघुपटाला यूट्यूबवर 15 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

- निहारिका पोळ सर्वटे