महाराष्ट्राच्या लोणार सरोवराचे पाणी गुलाबी कसे झाले ? #TrendingStory

    12-Jun-2020
|

महाराष्ट्रात लोणार सरोवर हा अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे, त्याचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे एका भीषण उत्कापातानंतर लोणार या ठिकाणी एक भला मोठा खड्डा निर्माण झाला, आणि हजारों वर्षांच्या रासायनिक प्रक्रियेनंतर या सरोवरात पाणी आलं. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे बेसॉल्ट खडकातील, उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे भारतातील एकमेव आणि जगातील साधारण तिसऱ्या क्रमांकावर असलेलं हे सरोवर. मात्र गेल्या २-३ दिवसांपासून हे सरोवर चर्चेत आहे ते त्याच्या रंगामुळे | या सरोवराचा रंग आधि निळा - हिरवा होता, मात्र काही दिवसांपासून या सरोवराचा रंग बदलला असून आता तो गडद गुलाबी, मरून असा झाला आहे, त्यामागचे कारण काय ? यामुळे काही संकट तर येणार नाही ना? पाणी विषारी तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न येथिल रहिवाशांना आणि फोटोज व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना देखील पडले होते. मात्र शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला असून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.


lonar_1  H x W:


या सरोवराचा रंग अचानक बदलल्याने नेटकऱ्यांना मात्र खूप आश्चर्य वाटले आणि एकाएकी लोणार लेक ट्विटर वर ट्रेंड करू लागली. मोठ मोठ्या शास्त्रज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत याच्या बदलत्या रंगाविषयी कुतुहल होतं. 




या सरोवराची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे येथील पाण्याचे पीएच १० ते ११ असे आहे, आणि हे एक खाऱ्यापाण्याचे सरोवर आहे. मात्र सरोवराच्या आजूबाजूला एक ते दोन फुट जरी खणले गरी गोड पाणी लागतं, त्यामुळे हे सरोवर अधिकच प्रसिद्ध आहे.





मात्र अचानक या सरोवराचा रंग का बदलला ? असा प्रश्न अनेकांना पडला होता, शास्त्रज्ञांनी यावर उत्तर शोधले असून या पाण्यात, “डुनालिला सलीना” नावाची एक एल्गी डेव्हलप झाली आहे, आणि मागच्या उन्हाळ्यात या पाण्याचा खारेपणा वाढला तसेच वातावरणात गर्मी अधिक आहे, त्यामुळे ही एल्गी यामध्ये वाढली आहे, आणि त्यामुळेच या सरोवराचा रंग गुलाबी झाला आहे. तसेच जेव्हा वातावरण थंड होईल आणि पावसाचे ताजे पाणी यामध्ये जाउन मिळेल. तेव्हा याचा रंग पूर्ववत होईल असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. 

आधी कोरोना, मग टोळधाड, मग निसर्ग चक्रीवादळ, भूकंप अशा अनेक संकटांचा सामना भारत करत आहे, त्यामुळे या सरोवराच्या बदलत्या रंगाच्या पाण्यामुळे येथील आसपासच्या लोकांवर आणखी एक संकट तर येणार नाही ना ? अशी शक्यता वर्तविली जात होती, मात्र आता शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे, कि यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही, पावसाचे पाणी यात मिळाले कि याचा रंग पूर्ववत होईल.