शॉर्ट एण्ड क्रिस्प : आई आय एम सिंगल

    11-Jun-2020   
|

आई आणि मुलगा, खूपच गोड नातं हो ना ? आणि याच नात्यावर अशक्य गोड लघुपट म्हणजे आई आय एम सिंगल. सुरुवात होते एका फोन कॉल पासून, मुलगा आपल्या आईला कॉल करतो आणि विचारतो कि ती कुठे आहे, आई त्याला बिल्डिंग खाली बोलवते. इथून सुरु होतो त्यांच्यातील संवाद. अगदी साधा संवाद जो कुठल्याही घरातून आई आणि मुलामध्ये होत असेल. तर असा हा संवाद हळू हळू आकार घेतो, आणि मूळमुद्द्यावर येतो.


short and crisp_1 &n


किचन मध्ये दोघेही उभे असताना आई त्याला विचारते हे ट्यूबॉर्ग काय असतं रे ? आणि तुझे वीकएण्ड्सचे काय प्लान्स आहेत ? तर तो सांगतो काहीच नाही, आई त्याला नाईट आउट करण्याचा सल्ला देते, तर तो म्हणतो जेव्हा घरचे नसतात नाइट आउट तेव्हा करायचं असंत. आणि इथे त्यांच्यातील आई मुला पेक्षाही मित्र मैत्रीणीचं नातं जास्त दिसून येतं. पुढे दोघेही गच्चीवर जातात चहा पिता पिता गप्पा मारण्यासाठी.

या गच्चीवरच घडतो त्यांच्यातील खरा संवाद. आई त्याला रागवते कि कसा रे तू तरुण असून प्रेमात पडला नाहीस. असं कसं. आणि त्यावर तो उत्तर देतो कि त्याला वेळ घालवायचा नाहीये. त्यावर त्याची आई जे काही समजावते, ते आपण सगळ्यांनीच ऐकण्यासारखं आहे. पुढे आई त्याला सांगते कि तिचे वीकएण्डसचे प्लान आहेत, आणि ती डेट वर जाणार आहे. हे ऐकून तिचा मुगला उडतोच. त्याला आश्चर्य वाटतं आई आणि डेटवर कशी काय जाणार ? हिला डेट म्हणजे काय हे तरी माहित आहे का ? मात्र तिची ततपप झाली असताना तो तिचा खूप छान समजून घेतो. गेल्या १८ वर्षांपासून त्याची आई एक सिंगल मदर असते, आणि आता तिचा मुलगा मोठा झाल्यावर जर तिला तिच्या आयुष्यात कुणी हवं असेल तर त्यात वाईट काय ? एका अतिशय सुंदर क्षणावर हा लघुपट संपतो.



कथा, अभिनय आणि संवादासह किंवा त्यापेक्षाही जास्त जर या लघुपटात काही महत्वाचं असेल तर तो म्हणजे या लघुपटामागचा विचार Thought behind this concept. आजच्या काळात हे प्रश्न उद्भवूच शकतात. मुलं मोठी झाल्यावर सिंगल पेरेंट्स ना आपल्या आयुष्यात कुणी तरी असावं हे वाटणं काहीही गैर नाही, त्यांच्याही भावना गरजा महत्वाच्या असताच. मात्र अशा वेळी नवी नाती जोडताना Existing नात्यांच्या गुंता होवू नये यासाठी जो संवाद आवश्यक आहे, तो या लघुपटातून दिसून येतो. तरुण मुला मुलींच्या आयुष्यात आताच्या काळात जरा लवकरच येणारे अफेअर्स, किंवा इन्फॅचुएशन हे देखील पालकांनी कसे समजून घ्यावे याबद्दलही मुद्दाम काही न बोलता खूप काही बोलून जातो हा लघुपट. आताच्या परिस्थितीत आई वडीलांनी आई वडील म्हणून नाही तर एक मित्र म्हणून जर आपल्या टीनएज किंवा तरुण मुलांच्या आयुष्यात डोकावलं, तसंच मुलांनीही आई वडीलांचा बॅरियर काढून त्यांना मित्र मानून त्यांच्या जागी असलेली व्यक्ति काय विचार करेल हे समजून घेतलं, तर नात्यांमध्ये दुरावा कधीच येत नाही.

चिन्मयी सुमीत ने या लघुपटातील आईची भूमिका साकारली आहे. कदाचित ती खऱ्या आयुष्यात २ तरुण मुला/मुलीची आई आहे म्हणूनही असेल, आणि तिच्या अभिनयाला तोड नाही हे ही सत्यच आहे, मात्र तिचा अभिनय हा अभिनय अजिबातच वाटत नाही. ती नीरद सुमीत सोबत काय गप्पा मारत असेल, त्याचीच एक झलक तर ही नाही ना असे वाटल्याशिवाय राहत नाही. तुषार खैर ने देखील अतिशय सुंदर भूमिका साकारली आहे.

एकदा तरी अवश्य बघावा असा हा लघुपट आहे.

- निहारिका पोळ सर्वटे