करोना नावाचा विषमज्वर

    03-May-2020
|


 
                                                                                                                                        - नेहा भोळे (जावळे)  

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥


corona_1  H x W

आज महाभारतातील वरील ओळी नक्कीच सगळ्यांना आठवत असतील. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीवर मी (श्रीकृष्ण) जन्म घेतो, असा या ओळींचा अर्थ असून आजच्या जागतिक संकटाला या ओळी समांतर आहेत असे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमान वाढ हि समस्या जगापुढे तोंड वर करुन उभी आहे. अनेक जागतिक परिषदा झाल्या मात्र यावर जगाचे पाहिजे त्या प्रमाणे लक्ष जात नाही. त्यामुळे का होईना या करोना विषाणूचे आपल्याला आभार मानणे गरजेचे आहे. मात्र आजच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर या एका विषाणूमुळे देशाची आर्थिक परिस्थिती किती मंदावली आहे हे जाणवू लागले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या परिस्थितीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेतच मात्र जगातील बलाढ्य देशचं यावेळी करोना विषाणूशी चार हात करत असल्याने जगाच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होतांना आपल्याला दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटने (WHO)च्या अहवालानुसार करोना विषाणू हा महामारी आणणार असे सांगण्यात आले होते. करोना विषाणूने बाधित व्यक्तींचा आकडा हा दहा लाखांपर्यंत जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले होते. हि परिस्थिती लक्षात घेता भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने काही निवडक क्षेत्र सोडले तर इतर सेक्टरमधील कामगार सगळे घरी बसले आहेत. यामुळे संपुर्ण काम सध्या बंद पडली आहेत. याउलट शेअर मार्केटमधील गुंतवणूक देखील काढण्यात येत आहेत. मोठमोठ्या उद्योजकांनी देखील आपली कामे पुढे ओढली आहेत. मात्र परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार अतोनात प्रयत्न करत आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मिळून काम करित आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयांचा देखील राज्यावर सकारात्मक परिणाम होतांना दिसत आहे. मात्र परिस्थिती अजून कोलमडत गेली तर याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला नक्कीच बसणार. यामुळे सध्या जगात आर्थिक मंदी आली आहे असे दिसून येत आहे.


corona_1  H x W

आर्थिक मंदी : 

देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादन (gross domestic product) जर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात. यामुळे अर्थकारण मंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था (बॅंका) अधिक हमी मागतात. विमा कंपन्या त्यांच्या हप्त्यांचे दर वाढवतात. उद्योग जोखिम घेऊ शकत नसल्याने गुंतवणूक मंदावते, काही वेळा थांबते. नवीन गुंतवणूक नाही आणि वाढीची संधी दिसत नसल्याने अर्थिक जोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर कपाती केल्या जातात. त्यामुळे लोकांचा खर्च करण्याचा कल कमी होतो. पैसा बाजारात येईनासा होतो. अशा रितीने सर्वच अर्थव्यवस्था थंडाऊ लागते.

2020 हे वर्ष जागतिक मंदी असल्याचे दिसून येत आहे. या वर्षात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे जागतिक मंदीचे सावट दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या बाबतीत तर खूप मोठा उतार दिसून येत आहे. 1987 चा कच्च्या तेलाच्या भावा पेक्षा आता मार्च 2020 मध्ये कच्च्या तेलाचा भाव कमी झाला आहे.

ऑगस्ट 1929 ते मार्च 1933 या काळात सर्वाधिक चाललेली जागतिक मंदी मानली जाते. 28 जुलै ते 11 नोव्हेंबर 1918 या काळात पहिले महायुध्द संपले आणि या महायुध्दाचा जगावर आर्थिक मंदिच्या रूपाने परिणाम झाला. असाच काहिसा विपरित परिणाम कोरोना विषाणूचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.


corona_1  H x W


सध्या अमेरिकेत बेरोजगार लोकांची संख्या विक्रमी उच्चांक गाठत आहे. जी जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दशकाच्या विस्ताराचा शेवट असल्याचे दर्शवते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहे. इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेत कच्चे तेल फुकट वाटले जात आहे. ओपेक आणि तेल उत्पादन करणाऱ्या देशांनी तेल उत्पादन करण्यास जरी थांबवले असले तरी देखील जगाकडे अद्याप गरजेपेक्षा जास्त कच्चे तेल आहे. भारत हे कच्चे तेल आयात करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र भारताजवळ येवढ्या जास्त प्रमाणात ठेवता येईल असा तेलाचा साठा नसल्याने सध्या भारत देखील शांत आहे.

कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, चीन, जपान, अमेरिका या बलाढ्य देशांचे जीडीपी खसरले आहेत. आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात बंद पडली असल्याने रूपया आणि इतर चलनाच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर अर्थव्यवस्थेला किड लागेल. ही किड दूर करण्यासाठी सरकार आणि नागरिक या दोघांना एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या लॉगडाऊनचा संयमाने पालन करुया आणि कोरोना नावाच्या विषमज्वराला आटोक्यात आणण्याचा सगळे मिळून प्रयत्न करुया.


- नेहा भोळे (जावळे)