आंतरिक बळ : प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय

    17-May-2020
|

माणसाच्या मनात नेहमीच इच्छा असतात. माणूस वेगवेगळ्या इच्छांनी भरलेला असतो. आपल्या आसपासच्या घटनांना पाहून तसेच आसपासच्या लोकांना पाहून व्यक्तीच्या मनात निरंतर इच्छा जन्म घेत असतात . माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाही, मात्र ज्यात माणसाची इच्छाशक्ती जोरदार असते त्याच इच्छा नेहमी पूर्ण होत असतात.


will power_1  H


ज्या इच्छांशी माणसाचे आंतरिक बळ जुळलेले असते त्याच इच्छा पूर्ण होत असतात आणि त्यालाच इच्छाशक्ती म्हटले जाते. आंतरिक इच्छा जोरदार नसेल तर माणसाला इच्छा असून देखील तो बरेच कार्य पूर्णत्वास आणू शकत नाही.

उदा. जास्तीत जास्त अभ्यास करणे, रोज सकाळी लवकर उठणे, आपले लक्ष्य मिळवणे इत्यादी.

हे सगळे करण्यासाठी माणसाला आपल्या आंतरिक इच्छा शक्तींना वाढवणे गरजेचे आहे आणि यामुळेचं तो आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकेल.

तसे पाहता एखादे कार्य पूर्ण करण्यासाठीचं नाही, तर आपल्या अनावश्यक इच्छांना नियंत्रित करण्यासाठी देखील माणसाची इच्छाशक्ती खूप मदतीला येत असते. ज्यात माणसाला आत्मसंयमावर नियंत्रण ठेवावे लागते. जसे, राग, भावना, इंद्रिये, वाईट सवयी तसेच व्यसनांवर माणसाला संयमाने काम करावे लागते. अर्थात आपल्यामध्ये संयम आणण्यासाठी माणसाला आपल्या आंतरिक बळाची गरज असते.

चला तर मग यालाच एका उदाहरणाद्वारे खोलात समजावून घेवू की कशाप्रकारे जेव्हा हवे तेव्हा आपण इच्छाशक्ती वाढवू शकतो आणि जेव्हा हवी तेव्हा त्यावर संयम कसा मिळवू शकतो.

एके ठिकाणी दोन चोर राहत होते. हे दोन चोर नेहमीच छोट्या - मोठ्या चोऱ्या करीत असत. एके दिवशी या दोन्ही चोरांच्या कानावर एक बातमी आली की, त्यांच्या भागात एक श्रीमंत व्यक्ती नुकताच राहायला आला आहे. ज्याच्याजवळ खूप प्रमाणात रुपये , दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. हे ऐकून दोन्ही चोरांच्या मनात वेगवेगळे विचार येण्यास सुरुवात झाली.

पहिल्या चोराच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येण्यास सुरुवात झाली. जर मी या घरात चोरी केली तर माझे संपूर्ण जीवन सुधारून जाईल आणि मी लवकरच श्रीमंत होईन. यामुळे मला पुन्हा चोरी करण्याची गरज भासणार नाही. मी या पैश्यांनी मोठे घर, गाडी विकत घेईन आणि देशात - परदेशात फिरायला जाईन.

पहिला चोर ज्या प्रमाणे आपल्या इच्छांची पूर्तता होतांनाचा विचार करू लागला, तसे तसे त्याची इच्छा अजून दृढ होत गेली आणि त्यावरून त्याचा चोरी करण्याचा संकल्प अजून पक्का होत गेला.

त्याच वेळी दुसऱ्या चोराच्या मनात याच्या विरुद्ध विचार चक्र सुरू झाले होते.

जसे, जर मी चोरी करतांना पकडलो गेलो तर मला पोलीस पकडून नेतील आणि मला तुरुंगवास होईल . मला अनेक वर्षे तुरुंगात काढावे लागेल. यामुळे माझ्या कुटुंबियांना याची परतफेड करावी लागेल.

will power_1  H

याप्रकारचे विचार दुसऱ्या चोराच्या मनात येऊ लागले आणि यामुळे त्याची इच्छाशक्ती येथे कमकुवत होत गेली. याचा परिणाम असा झाला की त्याने चोरी न करण्याचा निर्णय घेतला. या उदाहरणावरून आपल्याला समजता येईल की, कसे एका चोराची इच्छा चोरी करण्यासाठी वाढली तर दुसऱ्या चोराची चोरी न करण्याची इच्छा बळावली.

याचं तात्पर्य असे की माणसाला आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारे इच्छा शक्तींचा वापर करता आला पाहिजे.जीवनात काही मिळवायचे असेल, जसे एखादे लक्ष्य, यश, आरोग्य, कला व गुण तर यावेळी माणसाला विचारांद्वारे आपल्या इच्छा शक्तींना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

यासाठी माणसाला याची जाणीव हवी की या इच्छा पूर्ण झाल्याने मला याचे काय फायदे मिळणार आहेत. त्याला यातून किती आनंद मिळेल , समाजात त्याला किती आदर आणि सन्मान मिळेल यामुळे माणसाला इच्छा पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल आणि तो त्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागेल.

याचप्रकारे जर माणसाला वाटत असेल की चुकीच्या सवयी, वृत्ती, व्यसन यापासून आपल्याला मुक्ती हवी तर आपले विचार त्या दिशेकडे वळवणे गरजेचे आहे.

जसे, व्यसनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे. उदा. व्यसन केले तर तो आजारी पडेल , त्याला आणि त्याच्या कुटूंबियांना याचा त्रास होईल, वैद्यकीय खर्च वाढेल, पैश्याचा दुरूपयोग होईल, तसेच लोकं देखील दूषणे देतील इत्यादी.


will power_1  H


जेव्हा माणूस या प्रकारे मनन करेल आणि आपल्या कल्पनाशक्तीने या गोष्टींना समजून घेईल त्याच वेळी माणूस स्वतःवर संयम ठेवू शकेल. आपल्या इच्छांना योग्य दिशेने वळवून मनासारखे परिणाम प्राप्त करू शकेल.

मात्र यासाठी दृढ इच्छाशक्तीची जोड असणे आवश्यक आहे. दृढ इच्छाशक्तीच्या जोरावरच आपण जे बोलतो ते करून दाखवत असतो. कमकुवत इच्छाशक्तीच्या आधारे आपण बोललो तर मात्र त्या कार्याला पूर्णत्व येत नाही.

आपल्या बोलण्यात आणि करण्यात कोणताही फरक येऊ नये यासाठी आपण जे बोलतो ते करून दाखवण्याची हिम्मत आपल्यामध्ये नेहमी असावी. कमकुवत इच्छाशक्तीमुळे माणूस स्वतःच्या नजरेत सन्मानास पात्र राहत नाही.

यासाठी स्वतःचा सन्मान आपल्याच नजरेत वाढवायचा असेल तर आपल्या इच्छाशक्तींना दृढ करणे आवश्यक आहे.

नेहा जावळे.