भारताच्या यशाची गुरुकिल्ली

    30-Apr-2020
|

- सौमित्र गोखले


संकटकाळ हा मोठा कसोटीचा काळ असतो. त्याला प्रत्येक व्यक्ती आपापल्या मूळ स्वभावाप्रमाणे प्रतिसाद देते. कुणी घाबरून जाते तर कुणी बिनधास्त असते, कुणी बेचैन राहते तर कुणी शांत. कुणी थोडे खच्ची होतात तर काही जण बाकीच्यांना मदत करत त्यांचे मनोबलही वाढवत राहतात. अनेकांचे गुण प्रकाशित होतात तर अनेकांना आपल्यातीलच सुप्त गुणांची ओळख होते. व्यक्तीचे जसे आहे तसेच समाजाचेही आहे. कठीण परिस्थितीचा समाज एकंदर कसा सामना करतो हे अभ्यासले तर समाजमनाच्या अंतरंगाचा अंदाज येऊ शकतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातील काही घटना आपल्या भारतीय समाजाचे एक हृदयंगम दर्शन घडवतात. प्रेरणा देऊन जातात आणि अंतर्मुख करायलाही लावतात. त्याविषयीच थोडे.

 

Corona Worriors_1 &n


कोरोना विषाणूच्या साथीचा वेग मंदावण्यामध्ये भारताला आतापर्यंत अनेक मोठ्या देशांच्या तुलनेत चांगले यश आले आहे. यात सरकारने वेळीच उचलली पाऊले, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने लॉकडाऊनचे केलेले पालन याचा मोठा वाटा आहे. विशेषकरून वैद्यकीय सेवेतील साऱ्याच लोकांचे स्वतःचा जीव धोक्यात घालून चालू असलेले अथक परिश्रम, पोलिसांची निर्भीक कर्तव्यनिष्ठा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे चोख काम याचे श्रेय तर फारच मोठे आहे. जनतेच्या मनामध्ये त्यांनी कायमचे आदराचे स्थान मिळवले आहे. पंतप्रधान मोदींच्या खंबीर, संवेदनशील व क्रियाशील नेतृत्वाचे कौतुक तर जगभरातील अनेक सुज्ञ लोक करत आहेत. जनतेला कमीतकमी त्रास व्हावा यासाठी सरकारी यंत्रणा, सर्व मंत्रालये व अत्यावश्यक सेवा प्रामाणिकपणे अथक प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी पाहता कदाचित नवभारताची एका नव्या कार्यक्षम कारभाराकडे वाटचाल होते आहे असे म्हणता येईल.




या सर्व काळात एकूणच समाजात जे संवेदनशीलतेचे, समरसतेचे दर्शन होत आहे ते खूपच सुखावह व प्रेरणा देणारे आहे. बेजबाबदार वर्तनाच्या काही विशिष्ट व तुरळक घटना सोडल्या तर कोट्यावधी लोकांनी लॉकडाऊनचे धीराने पालन केले आहे. स्वच्छता राखणे आणि भौतिक अंतर ठेवून काम करणे याबद्दलही मोठ्या प्रमाणावर जागृती आहे. शहरांमधूनच नाही ग्रामीण भागातील मित्र सांगत आहेत त्याप्रमाणे तिथेही याचा अवलंब होतो आहे. या टाळेबंदीमुळे मोठे आर्थिक नुकसान होणार यात वादच नाही. पण आता तात्पुरते असे स्थानबद्ध राहणे सर्वांच्या हिताचे आहे असा भाव सर्वांच्या मनात आहे. साथ खूप वेगाने वाढली आणि रुग्णांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली तर ते देशाला फारच महागात पडेल हेही सर्वांना पटले आहे असे दिसते. संपूर्ण समाजच या संकटाविरुद्ध एकजूट होऊन निर्धाराने उभा आहे.

 

या संकटाचे गांभीर्य लक्षात येताच जसे सरकारने गरिबांसाठी आर्थिक दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या तसे अनेक उद्योजक, अभिनेते, खेळाडू, व्यावसायिक संस्था अशा सर्वांनीच आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या. सेवा भरतीद्वारे संघ स्वयंसेवक, अक्षय पात्र, आर्ट ऑफ लिविंग, रामकृष्ण मिशन प्रमाणेच सर्व धर्मांच्या संस्थांनी मदत कार्य सुरु केले. केवळ मोठ्या संस्थाच नाहीत तर अनेक स्थानिक गट, मित्रमंडळी यांनी काम सुरु ठेवले आहे. हातावर पोट असणाऱ्यांची मुख्य काळजी. त्यांच्यासाठी शिधा वाटप, सॅनिटायझर व मास्क वाटप असे कार्यक्रम सुरु आहेत.

कुणीही उपाशी राहू नये या एका भावनेने असंख्य लोक रोज झटत आहेत. देशभरातील विविध भागातील व स्तरातील मित्रांशी बोलताना खूप विलक्षण गोष्टी कळल्या. जसे शिधा किंवा भोजन वाटप करताना लक्षात येत गेले तसे पीडित लोकांना मदत पोहोचवण्याचे वेगवेगळे प्रयत्न होत गेले. दिल्लीत सेवा कामात दिवसरात्र काम करणाऱ्या मित्राने सांगितले की प्रथम मजुरांची काळजी घेतली गेली तसेच बेघर लोकांची. मग वाटले की तृतीयपंथीयांच्या वस्तीत आणि शरीरविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीत मदत आवश्यक असेल. आता तिथे पोहोचवली जाते आहे. यमुनानदीच्या पात्रात एका टापूवर भाजीपाल्याची शेती होते. तिथे शिधा कोण पोहोचवणार? मग होडीतून जाऊन कार्यकर्त्यांनी शिधा पोहोचवला. एका तीर्थक्षेत्रात तर यात्रेकरू नसल्याने माकडेही उपाशी राहत आहेत म्हणून त्यांचीपण सोय केली गेली. बंगलोरमधे प्रशिक्षणासाठी आलेले काही आफ्रिकेतील खेळाडू बेंगळुरूमधे अडकून गेले आहेत. आफ्रिकेतील काही मित्रांनी असे लक्षात आणून देताच बंगळुरूच्या स्वयंसेवकांनी तातडीने त्यांना दिलासा दिला व भोजनाची सोय केली. उत्तरपूर्वेतील विद्याथ्यांवर अज्ञानापोटी काही लोक ताशेरे ओढत होते व त्रास देत होते. लागलीच कित्येक शहरांत स्वयंसेवकांनी त्यांच्याकरता विशेष हेल्पलाईन उघडल्या व मदत केली. कुणाविरुद्धही भेदभाव होता कामा नये! पुण्याच्या एका मित्राने सांगितले की तो शहराच्या जवळ ग्रामीण भागातील कातकरी पाड्यांवर जात असतो. या लॉकडाऊनमधे तिथे खाण्याचे हाल असणार हा त्याचा अंदाज खरा ठरला. त्याने लगेच दर आठवड्याला शिधा पोहोचवण्याची व्यवस्था केली.


सर्वसामान्य लोकांच्या अशा अनेक घटना प्रसिद्ध झाल्या आहेत.

 


राजस्थानातील गाडिया लोहार या भटक्या समाजातील एका महिलेचा विडिओ सध्या समाजमाध्यमांवर खूप लोकप्रिय झाला आहे. राजस्थानी हिंदीत खड्या आवाजात बाई म्हणतात, "महाराणा प्रतापाच्या काळापासून घेतलेल्या प्रतिज्ञेनुसार आम्ही स्थायिक ना होता गावागावांत जाऊन लोहारकाम करतो. जे कमावतो व खातो ते स्वतः कष्ट करूनच! कुणासमोर कशासाठी हात पसरत नाही." आज पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे एकाच ठिकाणी थांबले आहेत. संघ स्वयंसेवक जेव्हा मदत द्यायला गेले तेव्हा त्यांनी मदत तर नाकारलीच वर सर्व परिवारांनी मिळून मदतकार्यासाठी काही रक्कमही देऊ केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, "आमच्यापाशी जे थोडेफार आहे ते आम्ही या संकटकाळात सर्वांमध्ये वाटून खाऊ." किती आदर्श असा हा व्यवहार आहे! बाईंच्या बोलण्यात इतिहासाचे भान आहे, स्वावलंबी असल्याचा सार्थ अभिमान आहे व आजच्या परिस्थितीतील कर्तव्याची जाणही आहे. आपल्यापेक्षा कमनशिबी लोकांविषयी सहृदयता आहे. मनाची उदारताही आहे.


अजून एक बातमी वाचनात आली ती सीकर जिल्यातील पलथाना गावची. तिथे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा अशा विविध राज्यातील शेतमजुरांना घरी परतण्यापूर्वीच क्वारंटाईन व्हावे लागले. गावकऱ्यांनी अशा या ५४ मजुरांची तेथील शाळांमधे राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली. १४ दिवस पूर्ण झाल्यावर सर्वांच्या तब्येती उत्तम राहिल्याच. त्या सर्व मजुरांनी मिळून गावकऱ्यांच्या या आतिथ्याच्या बदल्यात आपली श्रमसेवा देऊ केली व गावातील लोकांच्या संमतीने शाळांच्या जुन्या झालेल्या भिंतींना रंगरंगोटी करून नवा साज चढवला. इथे विचित्र परिस्थितीतील गावकऱ्यांनी केलेले आतिथ्य सुंदर आहे. तसेच मजुरांनी स्वतःच्या कुटुंबियांपासून दूर असण्याची खिन्नता बाजूला ठेवून कृतज्ञतेने व आनंदाने त्या गावासाठी काहीतरी करणे हे ही तितकेच सुंदर आहे.


अशा असंख्य हृदयस्पर्शी घटना देशभर घडत आहेत. उत्स्फूर्त, अत्यंत सहज व निस्वार्थ असा हा जनसामान्यांचा व्यवहार खरेच या बिकट परिस्थितीत मनाला सुखावणारा आहे. अर्थात हे काही पहिल्यांदाच घडते आहे असे नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या आपत्तीच्या वेळी समाजाकडून असाच अनुभव येतो. सर्व भेद विसरून समरसतेचे आणि माणुसकीचे दर्शन नेहमीच घडले आहे.

 

साकल्याने विचार केल्यास भारतीय समाजमनाचे काही विशेष पैलू समोर येतात. एरवी उत्सवप्रिय असणाऱ्या आपल्या समाजाला घरी राहूनच सर्व सण साजरे करा हे पटण्यास फार वेळ लागला नाही. या विशिष्ट परिस्थितीत आपण संयम पाळला पाहिजे ही परिपक्वता ग्रामीण भागापासून शहरापर्यंत, अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत आबालवृद्धांनी दाखवली. अशा स्थितीत आपले कर्तव्य काय याचे भान लोकांमधे पाहायला मिळते. स्वकर्तृत्वावर स्वाभिमानाने जगले पाहिजे ही शिकवण दिसते. त्याचबरोबर समाजातील इतरांबद्दल संवेदनशील असले पाहिजे हा संस्कार दिसतो. आवश्यकता ओळखून स्वयंस्फूर्तीने मदत करणारे असंख्य बघायला मिळतात. परिस्थितीने नाडलेल्यांचा आपुलकीने पाहुणचार करण्याची तयारी दिसते. समाजऋणाची परतफेड केली पाहिजे याची जाण रुजलेली दिसते.

वरील गुण व संस्काराच्या समुच्चयालाच आपल्याकडे धर्म असे नाव आहे. ही धर्मभावना आतून येते, बाहेरून थोपवता येत नाही. धर्मभावना मनामनात असल्यानेच आपला समाज या संकटकाळी संयमाने व शिस्तीने वागतो आहे. त्यामुळेच आपुलकीने सेवा करताना दिसतो आहे. पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले, नंतर वैद्यकीय सेवेतील सर्वांना अभिवादन करण्यासाठी टाळ्या व थाळ्या वाजवण्यास सांगितले. पुढे एका रात्री दिवे लावून आसमंत उजळण्यास सांगितले. या सर्वाचा परिणाम सामूहिक कर्तव्यभावना, अर्थात धर्मभावना प्रबळ करण्यामधे नक्कीच झाला असेल. लॉकडाऊनसह सर्व उपाययोजनांबरोबर समाजातील ही जागृत धर्मभावना भारताला या संकटातून तारून नेईल.

सर्वांच्या प्रयत्नांने व देवाच्या कृपेने आपण या जागतिक संकटातून बाहेर पडूच. आताचा सर्व भर साथ पसरवण्यापासून थांबवणे व जीवितहानी वाचवणे हा आहे. यात यश मिळाल्यावर मोठे काम असेल ते म्हणजे जनजीवन सुरळीत करणे व अर्थव्यवस्थेला चालना देणे. 'जीव की आजीविका ?' ही चर्चा आता चालूच आहे. अर्थतज्ञ, आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था याविषयी सूचना देतीलच. सरकारी मंत्रालयाची कार्यदले यावर तोडगे काढून योजना बनवतील. या सर्व उपाययोजनांबरोबरच आर्थिक गती पुन्हा वाढवण्यासाठी सामूहिक कर्तव्यभावनेला, म्हणजेच धर्मभावनेला योग्य दिशेने क्रियान्वित केले तर यश निश्चित मिळेल.

 

भारतीय समाजमानसाचा विचार केला तर जागृत धर्मभावना हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मग ती आपदा प्रबंधन नीती असो वा विकासाची नीती. त्याचप्रमाणे कामातील सचोटी असो वा गुणवत्तापूर्ण उत्पादन, सार्वजनिक स्वच्छता असो वा नागरी शिस्त, सर्वसमावेशक समाज निर्मिती असो वा कामाची प्रतिष्ठा - हे सर्व घडवण्यासाठी आधार - "जागृत धर्मभावना". हीच आपल्या देशाची कार्यनीती (work ethics) आहे आणि नीतिमत्ताही (moral compass ) !